Tuesday, April 27, 2021

 "बेकेट आय डोन्ट नो म्हणतो म्हणून "

संपादन:गणेश कनाटे
आजपर्यंत अनेकांचे हे पुस्तक वाचून झाले असणार.माझेही वाचून झाले होते.पण हे पुस्तक आपली पाठ सोडत नाही.ते सतत आपल्याला बेकेटच्या म्हणण्याची आठवण करून देत असते. सभोवताली अनेक गोष्टी चालू आहेत त्यांच्याकडे बघण्याची एक दृष्टी तो आपल्याला देत असतो.त्याचं एक सुंदर वाक्य पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आहे- युज युअर हेड,कान्ट यू, यूज युअर हेड,यू आर ऑन अर्थ,देअर इज नो क्युअर फॉर दॅट!
सध्या आपण भयंकर अशा गोष्टींना सामोरं जात आहोत,त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच असा अनुभव आला आहे की भयंकरापुढे सगळं कसं निरर्थक आहे. आजच्या परिस्थितीला अगदी योग्य अशी बेकेटची वाक्य आहे. आपण आज कितीतरी गोष्टी सोसत आहोत,ते सोसतांना आपल्याला वाटतं की अंतिम मुक्तीचे काहीतरी साधन असेल पण त्याचा पत्ताच कुठे नाही,त्यासाठी देवाची वाट पाहतो पण तो कुठं आहे? देवळं बंद आहे,तो देवळात नाही सर्वत्र आहे असं माहीत असतांना आपण कुठे कुठे गर्दी करत आहोत. अशा परस्परविरोधी भावनांची सरमिसळ प्रत्यक्ष आपल्या जीवनात असते.त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला लावतो बेकेट.
बेकेटची काहीच पुस्तकं मी वाचली होती,पण या पुस्तकामुळे त्याच्या पुस्तकांकडे आपण कसं बघायला हवं,त्याची पार्श्वभूमी, त्याची विचार करण्याची पद्धत हे कळलं. त्यामुळे तो समजून घ्यायला सोप्पं जाईल.असं वाटतं.वेटिंग फॉर गोदो,एन्ड गेम,हॅपी डेज,ऑल दॅट फॉल,प्ले ही नाटकं आपल्याला बघायला मिळतात.वेगवेगळ्या भाषांमध्ये असली तरी एकदा तुम्हांला बेकेटला काय म्हणायचं आहे हे कळलं की ती बघता येतात,समजून घेता येतात.मी यातली फ्रेंच भाषेत बघितली.अर्थात हे पुस्तक वाचल्यानंतर बघितली.त्यामुळे मला अधिक नीट समजली.असे वाटते.
बेकेटचा जन्म १९०६ मध्ये झाला. तो अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे. तो ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकवत असे,पण त्याने ती नोकरी एकाएकी सोडली कारण काय? “जे मलाच नीट कळत नाही ते विद्यार्थांना शिकविण्याचे पाखंड मी का करावे?” असे बेकेटचे मत होते.
सतत स्वतःला तपासणे,आपल्या आजूबाजूच्या घटनांचे अर्थ लावणे आणि त्याप्रमाणे वागणे.यासाठी जे धाडस लागते ते त्याच्याकडे होते.त्याच्या विविध नाटकांचा अभ्यास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. जेव्हा त्याची पार्श्वभूमी कळते तेव्हा त्याचे I do not know हे म्हणणे किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येते.मुळातून हे पुस्तक वाचणं गरजेचे आहे.तुम्ही लेखक असा अथवा नसा पण एकदा बेकेट समजून घ्यायला हवा. असं मला वाटतं.
हे पुस्तक बेकेट यांच्या साहित्याचे,विसाव्या शतकाचे,मानवाच्या स्थितीगतीचे आकलन करून देण्याचा प्रयत्न करते. शेगाव( जि.बुलढाणा) बेकेट काय वाचायचा? याबाबत दोन दिवसांचे चर्चासत्र झाले. त्यात वाचण्यात आलेले निबंध या पुस्तकात आहे.यातील प्रत्येकजण आपल्याला बेकेट विषयी अधिक जागृत करत जातो.सगळ्यांचा अभ्यास आपल्याला अधिक समृद्ध करतो.यामध्ये गणेश कनाटे, बेकेट आणि अॅब्सर्डिटी : दीपक बोरगावे, बेकेट आणि तत्त्वज्ञान : गणेश कनाटे, सॅम्युएल बेकेट, वेटिंग फॉर गोदो आणि अॅब्सर्डिटी : दत्ता चव्हाण, बेकेट कुळातील इतर लेखक : अरविंद विश्वनाथ, आणि वेटिंग फॉर गोदो : सूक्ष्म वाचन : वसंत आबाजी डहाके; या निबंधांचे वाचन झाले. त्यावर चर्चा झाली. आजच्या संदर्भातही बेकेट यांचे साहित्य कसे महत्त्वाचे आहे हे या पुस्तकामुळे आपल्याला समजते.खरंच एखादा लेखक असा अभ्यासातून समजून घेणं किती आवश्यक आहे. अनेक गोष्टी मला माहीत नाही,हे मला कळलं.आजच्या जागतिक पुस्तक दिनी एवढी जाणीव पुरेशी आहे.
May be an image of text
Manik Gharpure, श्यामला चव्हाण and 22 others
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment