Monday, April 27, 2015

व्यक्त होण्याचा सुंदर मार्ग


  आपल्याला सगळ्यांनाच चित्र काढायची, गाणी म्हणायची खूप हौस असते. लहानपणी काहींची कमी अधिक प्रमाणात ती पूर्ण होते. ज्यांना घरून चांगला पाठींबा मिळतो आणि कला जोपासायची संधी मिळते त्या व्यक्ती पुढे त्या त्या कलांमध्ये नावही कमावतात.पण आपल्या सगळ्यांनाच रंग पाहिले की त्यांचे काहीतरी सुंदर करावे असे वाटते.मग मुलांच्या हातातच असे रंग,ब्रश आणि भिंती सारखा मोठा कॅनव्हास मिळाला तर? मुलं  खूप खुश होतील.असा अनुभव सोलापूर येथे  बालभवनच्या मुलांनी घेतला.
   मुलांनी एक संपूर्ण भिंत आपल्या विविध कलाकृतींनी सजवली.प्रत्येकाने आपल्या भावविश्वाला जवळचे चित्र काढले,त्याला हवा तो रंग दिला. सूर्य,डोंगर,फुले,पाने, मांजरे,उंदीर,घर,झाडे,कार्टून,असा सगळ्यांचा समावेश असलेली ती भिंत म्हणजे आम्हांला व्यक्त व्हायचे आहे ही  सांगणारी हाक आहे. मुलं जेव्हा चित्रे काढत होती तेव्हा ती सगळ्या गोष्टींचे भान विसरली होती. त्या रंगाची ,चित्रांची झाली होती. मला तर कळले की एक लहान दीड- दोन वर्षाची मुलगी तर आपले भावंड चित्र काढत आहे हे पाहून स्वतः चित्र काढायला पुढे झाली. तिच्या हातात रंग आणि ब्रश दिला तेव्हा ती मनापासून त्यात रमली. चित्र काढून एक हात दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने कामाला सुरुवात केली.कोणी तिला मागून विचारले की तू काय काढतेस? तर त्या व्यक्ती कडे एक दृष्टी टाकून त्या मुलीने आपली चित्र काढायची जागा बदलली.कामात कोणताही व्यत्यय तिला  मंजूर नव्हता.
  आपण नेहमीच म्हणतो की मुलं मन लावून काही करत नाहीत पण ती जेव्हा मन लावून काम करतात तेव्हा आपणच त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो.मुलं एखाद्या गोष्टीत मग्न असतील तेव्हा आपण मोठी माणसं त्यांना म्हणतो,’चला आता उठा, दुसरं काही तरी  करा, किंवा आता झोपायची वेळ झाली किंवा आता हे करा आणि ते करा. का आपण असं वागतो?विचार करायला हवा ना? ही मुलं कसं शोधणार त्यांना काय आवडत ते? ती कशात रमतात हे त्यांचे त्यांनाच कळायला हवे ना? मग आपण तशी संधी त्यांना द्यायला हवी नाही का?
         सोलापूर येथे बालभवनने  अशी संधी मुलांना दिली.पण आपण सगळ्यांनी ठरवले तर अशी सुंदर चित्रे काढायची संधी मुलांना देवू शकतो. आपला बंगला असेल तर त्याची कंपाऊंडची भिंत असेल, सोसायटीची  भिंत असेल ,त्या त्या भागातल्या मुलांना गोळा करून त्यांचा सुट्टीचा काळ मजेत आणि सर्जनशिलतेत त्यांना घालवता येईल.आपण काढलेली चित्रे रोज बघतांना मुलांच्या मनावर आपोआपच परिसर नेटका ठेवण्याचा संस्कार होईल. काय हरकत आहे असे बालभवन सोसायटी सोसायटीत आपापल्या पातळीवर निर्माण झाली तर?माझ्या डोळ्यासमोर एक आख्ख शहरच अशा चित्रांनी रंगल्याचे दिसत आहे.मग आपोआपच कोणता रंग कोणत्या समाजाशी जोडला गेला आहे हे विसरायला होईल आणि त्या रंगाची खरी मजा घेता येईल.आपण भाषा,प्रदेश,कपडे,आणि रंगाची फार विभागणी केली आहे. ती आपली व्यक्त होण्यातल्या  उदारतेला मर्यादा आणते.पण ही मुलं रंगाचा रंग म्हणून वापर करतील. त्यात सगळेजण समान असतील आणि एकमेकांचा मान ठेवतील आदर करतील.आपले मत वेगळे आहे हे सांगण्यासाठी हातात दगड,बंदुक,घ्यावे लागत नाही हे त्यांना कळेल.चित्रासाठी ,सुंदर चित्रासाठी, कलेसाठी सगळ्या रंगाची तेवढीच गरज आहे हे त्यांना आपोआपच कळेल.कोणताही एकच रंग हे जग सुंदर करणार नाही. सगळ्यांना एकमेकांचा हात धरला तर आनंदाने फेर धरता येईल.हा विश्वास त्यांना ही चित्रे देतील.

   एखाद्या शहरात मुलांनी चित्रे काढावी म्हणून त्यांना आख्खी भिंत मिळावी या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.ही भिंत सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयाने बालभवनच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहेच. समाजातील सगळ्यांनीच मुलांसाठीच्या कामात आपापला सहभाग नोंदवला की निरोगी ,परिपक्व समाज घडण्यास फारसा उशीर लागणार नाही.मुख्य म्हणजे अशा समाजाची ,ज्यात एकमेकांना व्यक्त होण्याची संधी मिळते आणि दुसऱ्याचा मताचा आदर केला जातो अशा वातावरणाची आपण सगळेचजण  खूप वाट पहात आहोत.अर्थात असा समाज  आपल्या वागणुकीतून आणि दुसऱ्याला व्यक्त होण्यास किती संधी देतो यावर अवलंबून आहे.त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायची गरज आहे. पण मुलांचे हे चित्र मात्र माझ्या मनात खूप आशा निर्माण करत आहे.

Friday, March 27, 2015

“आला वसंत आला “




“अग आज आता  पहाटे मी मिस्टर कोकीळ यांचा आवाज ऐकला “पहाटेच चार वाजता फोनवरच हा आवाज ऐकून माझ्या लक्षात आले की ,कालच मी दिलेल्या माहितीचा कोण कसा वापर करेल हे मला सांगता येणार नाही. वसंतातील कविता वाचनासाठी आम्ही जमलो होतो.मी सहज सांगतिले की खूप कवींनी कोकिळा  वसंतात गाते असे वर्णन केले आहे पण खरं म्हणजे कोकीळ गात असतो. कोकिळेचा आवाज हा अत्यंत कर्कश असतो.तिला गाता येत नाही. काहीजणांसाठी ही माहिती नवीन होती. त्यांनीच मला मिस्टर कोकीळ गात आहे हे आनंदाने सांगितले . त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर सुटाबुटातला आणि त्याला अनुरूप असा टाय घातलेला कोकीळ आला. तो बाजूच्या शांततेचा अदमास घेत ,कोणाची झोपमोड होणार नाही ना असा नवीन जगाचा कानोसा घेत गात आहे. भरीला त्याने काळ्या फ्रेमचा चष्मा घातला आहे हे ही दिसले.
   तर मि.कोकीळ यांचा आवाज जेव्हा मी ऐकला तेव्हाच  माझ्या मनाने  मान्य केले की ,आला वसंत आला.” एवढ्या शांततेत तुझा मधुर  आवाज वसंताची चाहूल देतो तेव्हा आपल्यालाच नवीन पालवी फुटत आहे असा भास व्हायला लागतो.खरंतर बागेतला आंबा कधीच मोहरला होता पण तुझ्या सादे शिवाय त्या मोहराच्या सुवासाला सुद्धा मी नकार देत होते.तुझी ती गोड साद ऐकून आंब्याला  आपण मोहरलो याचे सार्थक झाले असे वाटले असेल. हो तसा सार्थकतेचा श्वास सोडल्याचे मी ऐकले. पहाटेच्या अशा आपणच आपल्या बरोबर असण्याच्या वेळीच श्वास निःश्वासचा हळूवार नाद ऐकू येतो.कधी कधी आपलाही श्वास त्या बरोबर जोडला जातो आणि एका अवर्णनीय मैफिलीला सुरुवात होते. पहाटेच असे सूर जुळल्यावर मग दिवसभराच्या ओरखडे सुद्धा सुरात येतात.

 कोकीळ असा जेव्हा स्वतःच्या गळ्यातून वसंताच्या आगमनाची बातमी चहूकडे देतो आणि स्वतः बरोबर सर्व सृष्टीला नादावतो.तेव्हा आणि तेव्हाच चैतन्याची पालवी सगळीकडे फुटू लागते.वसंतातले दिवस हे चैतन्याचे दिवस आहेत. पानगळ झालेल्या शिशिरा नंतर तो येतो तेव्हा नवे जीवन घेऊन येतो. बागेतला गुलमोहर, बहावा, जकरांडा,आपल्या फुलांच्या रंगाने सृष्टीला नटवतात.आधीच ती सुंदर आहे या रंगांनी तिची शोभा अधिक वाढते.रानात पळसही आपले लालचुटूक अस्तित्व मिरवत असतो.

सृष्टी जशी कोकीळ च्या गाण्याने नादावते तसेच कवी सुद्धा या पक्षाच्या आवाजाने बहरतात. हा पक्षी वसंतातला आनंद घेवून येतो.तो झाडांच्या पालवी बरोबर आपल्याही आशा पल्लवित करतो. हा ऋतू, हे विविध रंग आणि कोकीळचा सूर आपल्या आयुष्याला एक वेगळीच गोडी देतात.आंब्याच्या मोहराचा गंध,मोगऱ्याचा सुगंध आपल्या मनाचा ठाव घेतात. साऱ्या इंद्रियांसकट हा ऋतू अनुभवावा असाच असतो. यावेळी मला कवी ए.पा.रेंदाळकर यांच्या काव्याची आठवण येते. ते म्हणतात,
 फुलास हसवित,तरूस डुलवित   
कुरवाळीत वेलिंना
वायुलहरिवर बसून आला
वसंत ऋतू आज ना?
भालदार नव पिकराजा हा
ललकारित चालला
थरारवी नीज गानरवाने
ह्या दुर्भग सृष्टिला !

  आहे की नाही या वसंतात मजा.  त्याचं नातं सृष्टीशी, सृजनाशी आहे.म्हणूनच तो चैतन्य घेऊन येतो असं मला वाटतं.ते कसं हे आपल्याला मि.कोकीळ सांगतातच ना?

Thursday, March 5, 2015

कैदी


कोण आहे? एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत विनू ओरडला. तरी खिडकीवरची टकटक कमी झाली नाही.**** भलत्यावेळी कोण आलं? आज घरात कोणी नाही तर निवांत झोपू म्हटलं तर.
दार उघड दार .मी मी
ए मी काय ढकंबाहून आलोय का? दार उघड म्हणे.एवढ्या रात्री तू कशाला आलास? तुला काही घरदार आहे की नाही? *******
ए शिव्या देवू नकोस हं. मी पण... तुला माहित नाही मी कोण आहे ते? नाहीतर खिडकीतून बोलला नसता माझ्याशी.
कोण आहे तू? एवढा घाबरला आहे ते ? आता सामान्य माणसाने आपल्याच सावलीला घाबरण्याचे दिवस आले आहेत.

