Tuesday, April 27, 2021

 जॉर्ज ऑर्वेल,करून जावे असेही काही....

विशाखा पाटील.
लेखक असणाऱ्या प्रत्येकाला किंवा कोणत्याही कलाकाराला ‘करून जावे असेही काही...’ असे वाटत असते. आपल्या हातून काहीतरी भव्य दिव्य,कोणत्याही काळात ते उठून दिसेल असं काहीतरी लिहलं जावं असं वाटत असतं.जॉर्ज ऑर्वेलला सुद्धा आपण लेखक,प्रसिद्ध लेखक व्हावं असंच वाटत होतं.
लेखक होणं किंवा कोणताही कलाकार होणं सोप्पं नसतं हे त्याला माहित नव्हतं का? नक्कीच माहित होतं.पण ‘करून जावे असेही काही’ हे त्याला फार मनापासून वाटत होते म्हणूनच त्याने स्वतःची वाट निवडली आणि त्यावर कष्ट घेत चालला. आपल्या शब्दाचं मोल तो जाणून होता,बरं ते शब्द,विचार सुद्धा अनुभवातून,निरीक्षणातून आले होते.त्यामुळे त्यांचं एक सत्त्व होतं.म्हणूनच तो एकटा असला तरी त्याने आपला मार्ग सोडला नाही.
या पुस्तकात लेखिकेने आर्वेलच्या निबंधांचा,त्याच्या कादंबऱ्याचा,त्याने विविध ठिकाणी जी कामं केली त्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण जर त्याचं काही वाचलेलं असेल तर त्यामागे त्याची नक्की काय भूमिका असेल आणि ती त्याने तशी का मांडली असेल हे समजून घेता येते.हे समजून घेवून काय करायचं?हा प्रश्न काहींच्या मनात येवू शकतो,पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे आणि त्याही पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला यातून मिळू शकते असे वाटते.आपल्या समोर असतं किंवा आपल्याला जे दाखवलं जातं तेवढीच गोष्ट नाही.त्याच्या आगेमागे खूप काही असतं आणि ते अनेक शतकं त्याचा परिणाम दाखवत असतं.हे आपल्याला कळू शकतं.
जॉर्जने लहानपणीच लेखक व्हायचं ठरवलं होतं. त्या वाटेवरून चालतांना त्याला अनेक अनुभव आले,काही अनुभव घेता यावेत म्हणून त्याने मुद्दाम वाकडी वाट केली.त्याची निरीक्षण करण्याची क्षमता अफाट होती.तसेच ती निरीक्षणे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या साहित्यात तो वापरत होता. त्याने बर्मात पोलीसअधिकारी म्हणून काम केले,नंतर ती नोकरी सोडून भटक्या बरोबर फिरला,खाण कामगारांचे कष्ट बघितले.जीवाची पर्वा न करता फॅसिझमविरुद्ध लढला,दुसऱ्या महायुद्धाचा संहार बघून दुःखी झाला. हे सगळं अनुभवत असतांना,जगाला तोंड देत असतांना त्याने व्यवस्थेमध्ये माणसाचं स्थान काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.तो साम्राज्यशाही,भांडवलशाही,समाजवाद,संवाद,वंशवाद,राष्ट्रवाद अशा अनेक गोष्टीच्या मुळाशी जात त्याने भूत-वर्तमान-भविष्याला त्याने कवेत घेतले.त्यांचे अर्थ लावले आणि लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला.
या पुस्तकात आपण आर्वेल विषयी अनेक गोष्टी जाणून घेतो. त्याचे निबंध,त्याच्या कादंबऱ्या,त्यातली पात्रं,त्याचे प्रकाशक,त्याचा भवताल,त्याला त्याने दिलेला प्रतिसाद,याशिवाय त्याने लिहलेली अनेक सदरं,त्याचे बीबीसी वरील काम.यातून आपण जसे जॉर्ज ऑर्वेल विषयी जाणून घेतो तसेच त्याचा भवतालही समजून घेतो.एक लेखक कशा प्रकारे स्वतःला तपासत पुढे जातो.त्याची बांधिलकी लिखाणाशी असते.तरीही तो आपली परखड मतं मांडायला घाबरत नाही.हे पुस्तक मुळातून वाचायला हवं असंच आहे.शिवाय लेखिकेने केलेला अभ्यास जाणून घेण्यासाठी तर नक्कीच वाचायला हवं.हे पुस्तक मला कुठेही रटाळ झालेलं वाटलं नाही. ते संदर्भ सोडत नाही किंवा उगाच भाष्यही करत नाही.ऑर्वेलला काय म्हणायचं आहे,होतं एवढंच हे पुस्तक सांगतं.
लेखकानं राजकीय भूमिका घ्यावी की राजकारणापासून दूर राहावं- यावर आपण नेहमी ही चर्चा ऐकतो,करतो.यावर जॉर्ज ऑर्वेल म्हणतो, “ लेखकानं राजकीय लेखन करू नये, असं म्हणणं हीच मुळात राजकीय भूमिका आहे.” त्याच्या मते काळ असा आहे की लेखकाला राजकारणापासून दूर राहाता येणं अवघड.तसेच लेखन ही स्वतंत्र क्रिया असल्यानं साहित्यसाठी समूहनिष्ठा हानिकारक असल्याचं त्यानं म्हटलं आहे.हे सगळं त्याच्या ‘Writers and Leviathan’ या निबंधात वाचायला मिळेल. आपल्या मनातले अनेक गोंधळ जॉर्ज अलगद सोडवतो.
एखादा लेखक समजून घेण्यासाठी त्याच्याकडे कसे स्वच्छ नजरेने बघायचे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
May be an image of text
Manjusha Gadgil, Vandana Khare and 12 others
8 comments
Like
Comment
Share

8 comments

No comments:

Post a Comment