Thursday, March 10, 2016

शोध

  ज्या काळात ,ज्या समाजात , ज्या वर्गात, ज्या कुटुंबात आपला जन्म होतो त्यातून जगण्याकरता बरेच काही  मिळते. पण ते पुरेसे नसते. विशेषतः  सामाजिक आणि वैयक्तिक संक्रमण काळात त्याचा अपुरेपणा जास्त जास्त जाणवू लागतो. तो  जाणवल्यावर जी अस्वस्थता निर्माण होते  ती वाढता वाढता कधी ती तुमच्या आयुष्याला मुळापासून हादरा देते, अशावेळी तुम्हांला  चौकटीबाहेरचा आधार शोधावा लागतो. तो आधार कधी एखादी व्यक्ती असते, एखादी विचारप्रणाली असते किंवा एखादे पुस्तक असते. मग आपण त्या पुस्तकाला आपल्या मिठीत घेतो, आपलेसे करतो, सामावून घेतो. त्यातून मिळालेल्या नवीन उर्जेने प्रेरित होवून दुसऱ्या पुस्तकाचा शोध घेतो.
  अवघ्या विश्वाविषयी --- त्यातल्या सगळ्या बऱ्यावाईटा सकट ---आजही मला लहान मुलासारखी निरागस कुतूहलाची भावना टिकवून धरता आली आहे. त्यामुळे उत्सुकतेने आपोआपच वाचन होते.
     या वाचन आणि लेखनाने मला काय दिले याचा मी विचार करते तेव्हा लक्षात आले की, मी स्वतःच अंशाअंशाने स्वतःला मुक्त करायला शिकते आहे. अंतर्विरोधाशी मुकाबला करीत हे साधता आले तर पाहायचे.माझ्या मनात त्याबद्दल काय आहे याविषयी आज मी लिहित आहे.
      मी विवाहित स्त्रीवादी आहे.म्हणजे नेमके काय?तर दोन दिशांमध्ये माझी ओढाताण होते. एका बाजूला परंपरागत मुल्ये,संकेत,रीतीरिवाज ,आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी विचारप्रणालीशी असलेली माझी बांधिलकी- विश्वास म्हणू हवे तर.मला रीतीरिवाजांत एक प्रकारची सुरक्षितता ,स्वस्थता जाणवते.पण या रीतीरिवाजांनीच स्त्रीला दुय्यम नागरिकत्व दिले, ही गोष्ट आवडत नाही. मला पुरुषाशी असलेले दिर्घकालीन ,दृढ नाते आवडते,पण तिला कुणी ‘अर्धांगी’ म्हटले, की मला  आवडत नाही.पूर्ण पुरुष असतो, मग पूर्ण स्त्री का नाही?मला कुटुंब, कुटुंबातील विविध नात्यांनी आपल्याजवळ आलेली माणसे हवीशी वाटतात.इथे मला माझ्या स्त्री वादी  विचारांनी खूप मदत केली. माझी आई,बहीण,आत्या, मावशी काकू  आणि माझ्या सासवा, नणंदा ,जावा यांच्या कडे मी व्यक्ती म्हणून पाहायला शिकले.कोणाच्याही वागण्याचे विश्लेषण करतांना त्यांच्या आतल्या अंतर्विरोधाचा मी विचार करू लागले.आणि त्यातून मी त्यांना किती समजून घेऊ शकले ते माहित नाही पण मला स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेत मी अधिक सजग झाले.मग मात्र मला स्त्री वादा पेक्षा मानवतेची कल्पना अधिक व्यापक आहे, हे पटले.पण तरीही  माझ्या मनात प्रश्न येतो की,या जाणीवा बऱ्याच आधी झाल्या असत्या, तर त्यामुळे चित्र फार बदलले असते का? हे अंतर्विरोध नाहीसे झाले असते का? मला तसे वाटत नाही. कारण तो स्त्री जाणीवेचाच एक शाश्वत भाग आहे.मला वाटते आपल्याला मुळे ( रुट्स )हवी असतातच.पण त्या मुळांनीच जर करकचून बांधले ,तर म्हणजे A married feminist wants roots,but doesn’t want to feel rooted”. पण त्यातील अमुक बंधने नकोत, या भावनेतून तर विविध प्रकारचे अंतर्विरोध तयार होतात.

  तरीही प्रश्न राहतोच,मग याला मार्ग कोणता? मार्ग एकच. गुंता सोडवत राहायचे,आपले कुटुंबाशी, व्यवसायाशी, समाजाशी असलेले नाते शोधत राहायचे. समांतरपणे  शरीराशी- आणि फक्त स्वतःशी असलेले नातेही. कारण ते अधिक महत्वाचे. तो शोध लागत राहिला, तर मग फार ओढाताण होणार नाही. फार तुटल्यासारखेही वाटणार नाही. हा शोध घेणे सोपे नाही. त्यामुळे सापडलेले मार्ग नि:शंकपणे चोखाळणे हे ही सोपे नाही.हे ठाऊक असले, तरी थांबायचे नाही.मला वाटते शोधातूनच आपले दुभंगलेपण,गोंधळलेपण कमी होत जाईल. विरोधातून विकास साधत जाईल.जीवनाच्या या वाहत्या प्रवाहात आपणही अखंडपणे बदलत राहावे आणि अखेर कुठेतरी आपल्या ‘स्थायी’पणाला भिडावे. तसे कधीतरी घडेल या विचारानेच मी फार सुखावते, थरारून जाते.