अरे लोक ध्यानीमनी ज्याचा जप करतात,ज्याला पाहण्याची इच्छा व्यक्त करतात तो आहे मी?
कोण? पैसा?****** काय फेकतो यार,पैशाने काय माणसांचा अवतार घेतला की काय?
दुसरं काही सुचत नाही का तुम्हां माणसांना ? मी विठ्ठल ,विठोबा.
तू मला काय वेडा समजतोस? त्या माणसाला स्वतःच्या कंबरेवरचे हात अठ्ठावीस युगापासून काढता येत नाही. तो एवढा लांब पळून आला? हास्यास्पद वाटतयं.
का? मी येवू शकत नाही?
माहित नाही. कारण आपलं काही तुझ्याशी कनेक्शन नाही.
म्हणजे तुझा विश्वास नाही?
तो वेगळा मुद्दा आहे बाबा,ते जावू दे तू का आलास ते सांग. मुख्य म्हणजे तू आला तसा निघून जा. माझी बायको फार कजाग आहे हं,ती तुझ्यासमोर माईक धरेल आणि तुला लगेच विचारेल ,विठोबाजी तुम्हांला गाभाऱ्या बाहेर कसं वाटतयं? तुमचे आणि रुक्मिणीचे संबंध बिघडले की काय? जा बाबा तू.मी तिच्या पत्रकारितेला पार वैतागलो आहे आणि खरं आणि जाहीरपणे न लाजता सांगायचे तर ती मला आवडते आणि मी तिला घाबरतो.कळलं? .तर तू जा.
अरे आधी दार तर उघड. मग बायकोचे कौतिक सांग.
वेडा आहेस का? माझ्या खिडकीपर्यंत आला त्याचे दोनशे रुपये दे आधी.दारात यायचे असेल तर अजून शंभर आणि दारातून घरात येवून बसायचे असेल तर सर्व मिळून पाचशे.
अरे तिथे या पैशांच्या गप्पांनी जीव घुसमटला म्हणून आलो तर इथेही तेच.
अरे विठोबा ही सर्व तुझी लेकरे आहेत.सगळीकडेसारखेच.
पण मला हे सहन होत नाही .
अरे पण सांगता येतं ना? सांग ना मग. जरा आळस झटक,ते कंबरवरचे हात काढ आणि ते पाडून तुझ्या आजूबाजूच्या चौकटी.
बोलणं फार सोप्पं आहे.
हो ना? तू स्वतःला देव समजतोस ना? मग तुला काय अशक्य आहे.अर्थात तुझं वागण तसं दगडासारखच आहे म्हणा.
ए तू काय बोलतो ते तुला समजतयं का?
हो चांगलच... तू एक कर. तुझ्यासाठी कोणी पैसे घेतलेले दिसले की गालात मार. अदृश्य होवून कर बर हे. नाहीतर ते बडवे तुला सोडायचे नाहीत.भक्तमंडळीबाहेर गेली की तू त्यांच्याच ताब्यात असतो.अभिषेक चाललाय असं सांगून तुझे हाल करायला ते कमी करणार नाहीत. मला तर कल्पना करूनच फार गंमत वाटतेय.
पुरे.दुसरंकाही तरी सांग.
मग संपूर्ण देवळालाच हादरा दे आणि तू अंगावरचे दागिने वगैरे काढून फेकून दे आणि वाळवंटात जावून बस. आता माझ्या लक्षात आलं म्हणून सांगतो ते दागिने नदीत फेकले तरी परत मिळण्याची आशा करू नको. ते परत पाण्यावर तरंगतील वगैरे .इथं लोकांना खायला प्यायला मिळत नाही आणि दागिने घालून मिरवतो. असा कसा रे तू? गरिबांचा देव म्हणे.
टीका नको.पुढे सांग.
वाळवंटात जावून बसला की आपोआप मोठा हो.एवढा मोठा की तुझ्या भोवती भिंती उभारू शकणार नाही. लोकांना लांबूनच तुझे दर्शन होईल म्हणजे तुझ्याभोवती ची ब्युरोक्रसी आपोआप नष्ट होईल.बघ पटतय का?
हं.विचार करायला हरकत नाही. पण मी बसू का?
बस की. पण काय ओशट वास येतोय रे? शी दूधट,आंबटवास येतोय तुझ्या अंगाला.
ए तुझ्या घरात आलो म्हणून वाटेल ते काय बोलतोय.
नाहीतर काय,रोज रोज दुधा-तुपाने आंघोळ करतो,त्यावर साबण नाहीतर शिकेकाई लावत जा. म्हणजे जरा चांगला वास येईल. नाही तर मुंग्या लागतील .बघ तुझ्या आजूबाजूला केवढ्या माशा आहेत.सगळीकडे घाण नुसती.
त्याला मी काय करणार?
तू कशाला काय करतोस? तुझे ते कंबरेवरचे हात काढले तरी पुरे.
