Saturday, December 20, 2014

आपलं जीवन


    निर्मात्याने स्त्री आणि पुरुषाला हेतुपूर्वक थोडेसे अपूर्ण बनवले असावे ,त्यामुळे ते एकमेकांना स्वीकारतील आणि पूर्ण करतील.असं मला वाटते.आताही विचार करतांना मला असेही वाटते आहे की,अनेक शतकांपासून पती आणि पत्नी अशा परिभाषेत त्यांना अडकवले गेले आहे,ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो.त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या  शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले  आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर ?.आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची ,वडिलांची ,तर कधी छोट्या मुलाची ,शिक्षकाची ,सल्लागाराची भूमिका करत असतोच ना.,आणि अर्थात आपण    पती –पत्नी सुद्धा असतोच. .ह्या नात्याची व्याप्ती जर वाढवली  आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?
    वैवाहिक नात्याची प्रतिष्ठा ही यातच असेल ,जेव्हा आपण आपल्या  जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण,स्वतंत्र्य व्यक्ती मानली. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले ,वैयक्तिक मुल्यांवर ,दृष्टीकोनांवर ,श्रद्धावर चर्चा केली , आणि एकमेकांच्या भावनाविषयी संवेदनशील झालो ,सुसंगत भावना विकसित केल्या ,आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून अध्यात्मिक बैठक विकसित केली .व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला  आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू,त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.
   हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ,तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .खुपजण  या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात.ते मेलेल्या नात्या बरोबर रहातात.जर रोपटे लहान असतानाच मेले तर झाडाचे काय होईल.म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या  आणि अधिक काळ टिकतील.
     जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो.वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो,ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात.दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला,स्वप्नांवर बोला,महत्वकांक्षे वर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठ पणे आणि आतून सहभागी व्हा.हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.
   वैश्विक संकल्पना अशी आहे की लग्नानंतर दोन जीव एकमेकात मिसळून जातात आणि त्यांचा एक जीव होतो.याचा परिणाम असा असतो की स्त्री ला लग्नाच्या नांवाखाली  नेहमी पुरुषाची सावली बनून रहावे लागते. त्यांना त्याग करावा  लागतो  मग त्या व्यक्ती  निराश होतात ,स्वतः वर द्या करतात.  अशी  स्थिती  ही “तुझे”जीवन आणि “माझे”जीवन असे वेगवेगळे असते तेव्हा अधिक होतांना दिसते.” अर्थात काही ठिकाणी नात्यात तशी सकारात्मकता येणं काही कारणांमुळे फार अवघड होवून बसते.पण   “आपले जीवन” हे त्या अवकाशाला छेद्णारी गोष्ट आहे ज्याला लग्न म्हणतात. वैवाहिक जीवनातला आनंद हा दोघे “आपल्या” अवकाशाशी कसे संबधित आहेत आणि तो अवकाश जाणाऱ्या वर्षाबरोबर कसा वृद्धींगत  होतो यावर अवलंबून असतो.नाहीतर तो त्याचे जीवन जगेल आणि ती त्याचे जीवन जगेल.वस्तुस्थिती अशी असेल की ती तिच्या उत्तम “आपल्या” अवकाशात असेल जेव्हा तो ही त्याच्या  स्वतःच्या अवकाशात जाईल. यातून हा विश्वास मिळेल की तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करतात. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी,प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही.
   विवाहाचा खरा अर्थ असा होतो की ज्या जीवनात तुम्ही दोघं गुंतले आहात त्याची गुणवत्ता वाढवणे होय.विवाह जीवनभर सातत्याने राहू शकेल,आणि दोघां साठी चांगल्या शक्यता निर्माण करेल.

  चांगला विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, तो विकसित करावा लागतो.वैवाहिक नातेसंबंध हे सुंदररीतीने गुंफणे ही एक कला आहे,म्हणून आपण  कलाकार होवू या.

