कवडसे
Friday, January 30, 2026
आगळ्या व्रताची वेगळी कहाणी.
नवजिवतीची कहाणी ( श्रावणातल्या कहाण्या )
Monday, January 26, 2026
क्षणाची गोष्ट
ठमी १
माझे नाव तुम्हाला कळलेच असेल,ते एका क्षणा सारखे आहे,म्हणजे तो आत्ता आहे आणि लगेच नाही. म्हणजे काय हे मला तरी कुठे माहीत असायला. म्हणजे त्याची माहिती,वर्णन नाही पण मला उगाच्वत्ते तो क्षण माझ्या नावसारखाच संपून जाईल.
मी आत्ता वर्तमानात आहे म्हणजे तुम्ही सुद्धा असणारच .भविष्यात सुद्धा तुम्ही असणार का?मी असेल का? म्हणजे ते भविष्य आहे हे आपल्याला कसे कळेल?
पुस्तके जातात तेव्हा
कवी म्हणाला होता की आपण गेल्यावर पुस्तकांचे काय होणार? कोण त्यांच्यावरून हात फिरवणार? त्यांच्याशी मायने कोण वागणार? गेल्यावर पुस्तकांचे काय होणार हे माहीत नाही.कारण माझ्याच घरातून माझी इच्छा नसताना माझी कितीतरी पुस्तके केवळ घरात पसारा दिसतो म्हणून जात आहेत.ती योग्य ठिकाणी पोहचली वगैरे याचे मला कधीच समाधान वाटत नाही.माझी पुस्तके मला माझ्याच जवळ हवी असतात. हल्ली माझी विरोध करण्याची क्षमता संपली आहे.दरवेळी तो वाद,रडारड नको वाटते.कारण मला पुस्तके का हवी आहेत तेच कोणाला समजत नाही. पुस्तके घरातून जाण्याचा प्रसंग अजून अनेक वेळा माझ्यावर येणार आहे,तरीही मी पुस्तके आणण्याचे थांबवणार नाही. ती येत राहणार.
हत तेरी
हत तेरी
मनात आलं की मरण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे,म्हणजे एखादा आजार तरी पाहिजे,नाहीतर आपण कशाने मरणार? कारण कितीतरी लोक वयस्कर होतात पण त्यांना काहीच होत नाही,आणि मग ते मरत नाही. निराशा, एकटेपणा,याने ते त्रासून जातात. मग मला वाटलं की मला वेळेत मरायचं आहे तर मला काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे काहीतरी दुखणे असेल तर बरं. गोळ्या औषधे,डॉक्टर आणि असा आजार कोणाला झाला असेल तर त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीविषयी बोलायला विषय राहतील. म्हणून मी विचार केला की काहीतरी झालं पाहिजे आपल्याला. तर रात्रीतून युरिन इन्फेक्शन झालं. हल्ली ते बऱ्याच वेळा होतं. सर्व प्रकारच्या चाचण्या करून झाल्या पण कारण काही सापडलं नाही. घरातच असते, त्यामुळे बाहेरच्या स्वच्छता गृहाचा संपर्क येण्याचा प्रश्न नाही.
मग विचार आला की मरण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? तर कणिक भिजवलेली होती आणि कुकरला अख्खी मसूर लावली होती. म्हटलं समजा आपण गेलोच यावेळी तर फारसे काही बिघडणार नाही. तेवढ्यात विचार आला की रात्रींची पोळी शिल्लक नाही, आणि समजा मी मेलेच तर घरातील वयस्कर लोकांची खाण्याची आबाळ होईल.मग पोळ्या कराव्यात आणि वरण फोडणीला घालावं. म्हणजे बाकी लोक जमे पर्यंत यांची पोळी खाऊन होईल, गोळी घेऊन होईल आणि मग त्या इतर टूकुमुकू बघायला मोकळ्या होतीत. शिवाय आज त्यांचा वेळ जास्त चांगला जाईल. माणसं घरात येतील,फोनचा आवाज येत राहील. यात वयस्कर मंडळीचा टाईम पास होईल.
ही वेळ मरण्यासाठी योग्य आहे का? स्वतःला विचारलं. म्हटलं स्वतःच्या दृष्टीने विचार कर. तर वाटलं तसं काही फारसं करायचं राहिलेलं नाही. जगात बदल घडवून आणण्याइतके आपले व्यक्तिमत्व थोर नाही,त्यामुळे पोकळी वगैरे निर्माण होणार नाही.संसार तसा करून झाला आहे,देशभर,जगभर फिरायचं होतं पण आता ते पुढच्या जन्मासाठी ठेवलं तरी चालेल. म्हणजे आता त्याची तशी घाई नाही. काही पुस्तके वाचायची राहिलेली आहेत. पण मेल्यावर कोण विचारणार आपल्याला की हे वाचलं का ? ते वाचलं का? त्यामुळे वाचलं नाही तरी चालेल. असा निर्णय घेतला. पण वाचनालयाची पुस्तके कोणाला तरी परत करायला सांगावी लागतील. तसेच घरातील पुस्तकांचे काय करणार? याबाबत मी काहीच सांगून ठेवले नाही. ते ही सांगून टाकते. म्हणजे मोकळी होऊन जाईल.