अरे मी माझं दुःख तुला सांगायला आलो तर तूच मला ऐकवतो.अरे २८ युगं कोण कैदेत राहिलाआहे का? सांग.सगळेजण माझ्या पायावर डोकं टेकवून सारखं काहीतरी मागत असतात.मीच स्वतः एवढा घुसमटतोय ,मला आधी बाहेर काढा,मग बघू एकेकाकडे.पण कोण ऐकतोय*********च्यायला मला दागिने काय घालतात,टोचणारे कपडे काय घालतात? अत्तराची फवारणी काय करतात?नुस्ता वैताग ****.आजकाल तर वैताग जास्तच वाढलाय. आता पाउस आला नाही,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,दहशतवादी हल्ले झाले तर लोक मलाच येवून साकडे घालतात.अरे मीच सा कड्यातअडकलेला मी काय कोणाला सोडणार?अरे तुमची आंघोळीची जागा मोठी असेल बघ. माझ्याभोवती माणूस धड उभा सुद्धा राहू शकत नाही. बाहेरून हे एवढं मोठं मंदिर दिसत ना? ते म्हणजे मोठं घर आणि पोकळ वासा.तू येवून बघ किती एकामागोमाग काचा लावल्या आहेत त्या. माणसं माझ्यापर्यंत सरळ येवूच शकत नाही.पार वाकड्या वाटेने.जणू ते तुमचं भुलभुलैय्याच.******माझा घाम माझ्याशरीरातून येतो म्हणून नाहीतर तो येण्यासाठी सुद्धा पैसे घेतले असते. अरे लोक माझ्या पायाला हात लावणार ,मी गपगार उभा राहणार आणि पैसे मात्र बडव्यांचे? हा काय न्याय झाला? वरून म्हणतात त्याचा उपयोग मंदिर सुधारण्यासाठी करणार.सुधारणा म्हणजे काय तर मी अधिक जखडला जाणे होय.
अरे हे सगळं तुझ्यासुरक्षेसाठीच आहे.
सुरक्षा? आणि माझी?कोणापासून? दोन-दोन दिवसमाझ्या पायावर केवळ डोकं टेकवाव म्हणून रांगेत ताटकळणांरयापासून ? अरे माझ्या पुढे असा विचित्र चौथरा बांधलाय की कमी उंचीच्या माणसाला थोडीशी उडी मारून पायावर डोकं ठेवण्यासाठी लटकाव लागतं. त्यात माझ्या शेजारी बसलेला आणि तो पोलिस पटकन त्याचंडोकं बाजूला करून सरकवतो.हजारो मैल चालत येवून त्यांना मला नीट पाहता सुद्धा येत नाही.
पण अलिकडे तुझ्याकडे येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. तुही तुझं शक्तिप्रदर्शन करू शकतो राजकारण्यासारखं .
तू मला चिडवतोय का? म्हणे भक्तमंडळी वाढली? अरे नवीन लग्न झालेली जोडपी म्हणे हिलस्टेशनला हनीमूनला जायचं सोडून वारीत येतात.माठ साले.आजकल वारीला जाणं ही फशन झालीआहे.नेते,पुढारी,परदेशी आणि इतर सगळे.त्यामुळे माझ्या वारकऱ्याना जास्त त्रास होतो.
तरी बरं मी येत नाही त्या घाणीत.
ए तू मनाला येईल ते बोलतोस. तोंड संभाळून बोल जरा.
ए तू माझ्या घरात बसलाय.इथेच कैद करून ठेवेन.मग कशी सगळ्यांचीच फा फा होईल ते
ठेवतर खरं.बघशीलच तू राज्यात कसा गोंधळ होईल ते. सत्तापालट होईल.
तो काय तुझ्यामुळे? अरे तू गाभाऱ्यात नाही म्हटलं तर  कोण फिरकणार त्या पंढरीत? पैसा मिळणार नाही,अनुदान मिळणार नाही.तुझा तिथं साक्षात्कार होतो म्हणून नाही जमत ही मंडळी.तू काय साक्षात्कार दाखवणार म्हणा.चल खाली सोड ते कंबरेवरचे हात.
अरे माझे कंबरे वरचे हात म्हणजे अध्यामिकदृष्ट्या पाहिलं तर भवसागर
सॉरी ,माझ्या घरात हे असं चालत नाही.तू शांत रहा,तुझ्या जीवनाचे गुढ इतर बाबा लोक सांगतात तेही गुढ पद्धतीने,होवू दे त्यांचा धंदा.तू नको पाय देवू त्यांच्या पोटावर.
तुलाएक दिवस चांगली अद्दल घडेल मग कळेल.
चल कळूच दे.आधी ते हात खाली कर आणि तुझी घुसमट कमी झाली असेल तर निघ.
अरे चहापाणी तर विचार. बाकी सोयी कुठे आहेत ते सांग.कळला ना करंगळीचा अर्थ की..
तुझ्या पंढरीत आहेत का या सोयी? एवढाले  कोटी रुपये मिळतात तुझ्या नावाने पण धड शौचालये नाहीत,हॉटेल नाहीत.जिकडे तिकडे घाण फक्त घाण. जावू दे ते. तू निघ आता. मला शांतपणे झोपू दे,पुढच्या जन्मी मी तुझं देवूळ बांधीन आणि मस्त आरामात जगीन.प्रॉमिस ..
पण तुझा विश्वास नाही ना?
तुझ्यावर नाही पण लोकांवर आहे आणि त्यांचा तुझ्यावर.मग पैशाला काय कमी? फक्त तुला तेव्हां माझा कैदी म्हणून राहावं लागेल.चल आजच्या दिवशी माझ्या घरात आल्याच्या बदल्यात पैसे न देता एवढं प्रॉमिस कर .
सॉरी.आता मीच इथून गायब होणार आहे,तुलाच काय परत कोणालाच दिसणार नाही.घुसमटून जगण्यापेक्षादर-दर की ठोकरे खाकर मरना पसंद करूंगा.
विन्याऊठ,पेपरला काय आलंय बघ, ‘बडव्यांच्या कैदेतील विठ्ठल पळालाय.
ए चल तू पण मस्त झोप काढ आणि टीव्ही लावूनको.आपण God must be crazy पाहू.च्यायला विठोबाने खरच करून दाखवलं. यार मानलं तुला.