Wednesday, February 3, 2016

. खरं स्वातंत्र्य


     “ स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला तिला सांगा ‘असं मिलिंद  त्याच्या  डॉक्टरला सांगत होता.असं म्हणतांना तो सानिया  कडे बघत होता.नंतर तो  तिला म्हणाला की, “प्रेमाने  तुझी आरोग्याची काळजी घेण्यास  सांगणे हा माझा हक्कच आहे.” हे ऐकून पहिल्यांदा तिला बरे वाटले आणि नंतर तो तिला डॉमिनेट करत आहे असे तिला वाटले.जेव्हा ती अलेन ला त्याचे जेवण वेळेवर घ्यायला सांगा,असं डॉक्टरांना सांगायला सांगते तेव्हा तो तिचे हे त म्हणणे तो मान्य करतो.पण याऐवजी जर ती म्हटली की,’माझे वडील एवढे काम करायचे पण ते तुझ्या सारखे नव्हते.ते वेळेवर जेवायचे ,तू का वेळेवर जेवत नाही? तर मग अलेनचा  चेहरा हा सगळ्या शहरात लांबोडा होतो.त्याला वाईट वाटते.
   आपण आपल्यावर लागलेली लेबलं स्वीकारू शकत नाही,हाताळू शकत नाही.त्या शिक्कां बरोबर आपला  अहंही गुंतलेला असतो.ते आपल्या  मनाच्या जवळ जातात.लेबल लावून  जे बोलले जाते ते फारसं चांगलं नसतं.म्हणून तर आपण लहान मुलांना लेबल लावू नका असं सांगत असतो.
  जर आपण आपल्या जोडीदाराला हे सांगितलं,” हिरव्या पालेभाज्या तुझ्यासाठी चांगल्या आहेत” तर तो त्या घेईल. त्या ऐवजी जर आपण  म्हणालो की,” पूर्ण शाकाहारी असल्या कारणाने मी तुला सुचविते तू पालेभाज्या खायला सुरुवात करावी” तर तो तुमच्याशी वाद घालेल.लेबल “शाकाहारी” अडचण उभी करते.
   जर आपण  म्हटलं,” क्षमा कर ज्यांना ,ज्यांनी दुखावले आहे त्यांच्यावरही प्रेम कर”तुमचे हे म्हणणे तो मनावर घेईल.पण जर आपण त्याला  सांगितलं,” खरी धार्मिक  म्हणून मी तुला  विनंती करते  की, त्या व्यक्तीला  क्षमा कर आणि शत्रूवर सुद्धा प्रेम कर” तर मग तुम्ही त्याचा लगेच शत्रू व्हाल. “धार्मिक  “ या लेबल मुळे समस्या निर्माण होईल.
   आपण आपल्या पत्नीला /जोडीदारणीला म्हणालात की ” आपली विमानतळ सुद्धा व्यवस्थित व्हायला हवीत” ती हे  म्हणणे मान्य करेल.पण जर तुम्ही तिला सांगितलं की,” सिंगापूरला राहतो आहे म्हणून  मला माहित आहे की विमानतळ किती व्यवस्थित असू शकतात ते.मला असे वाटते की आपलेही विमानतळ हे तसेच व्हायला हवे होते” आणि अशावेळी तुम्हांला देशा बाहेरचे समजले जाते.
    हा मानवी स्वभाव आहे.माणूस जेव्हा लेबलांना धैर्याने सामोरे जातो तेव्हा ,त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही.पण जेव्हा तो बचावात्मक पवित्रा घेतो तो स्वतःला सिद्ध करत राहतो. लेबल आपल्याला आपल्यात काही कमी आहे अशा भावनेचे दुःख देतात.
        आपल्याला  लेबलची काय गरज असते? एखादी विशिष्ट जागे मुळे/पदामुळे आपला  गौरव होती की आपल्या  मुळे त्या पदाचा गौरव होतो?खुर्चीला आपली  गरज आहे की आपल्याला  खुर्चीची गरज आहे?जर विशिष्ट लेबल मुळे आपण  ओळखले जाणार असू  तर त्या शिवाय आपण  काहीच करू शकणार नाही.जो लेबलच्या सहाय्याने जगतो त्याचे नातेसंबंध हे खोलवर नसतात.जर आपण  त्या लेबलला काही मूल्य दिलं तर आपल्याला  लेबलची गरज भासणार नाही.मग ती एक चांगल्या नातेसंबंधाची सुरुवात होईल.
    एक माणूस गुरु कडे आला,आणि म्हणाला,गुरुजी मला तुमचा शिष्य करून घ्या”त्यांनी विचारले,तू कोण आहेस? त्याने त्याचे नाव सांगितले,ते म्हणाले,”अरे हे तर तुझे नाव आहे,”मग त्याने सांगितले की मी व्यावसायिक आहे” तो तर तुझा उद्योग आहे,गुरुजी म्हणाले.ते सोडून तू कोण आहेस ते सांग ?तो म्हणाला,” मी पुरुष आहे” ते तर तुझं लिंग आहे” ते सोडून तू कोण आहेस ते सांग? तो म्हणाला,” गुरुजी मला माहित नाही मी कोण आहे ते? यावर गुरुजी म्हणाले,हे योग्य आहे,आता खरी सुरुवात होवू शकेल.जेव्हा तुम्ही तुमची सगळी लेबल टाकून देतात आणि तुमचे तुम्ही असतात तेव्हा शोध घेण्यास सुरुवात करू शकतात.तुमचे व्यवसायाचा उपयोग एखादा पुजाऱ्याकडे होवू शकतो.
  स्वतःला आणि इतरांना सुद्धा त्याचे लेबल टाकून देण्यास मदत करायला हवी.आपण आपले .असणे  पुरेसे असतो.हिच  प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे.जेव्हा आपण आपले  पुरेसे असतो  तेव्हा त्याला स्वातंत्र्य म्हणतात,खरं स्वातंत्र्य.