मग स्वतः लिहलेल्या गोष्टींचे काय करायचे? हा विचार मनात आला.अरे देवा.हा पाश आहेच का अजून असं जरा नाटकीपणे म्हटलं. आणि विचार करू लागली की स्वतःचे लिखाणाचे काय करावे? म्हणजे त्यातून काही सामाजिक बदल वगैरे होईल असे काही नाही. पण थोडेफार मनोरंजन होऊ शकेल. कारण लिहतांना माझे झाले ना तसेच.काय करावं कळेना. कालच एका मैत्रिणीने माहीती पाठवली की संपादन करून द्यायला लोक तयार आहे आपण फक्त मजकूर पाठवायचा. अर्थात फी देऊन. तर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटलं. मग घाईघाईने laptop उघडला आणि गोष्टी कुठे कुठे लिहून ठेवल्या आहेत त्याचा धांडोळा घेतला. तेव्हा लक्षात आले की एका जागी व्यवस्थित काही नाही. ते नीट लाईनीत लावले पाहिजे. म्हणजे फारच काम आहे बुवा. हत तेरी
गोळ्या घेतल्यामुळे युरिन इन्फेक्शन कमी झाले होते,भूकही लागली होती. म्हटले मरण परत कधीतरी अनुभवू ,आता लिखाणाचे काम आणि जेवण महत्वाचे आहे. शेवटी .
माना के मुरत -ए -खाक से बेहतर नहीं हूँ मैं
लेकिन हवा के रहम-ओ -कर्म पर नहीं हूँ मैं
माझ्या आयुष्याच्या मानाने शेर फार मोठा आहे ना? मी लिहलेला नाही तो.
मला माहीत आहे एक मूठ माती एवढीच माझी योग्यता आहे,याहून अधिक किंमत नाही. पण म्हणून एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने थोडीच मी मरेन. वाऱ्याने यावं आणि छान आनंद पसरू द्यावा. असेच मला वाटते.
Sunday, January 26, 2025
https://archive.org/download/
Friday, November 29, 2024
झुरळ आणि झुरळीण
#व्यंग5
झुरळ आणि झुरळीण
🤪 शाळा सुरु होणार ही बातमी ऐकल्यापासून झुरळ आणि झुरळीण विशेष आनंदात होते.ते कसे हे समजून घेण्यासाठी थोडेसे मागे जाऊ या.शाळेच्या मागे नाही हो,काळाच्या मागे.तर त्याचं काय झालं.
गावातल्या एका शाळेत झुरळ,झुरळीण आणि त्यांचा परिवार अनेक वर्षांपासून राहत होता. ही त्यांची कितवी पिढी आहे हे कोणालाच माहित नव्हते.अगदी त्या परिवाराला सुद्धा.कारण झुरळाला आपणहून /नैसर्गिक मरण नसते यावर त्यांचाही विश्वास आहे. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने पालीची छोटी छोटी पिल्लं सुद्धा राहत होती.पाल गावभर बुरकाळायची तेव्हा ही झुरळाची पिल्ल आणि पालीची पिल्लं एकमेकांशी खूप खेळत.त्यामुळे मात्र कोळ्यांना त्रास होई.कारण ते जेव्हा जेव्हा जाळं विणत तेव्हा तेव्हा ही झुरळाची पिल्लं मध्ये मध्ये येत आणि ते मोडत. पण सगळ्यांनी बरोबर गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचे ठरवल्याने ते एकमेकांना त्रास देत नसत.किंबहुना कोणाच्या डोळ्यात येईल असा त्रास देत नसत.😁😁
दिवसभर झुरळ आणि झुरळीण शाळेच्या कपाटेमागे,भिंतीच्या पोपड्यामध्ये दडून बसत.आणि संध्याकाळी बाहेर पडत.त्यावेळी त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नसे.शाळा रिकामी झालेली असे.त्यामुळे आवाज करायला कोणी उरत नसे.मग कॉलनीतली मुलं आपली बॅट घेवून चेंडू उडवत येत.येतांना ते काहीतरी खायला घेवून येत. त्यामुळे शाळेतल्या मुलांच्या डब्यातले खरकटे आणि या मुलांच्या पुड्यामधला खाऊ खाण्यासाठी भरपूर होई.म्हणून झुरळ आणि झुरळीण खुश होते शाळेवर.आता जन्मभर इथून ह्लावं लागणार नाही म्हणून ते निश्चिंत झाले होते.