Tuesday, February 10, 2015

तुमच्या बारीकसारीक गोष्टींमध्ये दिसते तिला गुणवत्ता म्हणतात.


         ती ऑफिस मधून बाहेर पडली तरी तिचं टेबल तसंच अस्तावस्त पडलेले होतं. मोकळे पडलेले कागद,उघडे कपाट, त्यात कशातरी कोंबलेल्या फाईल.तिला कोणी याबद्दल बोलले तर ती म्हणायची, माझ्यात गुणवत्ता आहे ना? मग माझे काम पहा. म्हणजे?
    एक व्यक्ती भेटली आणि कोणीतरी ओळख करून दिली. तिच्या कामाचे कौतुक केले., आणि त्या व्यक्तीने सांगितले की तिची आई नुकतीच हॉस्पिटल मधून घरी आली आहे, ती आजारी होती.म्हणून मी विचारले,मग तू आईला मदत करते की नाही? तर ती लगेच म्हणाली,’ का? दुसरं काही करण्यासारखे नाही का? घरात काम करण्याइतका वेळच नाही मला. माझ्यात गुणवत्ता आहे, ती मला दाखवण्याची संधी असतांना मी मदत वगैरे कशाला करू?
मग आजारी आईसाठी डबा लावला का?
नाही. ती maggy करून खाते. हलकी असते ती पचायला.
मी तर आजपर्यंत समजत होते की, गुणवत्ता ही मार्कां मध्ये  नसते.ती जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी मध्ये असते.असायला हवी.
   आमच्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती आली होती. त्यांचे  शिक्षण चांगल्या विद्यापीठात झाले होते. ते आमच्या कामातली गुणवत्ता कशी वाढवायची यावर व्याख्यान देणार होते. ते त्यांच्या कार मधून आले होते.सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही त्यांना निरोप द्यायला कार पर्यंत गेलो तर मला धक्का बसला.कारण मी हातात मोजे घालून सुद्धा त्याच्या कारला हात लावू शकत नव्हते.कारच्या जवळ जावून आत डोकावून पहिले तर कारमध्ये कचरा साठलेला होता,कागदाचे तुकडे इतस्ततः पडलेले होते.हा माणूस लेक्चर देणार होता आणि ते ही गुणवत्ते वर हं.      
  मी पाहिलेलं आहे ,तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल सत्संग साठी हजारो लोक जातात,त्यांना त्यांच्या डोळ्यातील कचरा काढायचा  असतो.ज्यांनी स्वतःचे शरीर स्वच्छ केलेले नसते ते त्यांना त्यांचा  आत्मा स्वच्छ करायचा असतो.काय हे अज्ञान आहे?त्यांनी कधी नीट आंघोळ केलेली नसते,पण त्यांना त्यांचे जीवन गुरूच्या आशीर्वादाने धुवून टाकायचे असते.मी दाढी न केलेले,पॉलिश न केलेले बूट घातलेले,टाय नीट न बांधलेले सेल्समन पाहिलेले आहेत.ते लोकांकडे जावून जागतिक गुणवत्तेचे त्यांचे उत्पादन दाखवीत असतात.उत्पादनाचा दर्जा जरी चांगला असला तरी या माणसाची गुणवत्ता त्या उत्पादनावर ओरखडे मारणार नाही का?
     एका समाजसुधारक जोडप्याने आम्हांला त्यांच्या घरी बोलावले होते. सहज गप्पा मारायला म्हणून. ते पर्यावरणावर काम करत होते.आम्ही काही पत्रकार तिथे गेलो. तेव्हा त्यांच्या घरात कुबट वास येत होता. काहींनी नाकाला रुमाल लावला तर बाई म्हणाल्या, अहो दोन चार दिवसाचे कपडे भिजत पडले आहेत त्याचा वास येत आहे. आता त्या गिळगिळीत झालेल्या कपड्यांसाठी जादा पाणी नाही का लागणार? तिथेच बाजूला खरकटी भांडी ठेवलेली होती, त्यातील अन्न निगुतीने काढलेले नव्हते. ते तसेच भांड्याला चिकटलेले होते. दुधाच्या पातेल्याला साय तशीच चिकटून होती. हे अन्न सुद्धा पर्यावरणासाठी योग्य असेल का? आम्ही जागतिक दर्जाच्या गप्पा मारल्या पण कोणीच त्यांच्याबद्दल लिहायला तयार झाले नाही. असं का? घरातलं पर्यावरण बिघडले तरी चालणार होतं का? माहित नाही.
  मला असं वाटतं की आपल्याला हे माहित पाहिजे की गुणवत्ता ही आतूनच सुरु होते आणि मग ती बाहेर दिसते.आपण कोणता दर्जा देतो हे आपण कोणत्या दर्जाचे आहोत यावर अवलंबून असते,आणि त्यावरच आपण काय करत आहोत याची गुणवत्ता ठरते,आणि आपण काय करत आहोत हेच आपण काय आहोत यावर अवलंबून असते.
  गुणवत्ते बद्दलची स्वतःची जाणीव हीच तुमच्याकडून इतर कोणापेक्षा अधिक अपेक्षा करत असते.तुमच्या  दर्जाबाबतची तुमची  जाणीवच जगाने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा उच्च असायला हवी..गुणवत्तेची जाणीव म्हणजे एक प्रकारचा असा विश्वास असतो की ,त्यामुळे आपल्याला  वाटते की सगळ्या गोष्टीत सुधारणा होवू शकते.
   गुणवत्ता   तुमच्या मोज्याला छिद्र नसणे,तुमच्या घराची दारं करकरत नसणे,घरातील सगळी घड्याळे एकच वेळ दाखवत असणे,घरातील गाद्यामधून कापूस बाहेर डोकावत नसणे,घाणेरडे पंखे,भिंतीवर जाळी नसणे,गळणारे नळ नसणे,फोन पटकन उचलला जाणे,भिंतीवरचा रंग उडून पापुद्रे निघालेले नसणे, वाशरूम स्वच्छ असणे आणि तुमच्या घराची latches काम करत असणे. या सगळ्या गोष्टी सुद्धा गुणवत्तेत मोडतात.हे सगळं मी एका मध्यमवर्गीय माणसाच्या घराबद्दल बोलते आहे हे मला माहित आहे. कारण वस्तीतली सामान कमी असणारी नीटनेटकी घरं मी महाराष्ट्रभर पाहिली आहेत.