Tuesday, November 25, 2014

वाट पहाणे


    वाट पहाणे आणि च्या साठी वाट  पहाणे यामध्ये सूक्ष्म फरक आहे,जसा शांततापूर्ण प्रगती आणि तणावपूर्ण यश यात जसा फरक आहे.
    शेतकरी नांगरणी करतो आणि बीज पेरतो  ...नंतर त्याला थांबावं लागतं..तिथे त्याची पेरण्याची  जबाबदारी संपते. आता जर त्याला  वाट पहाण्याची कला माहित असेल  तर तो शांततेने वाट बघेल.त्याऐवजी जर तो” आता  मोड कधी येतील काय माहित? या विचाराने  वाट पहात  राहील तर तो अस्वस्थ होईल आणि त्याच्यावर ताण येईल. त्याचे मन सतत म्हणत राहील –“असे का घडले नाही?अजून का घडले नाही.अखेरीस मोड आलेच तरी त्याने त्याची शांतता त्या यशासाठी खर्च केलेली असते. बिघाड होवून गेलेला असतो.
       जर आपण  लिफ्टचे बटण दाबले तर आपल्याला ती येण्याची  वाट पहावी लागेल. आपण शांत राहू .पण ”ची वाट पहाणे” आपल्याला जमिनीवर ठेवेल पण आपले  डोळे सारखे  वर आणि खाली करतील ,आपण पन्नास वेळा त्याची बटण दाबत राहू,बरोबरच्या व्यक्तीला आपली कृती कशी बरोबर आहे हे पटवत राहू,मागच्या वेळी असं केल्याने लिप्ट कशी पटकन आली हे ही जोडीला सांगत राहू ...आपल्याला  वाटेल जर तिचा वेग वाढवता आला  तर ती आपल्यापर्यंत  लवकर येईल.तसेच आपण वेटरला ऑर्डर दिल्यांनतर आपल्याला काही वेळ  थांबावं लागते.हे आपल्यालातल्या काही जणांना माहित नसते. त्यांना वाटते की वेटरने  ते हॉटेलात शिरल्या बरोबर त्यांचे मन वाचावे  आणि पटकन त्यांना हवे ते आणून द्यावे . ..वेटर “ची वाट बघणे” याचा त्यांना संतापजनक अनुभव येतो
  .आपल्याला हवा तसा निर्णय आपण घेतो  ....आपल्याला  जशी कृती करायची तशी करत आहोत .तर मग ..आता थांबा...त्या “च्या वाट पहाणे” यासाठी नाही तर फक्त थांबा....यात आपल्याला  शांततेची किल्ली सापडेल,”ची वाट पहाणे” सुद्धा आपल्याला  यश देईल,पण ते यश  तणाव सुद्धा देईल.जर  यशासाठी शांततेचा मार्ग आहे तर मग तणावाचा मार्ग कशाला घ्यायचा? नाही का?
     अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक आवश्यक गुण लागतो आणि तो म्हणजे आपली भूमिका करायची आणि थांबण्याची क्षमता होय.अनेक लोक अध्यात्मिक अनुभवासाठी  लोक रडत असतात,त्यांच्या हातून शांतता निसटून जाते,आणि खरं तर ते त्यांच्या “ची वाट पहाणे” या  दृष्टिकोनामुळे दुःखी असतात. “ची वाट पहाणे” मुळे अनुभवा ऐवजी  आपण आपल्या  विरूद्धच उभे राहतो , खर तर आपल्याला  “ज्या  अनुभवाचा”साक्षीदार व्हायचे असते.तो  अनुभव हा नुसता  थांबण्याचा साक्षीदार आहे.

  “ची वाट पहाणे “ सोडून देवू या  म्हणजे आपण  तणावपूर्ण  यशही आपोआप येणार नाही. आपले  काम/भूमिका आणि आपली कार हे सर्व  थांबा आणि हे शिकून घ्या या मंत्राने केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. अर्थात हे सर्वच मला एका काकडीच्या बी ने शिकवलं.

