हत तेरी
मनात आलं की मरण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे,म्हणजे एखादा आजार तरी पाहिजे,नाहीतर आपण कशाने मरणार? कारण कितीतरी लोक वयस्कर होतात पण त्यांना काहीच होत नाही,आणि मग ते मरत नाही. निराशा, एकटेपणा,याने ते त्रासून जातात. मग मला वाटलं की मला वेळेत मरायचं आहे तर मला काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे काहीतरी दुखणे असेल तर बरं. गोळ्या औषधे,डॉक्टर आणि असा आजार कोणाला झाला असेल तर त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीविषयी बोलायला विषय राहतील. म्हणून मी विचार केला की काहीतरी झालं पाहिजे आपल्याला. तर रात्रीतून युरिन इन्फेक्शन झालं. हल्ली ते बऱ्याच वेळा होतं. सर्व प्रकारच्या चाचण्या करून झाल्या पण कारण काही सापडलं नाही. घरातच असते, त्यामुळे बाहेरच्या स्वच्छता गृहाचा संपर्क येण्याचा प्रश्न नाही.
मग विचार आला की मरण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? तर कणिक भिजवलेली होती आणि कुकरला अख्खी मसूर लावली होती. म्हटलं समजा आपण गेलोच यावेळी तर फारसे काही बिघडणार नाही. तेवढ्यात विचार आला की रात्रींची पोळी शिल्लक नाही, आणि समजा मी मेलेच तर घरातील वयस्कर लोकांची खाण्याची आबाळ होईल.मग पोळ्या कराव्यात आणि वरण फोडणीला घालावं. म्हणजे बाकी लोक जमे पर्यंत यांची पोळी खाऊन होईल, गोळी घेऊन होईल आणि मग त्या इतर टूकुमुकू बघायला मोकळ्या होतीत. शिवाय आज त्यांचा वेळ जास्त चांगला जाईल. माणसं घरात येतील,फोनचा आवाज येत राहील. यात वयस्कर मंडळीचा टाईम पास होईल.
ही वेळ मरण्यासाठी योग्य आहे का? स्वतःला विचारलं. म्हटलं स्वतःच्या दृष्टीने विचार कर. तर वाटलं तसं काही फारसं करायचं राहिलेलं नाही. जगात बदल घडवून आणण्याइतके आपले व्यक्तिमत्व थोर नाही,त्यामुळे पोकळी वगैरे निर्माण होणार नाही.संसार तसा करून झाला आहे,देशभर,जगभर फिरायचं होतं पण आता ते पुढच्या जन्मासाठी ठेवलं तरी चालेल. म्हणजे आता त्याची तशी घाई नाही. काही पुस्तके वाचायची राहिलेली आहेत. पण मेल्यावर कोण विचारणार आपल्याला की हे वाचलं का ? ते वाचलं का? त्यामुळे वाचलं नाही तरी चालेल. असा निर्णय घेतला. पण वाचनालयाची पुस्तके कोणाला तरी परत करायला सांगावी लागतील. तसेच घरातील पुस्तकांचे काय करणार? याबाबत मी काहीच सांगून ठेवले नाही. ते ही सांगून टाकते. म्हणजे मोकळी होऊन जाईल.
मग स्वतः लिहलेल्या गोष्टींचे काय करायचे? हा विचार मनात आला.अरे देवा.हा पाश आहेच का अजून असं जरा नाटकीपणे म्हटलं. आणि विचार करू लागली की स्वतःचे लिखाणाचे काय करावे? म्हणजे त्यातून काही सामाजिक बदल वगैरे होईल असे काही नाही. पण थोडेफार मनोरंजन होऊ शकेल. कारण लिहतांना माझे झाले ना तसेच.काय करावं कळेना. कालच एका मैत्रिणीने माहीती पाठवली की संपादन करून द्यायला लोक तयार आहे आपण फक्त मजकूर पाठवायचा. अर्थात फी देऊन. तर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटलं. मग घाईघाईने laptop उघडला आणि गोष्टी कुठे कुठे लिहून ठेवल्या आहेत त्याचा धांडोळा घेतला. तेव्हा लक्षात आले की एका जागी व्यवस्थित काही नाही. ते नीट लाईनीत लावले पाहिजे. म्हणजे फारच काम आहे बुवा. हत तेरी
गोळ्या घेतल्यामुळे युरिन इन्फेक्शन कमी झाले होते,भूकही लागली होती. म्हटले मरण परत कधीतरी अनुभवू ,आता लिखाणाचे काम आणि जेवण महत्वाचे आहे. शेवटी .
माना के मुरत -ए -खाक से बेहतर नहीं हूँ मैं
लेकिन हवा के रहम-ओ -कर्म पर नहीं हूँ मैं
माझ्या आयुष्याच्या मानाने शेर फार मोठा आहे ना? मी लिहलेला नाही तो.
मला माहीत आहे एक मूठ माती एवढीच माझी योग्यता आहे,याहून अधिक किंमत नाही. पण म्हणून एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने थोडीच मी मरेन. वाऱ्याने यावं आणि छान आनंद पसरू द्यावा. असेच मला वाटते.
No comments:
Post a Comment