   गुणवत्तेच्या  उपस्थितीची क्वचितच नोंद घेतली जाते पण तिच्या अनुपस्थितीची मात्र जोरदार दखल घेतली जाते.संपूर्ण क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टीमधील गुणवत्तेची नोंद काहीवेळेस घेतली जातही नसेल,पण ती असणं गरजेचे आहे.फुल हे फुल असते पण त्याचा सुवास मात्र त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो.गुणवत्ता ही अशी अदृश्य ताकद आहे जिच्या उपस्थितीमुळे गोष्टी वेगळ्याच दिसू लागतात.

Friday, January 23, 2015

शेवटचा शब्द

    माझी एक मैत्रीण मला सांगत होती की,तू चुकीची आहे,आणि ती तसा का विचार करते याचे स्पष्टीकरणही तिच्याकडे होते.मी असं का करते आहे हेही मी तिला स्वच्छ शब्दात स्पष्ट सांगितले आणि मी का चुकीची नाही हे ही सांगितले.मी माझा मुद्दा कसा योग्य नाही याचेही तिच्याकडे स्पष्टीकरण  होते. अजूनही ती मी कशी चुकीची आहे हेच सांगत होती.माझे म्हणणे होते की तीच अजूनही माझे स्पष्टीकरण योग्य पद्धतीने कशी घेत नाही.मी बऱ्याच वेळ तिला मीच कशी बरोबर हे सांगत राहिले आणि ती ती कशी बरोबर हे सांगत राहिली.आमच्या दोघींकडे त्या मुद्दाला धरून पुरेशी स्प्ष्टीकरणे होती.
    नंतर तिने मला टीकात्मक इमेल केले आणि मी तिचे आरोप नाकारले.मग मी ते का नाकारत आहे म्हणून तिने परत स्पष्टीकरण दिले.
  माझ्या लक्षात आले की प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला आपलाच शब्द शेवटचा वाटतो.
   नथुराम गोडसे कडे सुद्धा गांधीना मारण्याचे योग्य स्पष्टीकरण असेल,ओसामा बिन लादेन कडे वर्ल्ड ट्रेड सेंटर का पाडले आणि तो दहशतवादी संघटना का चालवत होता याचे स्पष्टीकरण असेल.अभिनेत्री-अभिनेते स्क्रीन वर सिगारेट का ओढतात याचे स्पष्टीकरण त्यांच्या कडे असेल.मी भाजीत मीठ जास्त का घालते याचे स्पष्टीकरण माझ्याकडे असेल आणि प्रत्येक पुरुषाचा राग हा कसा योग्य आहे याचे स्पष्टीकरण प्रत्येक नवऱ्याकडे असेल.
  प्रत्येकाकडे स्प्ष्टीकरण आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा शब्द शेवटचा असावा असे वाटते.वस्तुस्थिती अशी आहे आणि ती आपल्या लक्षात आली पाहिजे की मी प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते  आणि माझा शब्द हा शेवटचा असायला हवा असं मला वाटत आहे ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे,आणि हे तरी किमान तुम्ही म्हणा.
       मी मला सांगितलं आहे की, माझ्या जीवनातील क्षुल्लक गोष्टीसाठी मी जाणीवपूर्वक इतरांना त्यांचा शेवटचा शब्द सांगू द्यायला पाहिजे म्हणजे त्यामुळे मी माझा वेळ,उर्जा,मेहनत आणि माझी स्पेस वाचवू शकेन.यामुळे मला अनेक क्षुल्लक गोष्टींचा विचार करण्यापासून प्रचंड स्वांतत्र्य मिळाले आहे.सुदैवाने ९०% गोष्टी ह्या अशा क्षुल्लकच असतात.

  याबाबत तुमचे दुसरे काही मत आहे का?तुम्ही त्याला काहीही म्हणा.मला काही म्हणायचे नाही.तुमचा शब्द हा शेवटचा असू द्या.    

Tuesday, January 6, 2015

सुवासाचा राजा














एखादी गोष्ट म्हणजे एखादे झाड,फुल,एखादी व्यक्ती,प्रसंग,सिनेमा,नाटक,पुस्तक हे आपल्याला रोज दिसत असते,भेटत असते,आपल्या मनात ते अखंड सुमधुर असा नादही निर्माण करत असते,रुंजी घालत असते.पण तरीही आपण त्यावर लिहायला तयार होत नसतो. काय कारण असावं बरं याचं. आपल्याला त्याबद्दल काही वाटत नाही,किंवा त्या गोष्टीचे अस्तित्व आपल्या मनात काही तरंग उमटवत नाही असं तर मुळीच नसतं.उलट ते सदा सर्वकाळ आपल्याल जवळ आपल्या अगदी नकळत असतं. काही अध्यात्मिक लोकांच्या मन जसं सजग असते. तसं आपलं मन जरी वरील गोष्टी भौतिक असतील तरी त्याबाबत सजग असतं. त्याची जाणीव असते.कधी कधी मला वाटतं ,आपलं लहान मुलासारखं होत असेल म्हणजे त्याबद्दल बोललं,लिहलं तर ते आपलं अस्तित्वच आपल्यातून नष्ट करेल की काय ही भीती असते.माहित नाही .पण सोनचाफ्याच्या फुलाबद्दल मात्र मला असच काहीसं वाटत होतं.
    कधी भेटलं हे फुल मला? आठवत नाही.पण लहानपणी असेल. नंतर आम्ही ठाण्याला राहायला गेलो तेव्हा मात्र आम्ही रोज ती फुलं विकत घेत असू. त्याचवेळी मी मनाशी ठरवलं होतं की एक दिवस मी याचं झाड लावेन आणि रोज किमान एक तरी फुल मला मिळेल. आज मला माझ्या त्या निर्णयाची खूप मजा वाटते.कारण त्यावेळी आम्ही घर बांधू वगैरे असं काही डोक्यात सुद्धा नव्हतं.
        आज माझं सोनचाफ्याचे झाड दोन वर्षाचे झालं आहे. त्याचे रोप मिळावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला . त्या रोप वाल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे. कारण आपण जे रोप घरी नेत आहोत ते सोनचाफ्याचेच असेल  याची आम्हांला खात्री वाटत नसे. मग झाड लावतांना ते कुठे लावायचं यावर चर्चा.मला आपलं वाटायचं ते अशा ठिकाणी लावावं की मला लगेच फुलं काढता यायला हवी. म्हणून त्याला पहिलं पान आलं तेव्हापासून माझं त्याकडे बारीक लक्ष होतं. उन्हाळ्यात त्याला फार जपावं लागतं असं आम्हांला कळलं.मग मी त्यावर बारदान ओलं करून टाकलं ते जरा कोरडं पडलं की त्यावर पाणी शिंपडल आहे.कारण खूपजणांनी मला सांगितलं होतं की ,त्यांचे एक-दोन वर्षाचे झाड उन्हाने जळून गेले होते.’त्यामुळे मी त्याची खूप काळजी करत होते.अर्थात मला मी लावलेल्या प्रत्येक झाडाची काळजी असते. पण हे माझं विशेष लाडकं होतं.
  त्याचा सुवास मी फुल आलं नसतांनाही अनुभवला आहे.एखाद्या गोष्टीचे वेड लागणे म्हणजे काय याचा अनुभव मी घेतला आहे.कधी कधी त्या झाडाच्या जवळ आमची जी खिडकी आहे तिथे जवळ जावून मी म्हणायचे,अरे मला फुलाचा सुगंध येत आहे,फुल फुललं वाटतं. जावून बघायला पाहिजे’माझ्या या वाक्याकडे कोणी फार लक्ष देत नव्हते.कारण रोप घरी आणल्यापासून मी असं काही काही बडबडत आहे ,त्यामुळे फारसं लक्ष कोणी दिले नाही. झाड छान वाढले.मुख्य म्हणजे उन्हाला त्याने ताकदीने तोंड दिले. याबद्दल मी खरोखरच कौतुक केले.मग त्याला सांगितले की आता पाऊस येणार आहे,कदाचित वारं येईल,वादळ येईल.तू जपून रहा हं.हा माझा वेडेपणा होता असं मला आज वाटतं आहे.कारण हे झाड निसर्गाचा भाग आहे,त्याला हे उपजतच माहित असणार. कोणत्याही गोष्टीला तोंड कसे द्यायचे,ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे त्याला शिकण्याची गरज नव्हती.पण मी त्याचे मातृत्व घेतले होत ना?मग मी सावध करायचे.झाडाला सुंदर अशी हिरवी पाने आली.ते डेरेदार होत होतं आणि त्याबरोबरच माझा आनंदही डेरेदार होत होता.पण फुल कुठे आहे? तो सुवास मी झोपेतही घेत आहे,ज्या सुवासाने मला जाग  येत होती. मनात सारखं येत होतं की आता फुल यायला पाहिजे.हवंच आहे. मग मी रोज झाडाला सांगितलं ,मला फुलं हवी आहेत, खूप फुलं हवी आहेत.ये ना लवकर.
  एक दिवस मी रात्री गच्चीवर फेऱ्या मारत होते.वरून झाड सुंदर दिसत होतं.मी रोज निरखून पाहायचे.अगदी बारीक नजरेने आणि त्या नजरेत मला दोन कळ्या दिसल्या. आधी माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं ,नंतर मी खरोखरच मोठ्याने हसू लागले. माझा आनंद मनात,स्मितात मावत नव्हता.मी दोन्ही हात पसरले आणि त्या झाडाला कवेत घेत म्हटलं thank you .मग ती कळी किती मोठी झाली याचं निरीक्षण सुरु झालं. ती तिचा रंग कसा बदलते.हे ही पाहत होते आणि एक दिवस त्या झाडाखाली उभी राहिले असतांना तो मला वेडावणारा सुगंध आला आणि मी वर पाहिलं. हो ते तिथं होतं .पूर्ण फुललं होतं. मी हलकेच ते फुल ओंजळीत घेतलं,आणि प्रत्यक्षात स्वप्नात नव्हे मी त्याचा सुवास घेतला.एखाद्या गोष्टीची आपल्याला तहान लागते ना तशी माझी तहान या फुलाने शांत केली. थंड केली.माझं स्वप्नं पूर्ण  झालं.