Thursday, December 10, 2015

दुपार


    “दुपार” कसा वाटतो हा शब्द?.असं मी बस मधल्या माझ्या शेजारणीला  विचारलं , तर तिने (स्वतःच्या ) कपाळावर( स्वतःच ) आठ्या आणल्या आणि  माझ्याकडे पाहिले. त्यामुळे मला समजले स्वनिर्मिती (आठ्या )ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आतच असते. तिच्या उस्फुर्त निर्मिती कडे पाहून क्षणभर मला तिचा हेवा सुद्धा वाटला. वाटल की चित्रकलेच्या वर्गात “दुपार” ची चित्रनिर्मिती करण्याच्या विषय न देता हा सोपा विषय दिला असता तर? पण “आठ्यांचे “चित्र काढणे हे कपाळावर आठ्या आणण्यापेक्षा काहीसे अवघडच आहे. पण तरीही तिच्याजवळ दुपार होती आणि तिने मला तिच्या पद्धतीने दाखवली.मी तिला मनापासून धन्यवाद दिले.कारण तिच्यामुळे मी दुपार कोणकोणत्या रुपात पाहू शकते हे मला कळले.
   एरवी “दुपार “ या नैसर्गिक घटनेकडे मी शब्द म्हणून पाहत होते. कधी कधी तिच्यापासून जो त्रास होत असे त्याचे वर्णन मी शब्दात करत असे.पण त्याचे  चित्र माझ्या दृष्टीने  पाहिले नव्हते. म्हणून वहिनीने जेव्हा  चित्रविषय “दुपार” सांगितले तेव्हा माझ्यापुढे आला “टळटळीत “हा शब्द,नंतर कडकडीत,शांत,भकास,दुपारची ही  शाब्दिक विशेषणे आणि वर्णने माझ्या अनुभवांना धरून येत होती.पण ती तेवढीच पुरेशी नव्हती.अर्थात काहीशा प्रयत्नाने ती अप्रतिम अशी जमली असती.पण त्या दुपारच्या अनुभवाचे वर्णन जे मी शब्दाने उभे करू शकत होते ते मी स्वतःच्या हाताने  चित्र काढण्यासाठी  मी पाहिले नव्हते. याची स्पष्ट जाणीव मला झाली.मग हळू हळू हे ही कळले की  त्यांच्यातले रंग मी बघितले नव्हते. त्यांच्या शाब्दिक रंगाचा खेळ माझ्या आसपास होता पण त्यातले आकार आणि रंगाचे खोल स्तर तर मी अनुभवलेच नव्हते.मी दुपार या शब्दाच्या चित्राला घाबरले होते. आपण उगीच यात पडलो असे वाटायला लागले होते कोणाला विचारावे तर ते ही शक्य नव्हते.पण आशा माझा हात कधी सोडत नाही म्हणून लगेचच मनात विचार आला ,आता  पडलोच आहोत  तर जसे जमेल तसे पूर्ण प्रयत्नांशी करून बघू. एका चित्रासाठी मी माझ्या विचारांचा लंबक नाही पासून हो पर्यंत जोरजोरात फिरवत होते. शेवटी तो हातात धरून मी म्हटले स्वतःशीच “मला हे चित्र काढायचे आहे” असं म्हणतांना मला स्पष्ट जाणीव होती की ,’माझ्या बोटात अजून ती जादू नाही”चित्र काढायला मी शिकत आहे.चित्र काढण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा दुपार माझ्या समोर वेगवेगळे रंग घेवून  येवू लागली.म्हणजे तिला रंग होते पण मी आज तिच्याकडे अधिक सजगतेने बघत होते.
     दुपारी बस पुलाखालून जात होती ,त्यावेळी मला कळलं की यावेळी रस्त्यावर गर्दी नसते आणि पुलाखाली काही माणसं बिनधास्त डुलकी घेत होते.. गाड्यांचे आवाज येत होते ,अंगावर धूर आणि धूळ दोन्ही उडत होते पण ते गाढ निद्रेत होते.आज आत्ता मला या सगळ्याचे एका विशिष्ट चौकटीतले चित्र दिसत होते.कुठून कसे चित्र पाहायचे, ते आपल्याला कोणत्या चौकटीत बसवायचे आहे आणि ती चौकट आपल्याला झेपणार आहे की नाही हे सुहास वहिनी जे क्लास मध्ये सांगत असते ते आताशा जरा कळू लागले होते.पण हे एवढेच पुरेसे नव्हते. त्याच्या पुढचा प्रवास मला घाम आणणार होता.असंच मला वाटत होते.
    दुपारच्या वेळी बसमधून उतरतांना फारशी घाई नसते. आम्ही सावकाशपणे गाडीतून खाली उतरत होतो.रिक्षा निवांतपणे उभ्या होत्या.काही रिक्षावाले आपापल्या रिक्षेत झोपले होते.फळ विक्रेता संध्याकाळची तयारी करत होता.तो फळं वैशिष्ट्यपूर्णरीतीने मांडत होता. त्याची बायको पाण्याची बादली आणून ठेवत होती.तिच्या अंगावर चमचमणारी डोळ्यात भरणारे रंग असणारी साडी होती. तिच्या कपाळावर सिंदूर होता. तो उन्हामुळे काळपट झाला होता आणि ओघळत होता.आजची दुपार मला हे काय दाखवत होती.माझंच मला आश्चर्य वाटत होते.
      रस्त्यावर एका घरा शेजारी असणाऱ्या झाडाच्या आडोशाला मुली सागरगोटे खेळत होत्या.वर उडणाऱ्या सागरगोट्या कडे त्यांचे आशेने बघणे आणि त्याच बरोबर हातात अचूक पकडण्याचे त्यांचे कसब मला मोहवून टाकत होते.मी मनातल्या मनात त्या खेळात भाग घेतला तर सागरगोट्या बरोबर मी ही वेगळ्याच विचारात गुंतले आणि शेवटी त्या  हाता बाहेर पडल्या .या दुपारीने मला अगदीच शहाणे करून सोडायचे ठरवले की काय?कोणाला कधी आणि कसे शहाणपण येईल हे काही आपल्या हातात नसते.ओट्यावर बायका गहू चाळत होत्या.नेहमीचे दळण असणार हे. गप्पा मारत मारत काम चालले होते.थोडे पुढे गेल्यावर केस विंचरणे आणि उवा काढण्याचे काम मन लावून चालले होते. आमच्या कॉलनीत पाण्याची लगबग चालली होती.कोणी हिरामणशी बोलत होते तर कोणी बागेला पाणी घालत होते.कोणी टाक्या भरत होते.अजून रस्त्यावर पाणी आले नव्हते.
   रिक्षाचा भोकाड पसरल्या सारखा आवाज आणि धूर दिसत होता. शाळेतील मुलं घरी आनंदाने आली होती.रिक्षेत भरपूर मोकळी जागा होती.पण मला फक्त रिक्षावाल्याचे पाय दिसत होते.लांबसडक पायाचा तळवा.घोट्यापर्यंत दिसत होते. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही.अचानक मला अशा लांबसडक अनवाणी पायांची आठवण झाली.पंढरपूरला मी हे पाय पाहिले आहेत, एका दुकानदाराच्या दुकानात त्यांची फ्रेम होती. हो ते हुसेन साहेबांचे पाय होते.हुसेन साहेब पंढरपूरचे आहेत.त्या माणसाचा त्यांच्यावर पार जीव होता.

  अशी ही दुपार मला हुसेन साहेबांचा साक्षात्कार घडवणारी.मला तर मजा आली. हे मी आज म्हणते आहे कारण उद्या माझ्या समोर काय आव्हान आहे हे मला माहित नाही.

Friday, October 2, 2015

डेस्टिनेशन सेवाग्राम


  












“अपनी आवश्यकताए बढाते रहने की पागल दौड में जो लोग आज लगे है; वे निरर्थक मान रहे है की, इस तरह खुद अपने स्वत्व में, अपने सच्चे ज्ञान में वृद्धी  कर रहे है. उन सबके लिए “हम यह क्या कर बैठे”? ऐसा पुछने का समय एक दिन आए बगेर रहेगा नही. एक के बाद एक अनेक संस्कृतियां आयी और गयी, लेकिन प्रगती के बढाई के बावजूद भी मुझे बार बार पुछने का मन होता है की यह सब किसलिए ? इसका प्रयोजन क्या? डार्विन के समकालीन वालेस् ने कहा की, तरह तरह की नयी नयी खोजो के पश्चात पचास वर्ष में मानव जाती की नैतिक उंचाई एक भी इंच बढी नहीं. तोलस्तोय ने यही बात कही. इसामसीह, बुद्ध और मोहम्मद पैंगबर सभी ने एकही बात कही है.”
                                                    म. गांधी
   हे सर्व म. गांधीच्या सेवाग्राम येथील कार्यालयाच्या बाहेर बोर्डावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहीलेले आहे. आज आपण सर्वजण त्याच समस्येला तोंड देत आहोत. आम्हीही या पागल दौड मधून थोडं थांबू शकलो. पण या पागल दौड मधून मुळातच नसलेल्या काही व्यक्ती तिथे भेटल्या. गांधीजीनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करत आहे. बाहेरच्या धावत्या जगापासून लांब राहून स्वतःला नक्की काय करायचं आहे हे त्यांना लवकर कळल्यामुळे त्या स्थिर नजरेने आणि बापूजींच्या विचाराने जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
  आम्ही सेवाग्राम पोहचलो तेव्हा रस्तावर आदल्या दिवशी उडालेल्या दिवाळीच्या फटाक्यांच्या खुणा आजूबाजूला दिसत होत्या. पण जसजसे बापुकूटीच्या दिशेने गेलो तसतसा शांत झालेला रस्ता अनुभवता आला. खुद्द बापूजींच्या आश्रमात गेलो तेव्हा प्रत्येकजण स्वतःची कामे शांततेने करत होता. तिथे कोरीयाहून तरुण मुलं-मुली आले होते. ते वर्षातून तीन वेळा ८-८ दिवसांची भेट देतात. तिथेच राहतात. आश्रमाच्या पद्धतीने जीवन जगतात. शिवाय गांधीजींचे विचार आजच्या काळात कसे उपयोगी आहेत याचा अभ्यास करतात आणि चर्चेद्वारे एकमेकांना सांगतात.
   आश्रमात गांधीजी जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा ते ज्या ठिकाणी राहिले ती जागा आजही तशीच सुव्यवस्थित ठेवलेली आहे. घराच्या पांढऱ्या मातीच्या भिंती, जमीन आणि लाकडी खांब हे त्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून बनवलेले आहे. त्याला ‘आदिनिवास’ असे म्हटले जाते. आपण त्या ठिकाणी शांत बसू शकतो आणि आपल्या आतल्या आवाजाला साद घालू शकतो. काहीशा प्रयत्नाने तो आपल्याला नक्कीच ऐकू येईल. पण त्यासाठी प्रयत्न हवेत. कारण आजच्या गोंगाटाच्या काळात त्याला आपल्या सादेची सवयच नाही. म्हणून रोजच्या हळूहळू प्रयत्नाने तो आपल्याला निश्चितच ऐकू येवू शकतो. ‘आदिनिवास’ सारखेच ‘बा’ कुटी ही तिथ आहे. त्यांचे न्हाणीघर, त्यांनी वापरलेल्या वस्तू, गांधीजीचे ‘बा’ ला लिहिलेले पत्र ज्यात “तुझ्याशिवाय मी असूच शकत नाही” हे सांगितले आहे. तसेच त्यांनी “बा” ची केलेली सेवा याचेही वर्णन तिथे लिहिले आहे. तिसरी कुटी आहे- बापूजींचे दप्तर. तिथे पुस्तके ठेवलेली आहेत. ते वापरत त्या वस्तू- उदा.-दगडाचा पेपरवेट,-पेनपात्र इ. एका कुटीला ‘आखरी निवास’ म्हटले आहे. गांधीजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उसळलेली दंगल शांत करण्यासाठी इथून गेले ते परत आलेच नाहीत. ह्या सगळ्या कुटी मध्ये आपण बापूजींना अनुभवू शकतो. कारण आपण त्यांच्या बद्दल वाचलेलं असतं आणि एका ऐतिहासिक वस्तुत उभे असतो.
