Tuesday, April 27, 2021

 आहेच वेगळी – डॉ.राजेंद्र मलोसे

शब्दालय प्रकाशन
“आहेच वेगळी” ही कादंबरी एका बैठकीत वाचून होते.म्हणजे आपण ती पुढे पुढे वाचत जातो.खरं तर मलपृष्ठावर कादंबरीचे सार आहे, ते जर आपल्या लक्षात राहिले तर पुढे नक्की काय होणार हे आपल्या लक्षात येते.ही गोष्ट निजाम आणि रझाकार यांच्या काळात सुरु होते. त्यावेळच्या पद्धती,बोली,आणि रूढी या पुस्तकात येतात.ज्या माझ्या सारख्या वाचकाला नवीन आहेत.मोठमोठी कुटुंब,त्यांचा गोतावळा आणि एकात एक असणारी त्यांची नाती आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न या कादंबरीत येतात.
वेगवेगळ्या कारणाने एकमेकांशी जोडली गेलेली कुटुंबे आणि त्यातील काही माणसं ही गोष्ट आपल्याला सांगतात. नात्यातल्या नात्यात झालेली विशेष करून रक्ताच्या नात्यात झालेली लग्न ही त्रासदायक होतात का?कारण त्यांच्यातले जनुके कशी असतात?त्यांचे काय होते?हा यातील डॉ.स्वर यांचा संशोधनाचा विषय.तो आपल्या कुटुंबाची माहिती काढतो,त्यांची वंशवेल लिहून काढतो.ज्यामुळे त्याचं संशोधन पुढे जाईल असं त्याला वाटतं. तो आपल्या वडिलांच्या दुभंगत्वाचा शोध घेत मागच्या चौथ्या पिढीपर्यंत पोहचतो.या पुस्तकात कामभावना लपवली नाही,ती रूपकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येते.
कादंबरीत जनुके आणि त्याविषयीचे बोलणे वारंवार येते.पण ते सुसंगतपणे येत नाही असे वाटते.जनुकाची रचना आपण बदलू शकतो का? त्याचा उपयोग मानवी जीवाला कसा होवू शकतो?याचा अभ्यास डॉ.स्वर करणार असतो.पण यातून वाचकाला ठोस असं काही मिळत नाही.
ही गोष्ट नक्की कोणाची आहे? पुस्तकात ‘समा’ ला वेगळी म्हटलं आहे.पण मला शांतम्मा,कौसल्या,दुआ,समा आणि इतर बऱ्याच स्त्रिया वेगळ्या आहेत असं वाटतं.त्यांची कहाणी त्यांनी सांगितली असती तर ही कादंबरी वेगळी झाली असती असे वाटते. यातील काही स्त्रिया मुळातच अबोल,हतबल आहेत आणि त्या त्यांच्या जनुकांमुळे असतील का?असा प्रश्न निर्माण केला आहे.पण निराशेने अबोल,हतबल झालेली माणसं मनात तरी काही म्हणत असतील ना? त्यांना त्यांची काही बाजू असेलच ना? शिवाय ज्या दिगम्बरमुळे या सर्व घटना घडल्या,घरादाराचा नाश झाला,तो ही कादंबरीत काहीच बोलत नाही.हे खूप आश्चर्याचे वाटते. काहीतरी सांगायचं राहिलं असं वाटतं.
May be an image of text
Manjusha Gadgil, Vandana Khare and 18 others
3 shares
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment