Tuesday, January 6, 2015

सुवासाचा राजा














एखादी गोष्ट म्हणजे एखादे झाड,फुल,एखादी व्यक्ती,प्रसंग,सिनेमा,नाटक,पुस्तक हे आपल्याला रोज दिसत असते,भेटत असते,आपल्या मनात ते अखंड सुमधुर असा नादही निर्माण करत असते,रुंजी घालत असते.पण तरीही आपण त्यावर लिहायला तयार होत नसतो. काय कारण असावं बरं याचं. आपल्याला त्याबद्दल काही वाटत नाही,किंवा त्या गोष्टीचे अस्तित्व आपल्या मनात काही तरंग उमटवत नाही असं तर मुळीच नसतं.उलट ते सदा सर्वकाळ आपल्याल जवळ आपल्या अगदी नकळत असतं. काही अध्यात्मिक लोकांच्या मन जसं सजग असते. तसं आपलं मन जरी वरील गोष्टी भौतिक असतील तरी त्याबाबत सजग असतं. त्याची जाणीव असते.कधी कधी मला वाटतं ,आपलं लहान मुलासारखं होत असेल म्हणजे त्याबद्दल बोललं,लिहलं तर ते आपलं अस्तित्वच आपल्यातून नष्ट करेल की काय ही भीती असते.माहित नाही .पण सोनचाफ्याच्या फुलाबद्दल मात्र मला असच काहीसं वाटत होतं.
    कधी भेटलं हे फुल मला? आठवत नाही.पण लहानपणी असेल. नंतर आम्ही ठाण्याला राहायला गेलो तेव्हा मात्र आम्ही रोज ती फुलं विकत घेत असू. त्याचवेळी मी मनाशी ठरवलं होतं की एक दिवस मी याचं झाड लावेन आणि रोज किमान एक तरी फुल मला मिळेल. आज मला माझ्या त्या निर्णयाची खूप मजा वाटते.कारण त्यावेळी आम्ही घर बांधू वगैरे असं काही डोक्यात सुद्धा नव्हतं.
        आज माझं सोनचाफ्याचे झाड दोन वर्षाचे झालं आहे. त्याचे रोप मिळावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला . त्या रोप वाल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे. कारण आपण जे रोप घरी नेत आहोत ते सोनचाफ्याचेच असेल  याची आम्हांला खात्री वाटत नसे. मग झाड लावतांना ते कुठे लावायचं यावर चर्चा.मला आपलं वाटायचं ते अशा ठिकाणी लावावं की मला लगेच फुलं काढता यायला हवी. म्हणून त्याला पहिलं पान आलं तेव्हापासून माझं त्याकडे बारीक लक्ष होतं. उन्हाळ्यात त्याला फार जपावं लागतं असं आम्हांला कळलं.मग मी त्यावर बारदान ओलं करून टाकलं ते जरा कोरडं पडलं की त्यावर पाणी शिंपडल आहे.कारण खूपजणांनी मला सांगितलं होतं की ,त्यांचे एक-दोन वर्षाचे झाड उन्हाने जळून गेले होते.’त्यामुळे मी त्याची खूप काळजी करत होते.अर्थात मला मी लावलेल्या प्रत्येक झाडाची काळजी असते. पण हे माझं विशेष लाडकं होतं.
  त्याचा सुवास मी फुल आलं नसतांनाही अनुभवला आहे.एखाद्या गोष्टीचे वेड लागणे म्हणजे काय याचा अनुभव मी घेतला आहे.कधी कधी त्या झाडाच्या जवळ आमची जी खिडकी आहे तिथे जवळ जावून मी म्हणायचे,अरे मला फुलाचा सुगंध येत आहे,फुल फुललं वाटतं. जावून बघायला पाहिजे’माझ्या या वाक्याकडे कोणी फार लक्ष देत नव्हते.कारण रोप घरी आणल्यापासून मी असं काही काही बडबडत आहे ,त्यामुळे फारसं लक्ष कोणी दिले नाही. झाड छान वाढले.मुख्य म्हणजे उन्हाला त्याने ताकदीने तोंड दिले. याबद्दल मी खरोखरच कौतुक केले.मग त्याला सांगितले की आता पाऊस येणार आहे,कदाचित वारं येईल,वादळ येईल.तू जपून रहा हं.हा माझा वेडेपणा होता असं मला आज वाटतं आहे.कारण हे झाड निसर्गाचा भाग आहे,त्याला हे उपजतच माहित असणार. कोणत्याही गोष्टीला तोंड कसे द्यायचे,ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे त्याला शिकण्याची गरज नव्हती.पण मी त्याचे मातृत्व घेतले होत ना?मग मी सावध करायचे.झाडाला सुंदर अशी हिरवी पाने आली.ते डेरेदार होत होतं आणि त्याबरोबरच माझा आनंदही डेरेदार होत होता.पण फुल कुठे आहे? तो सुवास मी झोपेतही घेत आहे,ज्या सुवासाने मला जाग  येत होती. मनात सारखं येत होतं की आता फुल यायला पाहिजे.हवंच आहे. मग मी रोज झाडाला सांगितलं ,मला फुलं हवी आहेत, खूप फुलं हवी आहेत.ये ना लवकर.
  एक दिवस मी रात्री गच्चीवर फेऱ्या मारत होते.वरून झाड सुंदर दिसत होतं.मी रोज निरखून पाहायचे.अगदी बारीक नजरेने आणि त्या नजरेत मला दोन कळ्या दिसल्या. आधी माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं ,नंतर मी खरोखरच मोठ्याने हसू लागले. माझा आनंद मनात,स्मितात मावत नव्हता.मी दोन्ही हात पसरले आणि त्या झाडाला कवेत घेत म्हटलं thank you .मग ती कळी किती मोठी झाली याचं निरीक्षण सुरु झालं. ती तिचा रंग कसा बदलते.हे ही पाहत होते आणि एक दिवस त्या झाडाखाली उभी राहिले असतांना तो मला वेडावणारा सुगंध आला आणि मी वर पाहिलं. हो ते तिथं होतं .पूर्ण फुललं होतं. मी हलकेच ते फुल ओंजळीत घेतलं,आणि प्रत्यक्षात स्वप्नात नव्हे मी त्याचा सुवास घेतला.एखाद्या गोष्टीची आपल्याला तहान लागते ना तशी माझी तहान या फुलाने शांत केली. थंड केली.माझं स्वप्नं पूर्ण  झालं.

  मला वाटलं की आता फुल आल्यावर मी त्या झाडापासून आपोआप लांब होईल.पण तसं घडत नाही. मी अजूनही फुल काढतांना तेवढीच वेडावते.एखाद्या दिवशी फुल आलं नाही की लगेच नाराज होवून झाडाला म्हणते,’बघ ना मला फुल नाही मिळालं आज” झाडत कुठेतरी लपलेली कळी असते.ती वाऱ्याच्या सहाय्याने मला दिसते आणि मला मजा वाटते की माझी इच्छा पूर्ण झाली. आता तर फुल उंच असेल तर ते काढण्यासाठी मला प्रचंड कसरत करावी लागते.पण मी तो माझा रोजचा व्यायाम समजून आनंदाने करते.या कसरती नंतर मिळालेल्या फुलाचा तर मला विशेष आनंद होतो. ते सोनेरी,पिवळं,नाजुक दिसणारं पण सुवासाने बळकट असणारं फुल माझ्या हातात असतं तेव्हा वाटतं ,आता खरा दिवस सुरु झाला कारण तो सुवासाचा राजा माझ्याजवळ असतो ना.

No comments:

Post a Comment