   एका साध्या माणसाने आपल्या सोप्या सहज वाटणाऱ्या पण आचरण्यास अवघड अशा विचारानी सारा देश ढवळून काढला. जगाला अचंबित केले. कोणती शक्ती होती त्यांच्याजवळ? या विचाराने आपण त्यांच्याविषयी अधिक जागृत होतो. ते फक्त राजकारणासाठीच केवळ आपला आदर्श ठरत नाहीत, तर पार स्वयंपाक घरापर्यंत ते आपल्याला आदर्शवत वाटतात. जेवतांना कोणते नियम पाळायचे हे त्यांनी सांगितलेले आहेत. ते तिथल्या जेवणघरात लिहून ठेवले आहेत. साध्या गोष्टी पण त्याचा समोरच्या माणसावर कसा परिणाम होईल याची अचूक जाण त्यांच्या जवळ होती. अत्यंत साधं जेवण, शिवाय त्या आश्रमाच्या शेतात पिकलेला भाजीपाला, धान्य यांचा योग्य वापर तिथे होतांना दिसतो. गांधीजी म्हणत की एखादी भाजी कच्ची राहिली असेल तरी ती तशीच सोडून द्या. त्यामुळे तुम्ही काही अर्ध पोटी राहणार नाही. जेवणात काय कमी आहे किंवा त्रुटी आहेत हे नंतर चिठ्ठी लिहून त्या व्यक्तीजवळ सांगा. पानावरच रागवू नका. आज घराघरातल्या सर्वांनी ही सवय अंगिकारली पाहिजे. नाहीतर आपल्याला जेवणावर टीका-टिप्पणी करण्याची कोण घाई होते. तीच तत्परता मात्र आपण कौतुक करण्यावेळी दाखवत नाही.
    आश्रमात पहाटे ४.४५ वा. प्रार्थना होते. त्या प्रार्थनेत संस्कृत श्लोका बरोबर, मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मातील प्रार्थनांचाही समावेश आहे. पहाटेच्या वेळी नुकतेच उजाडायच्या वेळी सर्वत्र शांतता असतांना म्हटलेली प्रार्थना हा एक चांगला अनुभव आहे. आपण ज्या रस्त्यावरून जाणार आहोत त्या रस्त्यावर गांधीजींच्या या प्रार्थना सोबत करतात असे वाटते.
   आश्रमात  सकाळी ७ वा. नाष्टा असतो. नंतर आपण आश्रमाच्या कामात मदत करायची. शेतात, गाईचे करण्यासाठी, स्वयंपाकघरात किंवा इतर ठिकाणी मदत करायची. ते आपल्याला सांगत नाहीत. आपण होवूनच ती करायची. नंतर ११वा. जेवण १२वा. विश्रांती. नंतर परत काम. ५ वा. जेवण. संध्याकाळी ५.३०ला प्रार्थना असते. असा सर्वसाधारण दिनक्रम तिथे आहे. वेगवेगळ्या धर्म-जातीतील लोक तिथे सतत भेट देत असतात. उत्सुकतेने आपले प्रश्न तेथील कार्यकर्त्यांना विचारतात. ते ही त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न करतात. अन्यथा कोणत्या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे ते सांगतात. तेथे राहणारे कार्यकर्ते हे देशाच्या विविध भागातून आलेले आहेत आणि तरुण आहेत. ”पागल दौड” मधून बाजूला झालेले आहेत.
    मालती देशमुख ह्या गेल्या १२ वर्षांपासून तिथे राहत आहेत. मालतीताई लहानपणापासूनच गांधीजीबद्दल ऐकत होती, वाचत होती. ती सुरुवातीला थोड्या दिवसासाठी आश्रमात राहियला आली आणि नंतर कायमचे इथेच राहायचे असे तिने ठरवले. अत्यंत साधा पोषाख, आश्रमातील सर्व बारीकसारीक गोष्टींकडे परिपूर्ण लक्ष आणि काम करण्यात आणि मदत करण्यात तत्परता. गांधीजीविषयीच्या गोष्टी ती जशी आपल्याला छान सांगते, तशी आश्रमातील गोठ्यातील गायींचे कौतिकही ती फार प्रेमळपणाने करते. गायीबद्दल तिचा जिव्हाळा प्रत्यक्ष पाहण्यासारखा आहे. गाईचा गोठा म्हंटले की आपण नाकावर लगेच रुमाल धरतो. पण आश्रमातील गाईंच्या गोठ्यात गो पूजनाच्या दिवशी एक छान गाण्याचा कार्यक्रम होवू शकतो. तिथे पाच पन्नास जण ऐसपैस मांड्या घालून बसू शकतात. इतका स्वच्छ तो गोठा आहे. येथील प्रत्येक कार्यकर्त्याला दरवर्षी एक काम सोपवले जाते. त्याचे वर्षाच्या शेवटी मुल्यांकन होते. यावर्षी सडा आणि गाईचे काम मालती कडे आहे.
    इथे मालतीताई बरोबरच जेनी व ललिता या आसामहून आलेल्या मुली आहेत. जेनी ९ वर्षापासून एकटी राहते तर ललिता ५ वर्षापासून . तसेच विनोद भाई पण एकटे राहतात. या सगळ्यांनीच आश्रमाचे जीवन कंटाळा न करता स्वीकारले आहे असे त्यांच्या वर्तनातून दिसते. प्रत्येकजण गांधीजींनी केलेल्या विविध प्रयोगात जाणकार आहेत. कोणी आपल्याला ‘नई तालीम’ विषयी माहिती देतात, तर कोणी गांधीजींच्या अहिंसे विषयी सांगतात. आपल्या प्रश्नांना ते त्यांच्या परीने भिडतात. या ठिकाणी आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची गुंतवळ सोडविण्यास हा परिसर नक्कीच मदत करतो. फक्त आपल्याला ‘पागल दौड’ मधून थोडेसे बाजूला सरकावे लागते. त्यामुळे आपण नकी मागे पडणार हे मात्र नक्की.
                                                           
    


Wednesday, September 16, 2015

पेरते व्हा.

                                  







  गेल्या तीन महिन्यांपासून रोज सकाळ संध्याकाळ “ पेरते  व्हा” चा गजर होत आहे. पानांच्या आडून तो सारखा ओरडत असतो म्हणून त्याला शोधत अनेक झाडांना  दुर्बिण लावली.मग दुर्बिणीपेक्षा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास अधिक वाटला म्हणून ती बाजूला ठेवली आणि डोळे ताणून ताणून त्याला शोधलं.तर तो पानांच्या गर्दीत लपून आपलं काम करत होता.हो खरच तो “पावशा” होता.सगळ्यांना “पेरते व्हा” ची हाक देण्याचे काम पोटतिडकीने करत होता.त्याला बघून माझ्या डोळ्यात खरं तर पाणीच आलं. खूप दिवसापासून त्याला शोधत होते.आजूबाजूला चाललेल्या या गोंधळात त्याचीच हाक जणू मला वाट  दाखवत आहे  असंच वाटते . तो आहे आणि काहीतरी चांगलं पेरायला सांगत आहे हे ऐकून तर मन खुश होत होतं.वाटायचं हाच एकमेव असा आहे की ज्याला कोणत्याही अभिनिवेशा शिवाय काहीतरी चांगलं पेरायचं आहे.मन हलकं झालं, आणि त्याच बरोबर मनाला  वस्तुस्थितीची करकरीत जाणीव झाली.
    हो जून महिन्यापासून पावसाळा सुरु झाला पण पाउस काही नीट पडला नाही.रस्ताही ओला झाला नव्हता.कुंडीतली झाडे सुद्धा वरून दिलेल्या पाण्यात खुश नव्हती त्यांना रिमझिम सरीच हव्या होत्या.विहिरीतल्या पाण्यावर लावलेला सोयाबीन सुद्धा वर तोंड करून बसला होता.पण पाउस रुसलाच होता.तो भरून येत होता पण हट्टीपणे तो ढगांचा हात सोडत नव्हता. जणू खाली आल्यावर आम्ही त्याला खुशाली विचारणारच नव्हतो.त्याची ठेप ठेवणार नव्हतो.असं वाटत होतं का त्याला?की तो यावा असं आम्हांला वाटत नाही अशी आमची वागणूक होती.खरंतर सगळेचजण मनोमन सारखी त्याची आराधना करत होते पण तो कोणत्याही प्रार्थनेला फसायचं नाही असंच जणू ठरवत होता. वर्षोनुवर्षे आम्ही जे वागत आहोत त्याचं फळ तो अशारीतीने आम्हांला देणार होता.   
 पाउस असा हट्टीपणा करत होता आणि पावश्याही  हट्टीपणे “पेरते व्हा” असं सारखं सांगत होता.बी पेरण्यासारखी परिस्थिती नसतांना हा आणखी काय पेरायला सांगत असावा कोण जाणे? अर्थात सगळीकडे अनेकजण विशिष्ट चौकटीत असणारी आपली ठाम मते   आपल्या परीने पेरत  आहेत .,पण त्या सगळ्या विचारांचा सर्व सामान्य माणसाला उपयोग  होईल का? की त्रास होईल.?विरोधी मते असणारी माणसे एकमेकांच्या मतासाठी किंचितशी तरी जागा देतील का?थोडं वेगळ्या वाणाचे बी पेरून बघतील का? असा विचार कोणी करत असेल का?तो त्यांनी करावा हेच तर पावशा सांगत आहे असं मला वाटतं.एवढ्या मतमतांतरे असलेल्या समाजात तो फक्त “पेरते व्हा” ची हाक देतो आहे हेच खूप सकारात्मक आहे. असे मला वाटते.
    
    

   

Sunday, July 12, 2015

अनुभवांना स्मृती असतात पैशांना नाही .