Saturday, November 15, 2014

सूर्योदय आणि सूर्यास्त


  एका लहान मुलीला चित्रं काढण्याचे अतोनात वेड होते.तिला चित्रं काढण्यासाठी कोणतीही जागा चालत असे किंवा कुठे,कधी,केव्हाही हातात येणाऱ्या कोणत्याही साधनाने ती चित्रं काढत असे आणि स्वतः काढलेल्या त्या रेषांकडे ,आकृत्यांकडे मग्न होवून बघत  बसे.जर तिची तंद्री कोणी मोडली तर बाईसाहेब मोठ्याने भोकाड पसरत असत.लहान होती तोपर्यंत सगळ्यांनाच तिचं हे चित्रकार असणं फार आवडत होते. कारण त्यामुळे त्यांना तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नसत . पण जसजशी ती मोठी होवू लागली,शाळेत जावू लागली तसतशा तिच्याकडच्या अपेक्षा वाढल्या. तिचं असं तंद्रीत बसणं खटकायला लागलं. विशेषतः तिच्या पालकांना तिच्यात  वेडेपणाच्या छटा दिसायला लागल्या.म्हणून त्यांनी तिला कोंडून ठेवलं.तिच्याजवळ कोणतीही अशी वस्तू राहणार नाही,ज्यापासून ती चित्रं काढेल.याची त्यांनी नीट काळजी घेतली.मुलीला खूप राग आला.आदळआपट आरडाओरड ,किंचाळणे,दारावर धाड धाड आवाज करणे. हे सगळं करून ती थकली.शेवटी नीट वागण्याचा म्हणजे घरातली,शाळेतली सगळी कामं नीट करण्याचा वायदा झाला.( पण चित्र काढणार नाही’ हे मात्र तिने कबूल केले नाही.)तरीही कोणीच दार उघडले नाही.मनात संताप होताच.लहानच होती.चित्र न काढू देण्याच्या अनेक उपायांनी ती सतत ग्रासलेली होती. रागारागाने ती सगळीकडे थुंकली,शु केली आणि त्यातच काहीतरी गिरगटाला लागली,मनातलं अपार दुःख ती अशी व्यक्ती करायला लागली आणि हळूहळू शांत झाली. पहिल्या १-२ तासानंतर आवाज नाही.म्हणून संध्याकाळी पालकांनी दार उघडून पाहिलं तर पोर शांत होऊन  पडली होती. तिने तिच्या डोळ्यात कोणतीही ओळख नव्हती. ते घाबरले .आई रडायला लागली.मुलीची सूर्योदयाची,सूर्यास्ताची चित्रं गोळा करून दाखवली पण तिच्या डोळ्यात ओळखच नव्हती.सूर्याच्या प्रखर प्रतिष्ठेच्या आगीने तिला एवढे तप्त केले की तिच्यातली ती जळून खाक झाली.
  सूर्योदय आणि सूर्यास्त बघतांना ही गोष्ट मला नेहमी आठवते. त्या पोरीच्या डोळ्यांनी कितीतरी वेळा मी तो पाह्यचा प्रयत्न करते.अद्भुत वाटते.खरतर आपल्यातल्या खूपजणांना हिलस्टेशनला किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जावून सूर्यास्त बघण्याची हौस असते. रोज आपल्या गावात होणारा  सूर्योदय,सूर्यास्त पाहण्याचे अप्रूप वाटत नाही.मला मात्र त्याचे नेहमीच अप्रूप आहे.आपण जर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज पाहत असलो तर त्याच्या वेळा ऋतू प्रमाणे  बदलत जातात हे लगेच कळते.त्याचे  दक्षिणायन,उतरायण कधी सुरु झाले हे लगेच कळते आणि त्यातली गंमत अनुभवता येते.मग कॅलेंडर ,पंचांग बघण्याची जरूर भासत नाही. शिवाय सूर्योदयाच्या वेळा शांत असतात.त्या एक अख्खा दिवस तो तुमच्या स्वप्नासह तुमच्या ओटीत टाकतो,ते ही त्याच्या तेजसाहित.हा विचारच मला फार आकर्षित करतो. दिवसाची उमेद बाळगावी असा वाटणारा हा विचार असतो.कधी कधी तर सकाळी मी खिडकी उघडून त्याला बघते तेव्हा म्हणते सुद्धा,अरे बरं झालं तू वेळेत आलास ते.नाहीतर आज तुझ्याकडे मला बघायला वेळ झाला नसता. मग त्याची सोबत घेवून सकाळच्या कामांना छान सुरुवात करते. मला माहित आहे,’आज’ या दिवसांत तो जेवढा छान आणि  सुखावह वाटतो आहे तो पुढे कधीतरी वाटणार नाही. पण म्हणून ‘आज’ ला झाकोळून कसं चालेल.?