  मला वाटलं की आता फुल आल्यावर मी त्या झाडापासून आपोआप लांब होईल.पण तसं घडत नाही. मी अजूनही फुल काढतांना तेवढीच वेडावते.एखाद्या दिवशी फुल आलं नाही की लगेच नाराज होवून झाडाला म्हणते,’बघ ना मला फुल नाही मिळालं आज” झाडत कुठेतरी लपलेली कळी असते.ती वाऱ्याच्या सहाय्याने मला दिसते आणि मला मजा वाटते की माझी इच्छा पूर्ण झाली. आता तर फुल उंच असेल तर ते काढण्यासाठी मला प्रचंड कसरत करावी लागते.पण मी तो माझा रोजचा व्यायाम समजून आनंदाने करते.या कसरती नंतर मिळालेल्या फुलाचा तर मला विशेष आनंद होतो. ते सोनेरी,पिवळं,नाजुक दिसणारं पण सुवासाने बळकट असणारं फुल माझ्या हातात असतं तेव्हा वाटतं ,आता खरा दिवस सुरु झाला कारण तो सुवासाचा राजा माझ्याजवळ असतो ना.

Saturday, December 20, 2014

आपलं जीवन


    निर्मात्याने स्त्री आणि पुरुषाला हेतुपूर्वक थोडेसे अपूर्ण बनवले असावे ,त्यामुळे ते एकमेकांना स्वीकारतील आणि पूर्ण करतील.असं मला वाटते.आताही विचार करतांना मला असेही वाटते आहे की,अनेक शतकांपासून पती आणि पत्नी अशा परिभाषेत त्यांना अडकवले गेले आहे,ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो.त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या  शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले  आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर ?.आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची ,वडिलांची ,तर कधी छोट्या मुलाची ,शिक्षकाची ,सल्लागाराची भूमिका करत असतोच ना.,आणि अर्थात आपण    पती –पत्नी सुद्धा असतोच. .ह्या नात्याची व्याप्ती जर वाढवली  आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?
    वैवाहिक नात्याची प्रतिष्ठा ही यातच असेल ,जेव्हा आपण आपल्या  जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण,स्वतंत्र्य व्यक्ती मानली. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले ,वैयक्तिक मुल्यांवर ,दृष्टीकोनांवर ,श्रद्धावर चर्चा केली , आणि एकमेकांच्या भावनाविषयी संवेदनशील झालो ,सुसंगत भावना विकसित केल्या ,आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून अध्यात्मिक बैठक विकसित केली .व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला  आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू,त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.
   हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ,तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .खुपजण  या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात.ते मेलेल्या नात्या बरोबर रहातात.जर रोपटे लहान असतानाच मेले तर झाडाचे काय होईल.म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या  आणि अधिक काळ टिकतील.
     जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो.वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो,ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात.दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला,स्वप्नांवर बोला,महत्वकांक्षे वर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठ पणे आणि आतून सहभागी व्हा.हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.
   वैश्विक संकल्पना अशी आहे की लग्नानंतर दोन जीव एकमेकात मिसळून जातात आणि त्यांचा एक जीव होतो.याचा परिणाम असा असतो की स्त्री ला लग्नाच्या नांवाखाली  नेहमी पुरुषाची सावली बनून रहावे लागते. त्यांना त्याग करावा  लागतो  मग त्या व्यक्ती  निराश होतात ,स्वतः वर द्या करतात.  अशी  स्थिती  ही “तुझे”जीवन आणि “माझे”जीवन असे वेगवेगळे असते तेव्हा अधिक होतांना दिसते.” अर्थात काही ठिकाणी नात्यात तशी सकारात्मकता येणं काही कारणांमुळे फार अवघड होवून बसते.पण   “आपले जीवन” हे त्या अवकाशाला छेद्णारी गोष्ट आहे ज्याला लग्न म्हणतात. वैवाहिक जीवनातला आनंद हा दोघे “आपल्या” अवकाशाशी कसे संबधित आहेत आणि तो अवकाश जाणाऱ्या वर्षाबरोबर कसा वृद्धींगत  होतो यावर अवलंबून असतो.नाहीतर तो त्याचे जीवन जगेल आणि ती त्याचे जीवन जगेल.वस्तुस्थिती अशी असेल की ती तिच्या उत्तम “आपल्या” अवकाशात असेल जेव्हा तो ही त्याच्या  स्वतःच्या अवकाशात जाईल. यातून हा विश्वास मिळेल की तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करतात. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी,प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही.
   विवाहाचा खरा अर्थ असा होतो की ज्या जीवनात तुम्ही दोघं गुंतले आहात त्याची गुणवत्ता वाढवणे होय.विवाह जीवनभर सातत्याने राहू शकेल,आणि दोघां साठी चांगल्या शक्यता निर्माण करेल.

  चांगला विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, तो विकसित करावा लागतो.वैवाहिक नातेसंबंध हे सुंदररीतीने गुंफणे ही एक कला आहे,म्हणून आपण  कलाकार होवू या.