   आपल्याला  आपल्या  शिक्षणासाठी किती पैसे लागले हे माहित नसतं,पण आपल्या  शाळेतील आणि कॉलेजमधील आठवणी आपण  आयुष्यभर काढत असतो .आई वडिलांच्या  दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले हे आपण  काही दिवसांनी विसरून जातो ,पण आई वडिलांच्या  चैतन्यदायी आठवणी नेहमी आपल्याला  आठवत असतात,किंवा आपल्या  तान्हुल्याचा जन्म आणि त्या संबंधित आठवणीना आपण  जीवनभर उजाळा देत असतो .आपल्या  हनिमून साठी किती खर्च झाला हे आपल्या  लक्षात रहात नाही पण आपल्या  शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला एकमेकांबरोबर काढलेले ते सुंदर दिवस आठवत रहातात.पैशांना आठवणी नसतात तर अनुभवांना त्या असतात.
   चांगला –वाईट काळ,समृद्धीचा आणि गरिबीचा काळ,भविष्य सुरक्षित असण्याचा काळ आणि उद्या काय  वाढून ठेवलं आहे हे माहित नसण्याचा काळ,जीवन एखाद्या  चक्रीत बसलो आहे असं वाटण्याचा  काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .जीवन विपुलतेने भरलेले आणि काहीच नाही असे असले तरी शेवटी काय उरते तर तेव्हा घेतलेल्या अनुभवांच्या आठवणी.काहीवेळेस खिसा पूर्ण भरलेला असतो तर काहीवेळेस पूर्ण रिकामा.काहीवेळेस पुरेसा पैसा असतो  तरी आपण  चिडचिड करतो . काहीवेळेस पुरेसा पैसा नसतो तरी आपल्या  चेहऱ्यावर स्मित असते.आज आपण  मागे वळून पहिले तर आपण  एकमेकांबरोबर बसून किती हसलो याची आठवण काढली तर आपल्या  डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतील आणि आपण  एकटेच बसून किती रडलो  हे आठवलं तर आपल्या  चेहऱ्यावर स्मित येईल.या सगळ्यामध्ये जीवन आपल्याला  आपला  स्वतःचा इतिहास निर्माण करण्याचा अनुभव देते आणि त्या आठवणीनी आपले जीवन भरून जाते आणि त्या नेहमी आपण  आठवू शकतो .
   प्रथम आपण  कोणाच्या मदतीशिवाय सायकल चालवायला शिकलात......,कोणाच्या मदतीने गाडी शिकलात ?
  आपल्याला प्रथम कोणी मैत्री साठी प्रथम विचारले?
आपल्या  मुलाचे पहिले रडणे,पहिलं पाउल,पहिला शब्द,पहिला पापा.....
आपल्या  पालकांनी आपल्याला  दिलेली पहिली भेट आणि आपल्या  मुलाने/मुलीने दिलेली पहिली भेट....
  आपलं  पहिलं बक्षीस, लोकांनी  पहिल्यांदा स्वीकारलं तो दिवस,आपला  स्टेज वरचा पहिला कार्यक्रम.....
ही यादी न संपणारी आहे...अनुभवांच्या आठवणी ह्या कालातीत असतात.
हे कोणी नाकारू शकत नाही की कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो.पण वस्तुस्थिती हीच शिल्लक राहते की त्या अनुभवासाठी किती पैसा खर्च झाला हे विसरले जाते पण तो अनुभव नाही,कधीच नाही.
   आर्थिक मंदी आली तरी त्याने काय होते?येवू द्या.पण आपल्या  जीवनाच्या गुणवत्तेत मंदी यायला नको . त्यामुळे कदाचित आपण आपल्या पालकांच्या काही इच्छा पूर्ण करू शकणार नाही .  पण काही नक्कीच पूर्ण करू शकू . आपण आपल्या   मुलाला पर्यटन स्थळी नेवू शकणार नाही पण स्थानिक बागेत नेवून त्याच्या बरोबर खेळू शकाल ना?पैशामुळे या सगळ्यांची किंमत कमी होणार आहे असं नाही किंवा तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर घेतल्याने त्याची किंमत कमी होणार नाही.मंदीच्या काळात  ,ज्ञान विकसित करा,आध्यात्मिक वृद्धी करा या सगळ्या गोष्टी काही पैशावर अवलंबून नसतात.
  काळा बरोबर आर्थिक स्थिती सुधारेल..चलनाला किंमत येईल.या सगळ्या काळात आपण  मागे वळून पहिले तर आपण  काहीच केले नाही केवळ खिन्नतेने लोळत पडलो  असं व्हायला नको.मंदी मुळे आपल्या  कडे पैसा येणार नाही,पण अनुभवांची कमी असणार नाही.जे आपल्याकडे  आहे त्याने आपण  आनंदी होणार नसू  तर आपल्या  कडे कितीही असले तरी आपण  आनंदी होवू शकणार नाही.
   मला कसं आणि काय वाटतं आहे हे माझ्याजवळ किती आहे यावर अवलंबून नाही हा जीवनाचा विचार असेल तर मस्त जगू आपण.