     सूर्यास्ताचे सुद्धा गणित आपण रोज तो बघत असू तर आपल्याला कळते.ऋतू प्रमाणे झालेला बदल लगेच लक्षात येतो.मग सूर्यास्ताच्या आधी दोन-पाच मिनिटे आधी जावून उभे राहता येते. आपल्या घरातूनच तो दिसत असेल तर मात्र सहज डोकावता डोकावता ही त्या वेळा आपल्याला साजऱ्या करता येतात. सूर्य स्वतःचा तेजस्वी साज हळूहळू काढून घेतो आणि ढगात लुप्त होतो किंवा डोंगराआड जातो किंवा समुद्रात बुडतो.तेव्हा तो पसरवत असलेल्या रंगछटा आपल्याला मोहून टाकतात. सहजपणे सभोवताली आपण पाहतो तेव्हा रंगाची मंद उधळण दिसते.खूप प्रसन्न,शांत,निवांत वाटते. एक प्रसन्न हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसत राहते.कितीतरी वेळ तो गेला त्या जागेकडे आपण पाहत राहतो.जणू तो परत पटकन “भो”करणार आहे. एकमात्र खरं रोज रोज सूर्यास्त पाहयची सवय लागली तर आपण त्यात खूप अडकून जातो. मला जर कधी गच्चीवर जायला उशीर झाला तर मी सरळ म्हणतेच,’अरे हे काय थांबायचं ना थोडे,मी येतच होते. एक माणूसपण त्याला देवून टाकते आणि त्याने पसरवलेल्या मनोहारी छटावर लुब्ध होते. त्याच वेळी आकाशात एखादा पक्षांचा थवा जेव्हा त्याच्या समोरून जातो तेव्हा वाटते,अरे चित्रकार काढतात ती चित्रं त्यांनी खरोखरीच अनुभवलेली असतात.तुम्हांला आठवत असतील अशी अनेक चित्रं,ज्यात संध्याप्रकाशात तळ्याचं,समुद्राचं पाणी चमचमते आहे किंवा प्रत्यक्ष आणि पाण्यात बुडणारा सूर्य,सूर्यास्त होतांना सुर्याजवळून जाणारा लहान पक्ष्यांचा थवा,संधीप्रकाशात तळ्याशी बसलेली तरुणी,,चिंताक्रांत म्हातारा,खेळणारी मुलं,आणि आपली छोटी मैत्रीण जी प्रतिष्ठेच्या दाहाने आपली निर्मितीच मूक करून बसली.खरतर तिचे हे मौन सुटावे म्हणूनच मी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहते.वाटते ती माझ्याबरोबरच आहे हे सगळं चित्र पाहत आणि भरेल कधीतरी ती रंग तिच्या स्वप्नांमध्ये.   

Sunday, October 19, 2014

कभी अलविदा ना कहना


   सीमा आणि अतार्किक यांचं काल जोरदार भांडण झालं .सगळ्या कॉलनीने ते ऐकलं.पण रात्रीची वेळ असल्याने सगळ्याच बायकांना शांत बसावं लागलं.फोन करूनही उपयोग नव्हता.कारण सीमा बाई फोनवर खेकसायला कमी करणार नाही.शिवाय म्हणतील तुम्हांला एवढा दम निघत नाही का? उद्या दुपारी मी शिपाया बरोबर निरोप पाठवून बोलवून घेतले असतेच ना? खर आहे तिचं.तिने आम्हांला बोलावून सगळं सांगितलं असतं.कारण भांडण रात्री झालं होतं आणि तिच्याकडे रात्रीच्या वेळी शिपाई नसतो नाहीतर तिचं काम शिपाईच करतो. आम्ही आमच्या शिपाया पासून सगळं लपवायला पाहतो तर हिचं आपलं तिसरच.
   सकाळी पाहिलं तर बाईसाहेब व्यवस्थित आवरून फुलं तोडत होत्या आणि चक्क गाणं गुणगुणत होत्या. हटकलं असतं तर म्हटलं असतं माझ्या नावातच सीमा आहे,मी सगळं मर्यादा सांभाळून करते,काय लढाई करायची असेल ती सीमेवरून करते आणि लगेच समेवर येते.तिची समेवर येण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आम्ही दुपारी आपापला नाश्ता घेवून तिच्याकडे जमलो तेव्हा मादाम फार जुन्या काळात गेल्या.आणि कहाणीची सुरुवात करत म्हणाल्या.आटपाट नगर होतं आणि तिथे

