Thursday, March 28, 2024

भटक भवानी

 कोणाला भटकायला आवडत नाही, असं विचारलं की अनेकजण ताबडतोब हो म्हणतात,पण दुसऱ्या क्षणाला ते कसे आणि किती कामात व्यग्र आहेत हे सांगतात आणि भली मोठी कामाची यादी देतात. जणू फिरणारी माणसं काहीच काम करत नाही.असे अनेक लोकांचे घर सुटत नाही तर काहींना घरी राहणे नको वाटते.एकाच घरात वर्षानुवर्षे राहणे मला नकोस होते.पण कुठेही राहिले तरी ज्या गावात आपले घर आहे तिथे जावेच वाटते,परत बाहेर पडण्यासाठी. तसेही आपला जवळचा आनंदच आपल्या मनाला सुखावतो.

    प्रत्येक गावात मला ओळखीच्या खुणा दिसतात, त्या गावातल्या प्रत्येक वळणावर माझे काहीतरी सुटले आहे,त्याला काहीसा प्राचीन इतिहास वगैरे असण्याची शक्यता आहे असे मला वाटत राहते. तिथल्या मातीत माझ्या गावाची माती असणार असे मला उगाच वाटत राहते.खरेतर मी कोणत्या एका गावाची नाही हे माझ्या इतके कोणाला माहित असणार आहे. मला वाटते मी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या खुणा दुसऱ्याच ठिकाणी शोधत राहते.ती गावं माझ्या बरोबर सगळीकडे फिरत असतात आणि तिथली माणसं तर माझ्यातच राहतात आणि येतात माझ्या बरोबर. त्या लोकांच्या गोष्टी,त्यांनी सांगितलेले सुख आणि दुःख माझ्या बरोबर चालत राहते.ते कधी मला धैर्य देते तर कधी उणीवा दाखवते.

🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴

No comments:

Post a Comment