Friday, June 19, 2015

बा मना









    आज सगळ्यात जास्त कसली गरज आहे? आजूबाजूला चाललेल्या अनेक घटना आपल्याला सगळ्यांनाच अचंबित करत आहेत. मोठ्या संख्येने लोक हातात शस्त्र धरू लागले आहेत. कोणी कोणाचे जराही बोलणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. अरे ला कधी एकदा कारे म्हणतो याची घाई झाली आहे. एखादा विचार का पटतो आणि एखादा का पटत नाही याची कारण मीमांसा करायला वेळ नाही.आपल्याला एखादा विचार पटत नाही मग त्या विचाराचे खंडन करण्या ऐवजी तो विचार, मत मांडणाऱ्या व्यक्तीलाच संपवणे सोपे वाटत आहे. असं काय झालं आहे आपल्याला की आपण इतके हायपर होतो आहे. का कोणाचे ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही? चर्चा सुद्धा नको आपल्याला? असं म्हणतात की आजचे युग अधिक उदारीकरणाचे आहे, आधुनिक विचाराचे आहे?मग यात दुसऱ्यांच्या विचाराला काहीच जागा नाही का? असे कसे आपण उदार, आधुनिक, मग जुनी माणसे परवडली ना? ते निदान ऐकून तर घेत होते,कोणाचा जीव घेत नव्हते. एखाद्याच्या घरा  समोर जाऊन तमाशा करण्यापेक्षा एकमेकांचे विचार समजावून घ्यायला आपण भेटू शकत नाही का? एकमत होणार नाही पण हे तर मान्य करू आपली मते भिन्न आहेत पण ती आहेत. हे स्विकारूया.काय वाटते. पण यासाठी आपल्याला गरज आहे सुंदर मनाची. खरच आपल्याला फार गरज आहे सुंदर मनाची.
   आपण एखादे ठिकाणी काम करतो आणि ते काम व्यवस्थित व्हावे म्हणून जशा आपल्याला वेगवेगळ्या कार्यशाळेला हजर राहावे लागते. त्यामुळे आपण आपल्या कामात काही बदल करतो,सहकाऱ्याला समजावून घेतो तसे हा समाज वेगवेगळ्या विचारांचा आहे,आणि तो तसा वेगळा विचार करण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी, त्यातच समाजाचा  जिवंतपणा आहे.तो जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि समाजात चैतन्य राहावे म्हणून आपले मन सुंदर असणे गरजेचे आहे असे मला वाटते. ते सुंदर होण्यासाठी आपण काही गोष्टी मुद्दाम शिकायला हव्यात. ते कसे?
२.कसे मान्य करायचे विचार.
   सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात,किवा एखाद्या  व्यक्तीचे विचार,मत,भावना यातील कोणते मुद्दे तुम्हांला  मान्य होत आहे ,याचा शोध घ्यायला हवा. खरंतर हे खूप अवघड काम आहे.
    हे अवघड आहे कारण तुम्हांला सहमत असणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवे,त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. म्हणजे त्या व्यक्ती समोर हो हो म्हणायचे पण मनात मात्र  नकारात्मक विचार करायचा.एखाद्याचे  मत मान्य असणे फार अवघड आहे याचे मुख्य कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. तुमचे बालपण, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती,तुम्ही राहता ती जागा, शहर,गाव, तुमचे शिक्षण. प्रत्येकाची आपल्या विचारामागे काही पार्श्वभूमी असते.काही लोक मतभेद नोंदवतात तर काही लोकांचा सर्व गोष्टी मान्य करण्याचा कल असतो.
     एखाद्या विचाराशी ,एखाद्या मताशी सहमत आणि असहमत असण्याची दोन टोक असतात.
जसे काही म्हणतात...
 तुम्ही एकदम बरोबर आहात...
मला तू म्हणतो ते सर्व मान्य आहे...
मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे...
एकदम बरोबर..
 मला शंभर टक्के मान्य आहे     
      असे जर तुम्ही सर्वच गोष्टीशी सहमत असाल तर तिथे चर्चेला काहीच वाव नसतो. जागा नसते आणि मतांची देवाणघेवाण करता येत नाही. एकादी व्यक्ती एखादे व्याख्यान देत आहे , ते छान असेलही,पण तुमच्या सहभागाला त्यात काहीच महत्व नसेल तर तुम्ही त्यातून काहीच मिळवू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादाची वक्त्याला जर गरज वाटली नाही तर त्याचा विचार तुम्ही समजावून घेऊ शकणार नाही.
    अशा वेळी अजून दुसरे टोक दिसते.
हो.पण .....
मला हे पूर्णपणे मान्य नाही....
तू त्या ठिकाणी चुकीचा आहे.....
 हे असे नाही.......
        या ठिकाणी व्यक्ती जे जे काही सांगितले आहे, त्या सर्व गोष्टी अमान्य करतो आहे. अशी व्यक्ती असहमती दर्शवून हा प्रचंड युक्तीवादी  व्यक्ती स्वतःचे श्रेष्ठत्व  प्रस्थापित करू इच्छितो. उच्चशिक्षित माणसं सुद्धा नेहमी अशा प्रकारे वागतात. कारण तसं वागण्याचं त्यांना धैर्य असतं. अशा प्रकारचे मन हे तीव्र संताप आणणारे असते आणि ते सुंदर मनापासून फार दूर असते.
    आपण  या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असायला हवे. आपण  सगळ्या गोष्टी मान्य करू नये  आणि सगळ्या गोष्टी अमान्यही करू नये.असे मला वाटते .





  योग्य असण्याची गरज-
            या ठिकाणी आपण अहंकाराने बांधले गेलेलो असतो. युक्तिवाद हा दोन अहंकारामधील युद्ध असते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सहमती दर्शवतात तेव्हा तुम्हांला वाटते की तुम्ही मुद्दाच्या दुसऱ्या बाजूने विचार करत आहात. म्हणून तुम्ही स्वतःला गमावतात. जेव्हा तुम्ही असहमती दर्शवतात तेव्हा तुम्ही तुमचा अहंकार ठासून सांगतात आणि तुम्ही श्रेष्ठ असल्याचे सुचवतात. शाळेत, समाजात युक्तिवादाला आणि वादविवादावर अधिक जोर दिल्यामुळे अशा प्रकारच्या अमान्यता  अधिक मजबूत होतात,अशाच प्रकारचे वर्तन सरकारात,न्यायालयात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा दिसते. सरकारात  सुद्धा विरुद्ध पार्टी नेहमी सत्तेत असणाऱ्या पार्टीला विरोध करते.मग परिस्थिती कशीही असो. अनेक लोकांना यात मुर्खपणा दिसतो.
    जर तुम्ही विजयी युक्तिवाद करतात असे सुचवित असाल, तर तुम्ही  युक्तिवादाला जिथून सुरुवात करतात तिथेच शेवटी येतात यात तुम्ही फक्त  तुमची युक्तिवाद करण्याची क्षमता दाखवतात. जर तुम्ही युक्तिवादात हरलात तर तुम्हांला नवीन काहीतरी मुद्दे सापडण्याची शक्यता असते. नेहमी आपलेच बरोबर असणे ही महत्वाची गोष्ट नाही आणि ती निश्चितपणे सुंदर नाही.

      चर्चा  ही प्रामाणिकपणे खरी असावी, त्यात अहंकारातील भांडणापेक्षा विषयाला महत्व द्यायला हवे.