शाळेच्या कपाटामध्ये थोडेफार सामान होते, फाईली होत्या. त्याच्या आसपास लपण्याची कला झुरळाच्या कुटुंबाने शिकली होती.त्यामुळे कोणतीही फाईल काढली,किंवा सामान हलवलं तर एखादा झुरळाचा वंश इकडेतिकडे धावे आणि काढणारा जोरजोरात ओरडे.पण एवढ्या तेवढ्या वरून माणसं का ओरडतात हे कोळ्याला अजिबात कळत नव्हते.त्याला कोणी झटकत नव्हतं.जैवविविधता मुलांना दाखवता यावी म्हणून तो तिथं होता असं त्याचं म्हणणं होतं.शाळेत मुलांनी वाचावी म्हणून जी पुस्तके होती त्यात झुरळ आणि झुरळीणचा परिवार फक्त प्रवेश करू शकत होता.त्यांनाच ती पुस्तके वाचण्याची मुभा होती. कारण कपाटाचे कुलूप न उघडता ते पुस्तकं वाचू शकत होते.मुलांना ती कला नव्हती.
असं सगळं आलबेल चाललं असतांना अचानक शाळा बंद होण्याची घोषणा झाली.अनेक दिवस मुलं शाळेत येणार नाही आणि तिथं काहीही खरकटे सांडणार नाही.स्टाफ रूम मध्ये वडे मागवले जाणार नाही.डबे खाल्ले जाणार नाही.तसेच संडास बाथरूम कोरडे राहतील.अशावेळी आपलं काय होईल.आपल्या सात पिढ्या या शाळेत गेल्या,आणि अजून कितीही जाऊ शकतील याची खात्री होती.पण अचानक एक रोग आला आणि त्याने मुलं घरी बसली.आता आपण काय करावं हे झुरळ आणि झुरळीणला कळेना.तेवढ्यात कोळी म्हणाला की,आता लोक शाळेची स्वच्छता करायला येणार आहेत.त्यामुळे मलाही इथून जावं लागेल.
झुरळ आणि झुरळीण घाबरले,कारण स्वच्छता करणारे लोक आले तर प्रथम आपणच मारले जाऊ याची त्यांना खात्री वाटली.कारण चपलेचा एक वार, त्यात मरतील हजार.काय करावं त्यांना सुचेना.म्हणून त्यांनी शाळा सोडून आसपासच्या घरात जाण्याचा विचार केला.पण कोळ्याच्या म्हणण्यानुसार तिथं तर साफसफाई अजूनच जोरात चालू झाली आहे.कारण लोक घराच्या बाहेर पडत नाही.मग अशावेळी काय करावं कळेना.तेवढ्यात भिंतीवरून एक उंदीर येतांना दिसला.तो फारच घाईत होता.त्याला बळेबळे थांबवून विचारले,की तू इकडे का आलास?तर म्हणाला घरात सगळीकडे पिंजरे टांगत आहेत.मी म्हटलं शाळा बरी.
“पण इथं सफाईला कोणी येणार नाही का?” झुरळीणीने विचारलं.
“येतील,पण घरच्या सारखी होणार नाही.”
तेवढ्यात कोणीतरी अधिकारी शाळेत आला आणि त्याने तिथं पानाची पिचकारी मारली.हे बघून झुरळ आणि झुरळीणीने श्वास सोडला.चला फार काही मनावर घ्यायची गरज नाही. असं त्यांना वाटलं.उंदीर आणि पालही हे लांबून पाहत होते.त्यांनी पण आपआपल्या जागा घेतल्या.सरकारचे म्हणणे तसे फारसे मनावर घ्यायचे नसते,हे जसे माणसाला कळले तसे माणसांचे वागणे फारसे मनावर घ्यायचे नसते हे झुरळाच्या परिवाराला कळले.त्यामुळे त्यांनी एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी झुरी नाच केला.त्यांचा तो नाच बघून कोळ्याने आपले पाय हलवले पण स्वतःच्या जाळ्यात तोच अडकला.म्हणून पालीची पिल्ले आली आणि त्यांनी त्याला बाहेर काढले.एवढ्या भयानक परिस्थितीत ,म्हणजे स्थलांतराची वेळ आली असतांनाही त्यांनी एकमेकांना आधार दिला. हे बघून उंदीर भारावून गेला आणि त्यानेही तिथंच बस्तान बसवायचे ठरवले.🥰🥰