Saturday, November 15, 2014

सूर्योदय आणि सूर्यास्त


  एका लहान मुलीला चित्रं काढण्याचे अतोनात वेड होते.तिला चित्रं काढण्यासाठी कोणतीही जागा चालत असे किंवा कुठे,कधी,केव्हाही हातात येणाऱ्या कोणत्याही साधनाने ती चित्रं काढत असे आणि स्वतः काढलेल्या त्या रेषांकडे ,आकृत्यांकडे मग्न होवून बघत  बसे.जर तिची तंद्री कोणी मोडली तर बाईसाहेब मोठ्याने भोकाड पसरत असत.लहान होती तोपर्यंत सगळ्यांनाच तिचं हे चित्रकार असणं फार आवडत होते. कारण त्यामुळे त्यांना तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नसत . पण जसजशी ती मोठी होवू लागली,शाळेत जावू लागली तसतशा तिच्याकडच्या अपेक्षा वाढल्या. तिचं असं तंद्रीत बसणं खटकायला लागलं. विशेषतः तिच्या पालकांना तिच्यात  वेडेपणाच्या छटा दिसायला लागल्या.म्हणून त्यांनी तिला कोंडून ठेवलं.तिच्याजवळ कोणतीही अशी वस्तू राहणार नाही,ज्यापासून ती चित्रं काढेल.याची त्यांनी नीट काळजी घेतली.मुलीला खूप राग आला.आदळआपट आरडाओरड ,किंचाळणे,दारावर धाड धाड आवाज करणे. हे सगळं करून ती थकली.शेवटी नीट वागण्याचा म्हणजे घरातली,शाळेतली सगळी कामं नीट करण्याचा वायदा झाला.( पण चित्र काढणार नाही’ हे मात्र तिने कबूल केले नाही.)तरीही कोणीच दार उघडले नाही.मनात संताप होताच.लहानच होती.चित्र न काढू देण्याच्या अनेक उपायांनी ती सतत ग्रासलेली होती. रागारागाने ती सगळीकडे थुंकली,शु केली आणि त्यातच काहीतरी गिरगटाला लागली,मनातलं अपार दुःख ती अशी व्यक्ती करायला लागली आणि हळूहळू शांत झाली. पहिल्या १-२ तासानंतर आवाज नाही.म्हणून संध्याकाळी पालकांनी दार उघडून पाहिलं तर पोर शांत होऊन  पडली होती. तिने तिच्या डोळ्यात कोणतीही ओळख नव्हती. ते घाबरले .आई रडायला लागली.मुलीची सूर्योदयाची,सूर्यास्ताची चित्रं गोळा करून दाखवली पण तिच्या डोळ्यात ओळखच नव्हती.सूर्याच्या प्रखर प्रतिष्ठेच्या आगीने तिला एवढे तप्त केले की तिच्यातली ती जळून खाक झाली.
  सूर्योदय आणि सूर्यास्त बघतांना ही गोष्ट मला नेहमी आठवते. त्या पोरीच्या डोळ्यांनी कितीतरी वेळा मी तो पाह्यचा प्रयत्न करते.अद्भुत वाटते.खरतर आपल्यातल्या खूपजणांना हिलस्टेशनला किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जावून सूर्यास्त बघण्याची हौस असते. रोज आपल्या गावात होणारा  सूर्योदय,सूर्यास्त पाहण्याचे अप्रूप वाटत नाही.मला मात्र त्याचे नेहमीच अप्रूप आहे.आपण जर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज पाहत असलो तर त्याच्या वेळा ऋतू प्रमाणे  बदलत जातात हे लगेच कळते.त्याचे  दक्षिणायन,उतरायण कधी सुरु झाले हे लगेच कळते आणि त्यातली गंमत अनुभवता येते.मग कॅलेंडर ,पंचांग बघण्याची जरूर भासत नाही. शिवाय सूर्योदयाच्या वेळा शांत असतात.त्या एक अख्खा दिवस तो तुमच्या स्वप्नासह तुमच्या ओटीत टाकतो,ते ही त्याच्या तेजसाहित.हा विचारच मला फार आकर्षित करतो. दिवसाची उमेद बाळगावी असा वाटणारा हा विचार असतो.कधी कधी तर सकाळी मी खिडकी उघडून त्याला बघते तेव्हा म्हणते सुद्धा,अरे बरं झालं तू वेळेत आलास ते.नाहीतर आज तुझ्याकडे मला बघायला वेळ झाला नसता. मग त्याची सोबत घेवून सकाळच्या कामांना छान सुरुवात करते. मला माहित आहे,’आज’ या दिवसांत तो जेवढा छान आणि  सुखावह वाटतो आहे तो पुढे कधीतरी वाटणार नाही. पण म्हणून ‘आज’ ला झाकोळून कसं चालेल.?

     सूर्यास्ताचे सुद्धा गणित आपण रोज तो बघत असू तर आपल्याला कळते.ऋतू प्रमाणे झालेला बदल लगेच लक्षात येतो.मग सूर्यास्ताच्या आधी दोन-पाच मिनिटे आधी जावून उभे राहता येते. आपल्या घरातूनच तो दिसत असेल तर मात्र सहज डोकावता डोकावता ही त्या वेळा आपल्याला साजऱ्या करता येतात. सूर्य स्वतःचा तेजस्वी साज हळूहळू काढून घेतो आणि ढगात लुप्त होतो किंवा डोंगराआड जातो किंवा समुद्रात बुडतो.तेव्हा तो पसरवत असलेल्या रंगछटा आपल्याला मोहून टाकतात. सहजपणे सभोवताली आपण पाहतो तेव्हा रंगाची मंद उधळण दिसते.खूप प्रसन्न,शांत,निवांत वाटते. एक प्रसन्न हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसत राहते.कितीतरी वेळ तो गेला त्या जागेकडे आपण पाहत राहतो.जणू तो परत पटकन “भो”करणार आहे. एकमात्र खरं रोज रोज सूर्यास्त पाहयची सवय लागली तर आपण त्यात खूप अडकून जातो. मला जर कधी गच्चीवर जायला उशीर झाला तर मी सरळ म्हणतेच,’अरे हे काय थांबायचं ना थोडे,मी येतच होते. एक माणूसपण त्याला देवून टाकते आणि त्याने पसरवलेल्या मनोहारी छटावर लुब्ध होते. त्याच वेळी आकाशात एखादा पक्षांचा थवा जेव्हा त्याच्या समोरून जातो तेव्हा वाटते,अरे चित्रकार काढतात ती चित्रं त्यांनी खरोखरीच अनुभवलेली असतात.तुम्हांला आठवत असतील अशी अनेक चित्रं,ज्यात संध्याप्रकाशात तळ्याचं,समुद्राचं पाणी चमचमते आहे किंवा प्रत्यक्ष आणि पाण्यात बुडणारा सूर्य,सूर्यास्त होतांना सुर्याजवळून जाणारा लहान पक्ष्यांचा थवा,संधीप्रकाशात तळ्याशी बसलेली तरुणी,,चिंताक्रांत म्हातारा,खेळणारी मुलं,आणि आपली छोटी मैत्रीण जी प्रतिष्ठेच्या दाहाने आपली निर्मितीच मूक करून बसली.खरतर तिचे हे मौन सुटावे म्हणूनच मी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहते.वाटते ती माझ्याबरोबरच आहे हे सगळं चित्र पाहत आणि भरेल कधीतरी ती रंग तिच्या स्वप्नांमध्ये.   

No comments:

Post a Comment