  सीमा आणि अतार्किक यांच लग्न नुकतेच ठरलं होतं दोघं मिळून फिरायला वगैरे जात,आणि भरपूर गप्पा मारत.शिवाय इतरांपेक्षा आपलं कसं वेगळं आहे आणि कसे युनिक जोडीदार आहोत आपण हे ही त्यांचं खूप चाले.आठवड्यातून एकदा भेट होत असे त्यामुळे सांगण्यासारखं ही भरपूर असे.एकमेकांचे आई-वडिल,भाऊ-बहीण ,मित्र-मैत्रिणी असं भरपूर गबाळ गोळा करून ते त्यात रमत.स्वतः बद्दल ही ते थोडं बोलत नाही असं नाही.त्यात आवडता सिनेमा,नट-नट्या,आधुनिक आहोत असं दाखविण्यासाठी जे बोलावं लागतं ते सगळं ते बोलत.त्यामुळे भेटीचा शेवट होई तेव्हा विरहाच्या विचाराने त्यांना दुःख होई.मग ते हिंदी सिनेमाच्या गाण्याने “कभी अलविदा ना कहना “ असं म्हणत कसा बसा निरोप घेत असत.
  तिला कालच्या तिच्या भांडणापर्यंत आणण्यासाठी एकजण म्हणाली,म्हणजे आता तुम्ही एकमेकांना अलविदा म्हणणार तर.जणू ती त्यांच्या अलविदा म्हणण्याची वाटच पाहत होती.ती तरी बिचारी काय करणार,रोज तिच्या नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागे,सीमा वहिनी बघ,कशा नेहमी हसतमुख असतात ते.सीमानेच अलविदा म्हटलं म्हणजे आपोआपच ती कॉलनी सोडेल आणि ही मग नवऱ्याच्या टोमण्यातून मोकळी होईल.
पण सीमेबाहेर जाईल ती सीमा कसली आणि तार्किकतेने बोलेल तो अतार्किक कसला? सीमा यावर म्हणाली नाही ग बाई,आता कसलं आम्ही अलविदा म्हणतो आहे?
  का ग पोरी मध्ये जीव अडकला आहे का?की नवराच सोडवत नाही.आमच्या प्रश्नाने ती गंभीर होईल आणि रडत रडत काही सांगेन असं वाटलं.पण ती सीमेच्या बाहेर येईच ना.
  ती म्हणाली अग मी अलविदा म्हणायचं तर मला एक घर पाहिजे,नोकरी पाहिजे,घरात चीड चीड करायला माणूस पाहिजे.आणि त्याला सुद्धा स्वयंपाक यायला पाहिजे,बाई ठेवली तरी तिच्यावर चिडता येत नाही,शिवाय उरलेल्या स्वयंपाकाची विल्हेवाट लावायला एक माणूस घरात हजर पाहिजे.म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की,कभी अलविदा ना कहना.आम्ही जगाला अलविदा म्हणू तेव्हाच एकमेकांना अलविदा म्हणू.
  अग अलविदाची गोष्ट नको सांगू.तुझं भांडणाबद्दल सांग,त्याचे कारण सांग.
काही नाही ग ,नेहमीचच.
म्हणजे?तू कशाला नाही म्हटलं का?
  हो.
कशाला?
अलविदा ना कहना “हे गाणं कोणी म्हटलं आहे हे ओळखायला मी नकार दिला.

  आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारत आणि आमचेच दात आमच्यावर खात आणि आमच्या नाश्तातला थोडा भाग सीमाला खाऊ घालून आम्ही सीमाला अलविदा म्हटलं.

Tuesday, September 23, 2014

रांगोळीची रेघ

अस्तिवाच्या लढाया सतत आपण देत असतोच,अगदी जन्मापासूनच. हो आपण रडतो,हसतो,वाट्टेल तसे चाळे करतो ते आपलं अस्तित्व जाणवावं म्हणूनच असेल. काही काही वेळेस तर एखादी व्यक्ती त्या जागी नसते पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा असतात. सामान्य माणूस त्याच्या नातेवाईकांच्या आठवणीतून का होईना अस्तित्वात राहतो. तर कलाकार त्यांच्या कलेतून आपल्याला जाणवतात. त्यांची एक एक रेषा,शिल्प,शब्द त्यांची ओळख आपल्याला देत असतात. ती रेघ,ते शब्द त्यातील विचार आपण ओळखले नाही तर कलाकाराला ते आवडत नाही,किंवा तो फार थोडा वेळ असे म्हणत असतो की, ते मी माझ्या आनंदासाठी करतो आहे.पण जेव्हा एखादी कला प्रदर्शित होते तेव्हा ती लोकांची आणि लोक कलाकारा बरोबरच स्वतःचेही अस्तित्व त्यात शोधतात,मजा येते. जेव्हा कलाकार आणि आस्वाद घेणारे जेव्हा एकाच नाण्याच्या पण दोन बाजू असतात तेव्हा दोघांनाही एक एकच बाजू दिसते. काहीवेळेस स्वतःला अनभिज्ञ अशा बाजूचा शोध घेता येतो.ती समजून घेता येते. तिचा अनुभव घेता येतो. पण हे सर्व केव्हा जेव्हा स्वतःचे अस्तित्व विसरून आपण काही बघायला जातो तेव्हा. नाही मला अस्तित्वावर लिहायचं नाही किंवा कोणत्या ख्यातनाम कलाकाराबद्दल लिहायचं नाही. पण ज्या दिवशी तो प्रसंग अनुभवला त्या दिवसापासून माझ्या मनात सतत येत आहे की कोणी काढली असेल ती रांगोळीची रेघ,जी इतकी सुंदर आणि नाजूक आहे. माढ्याला विठ्ठलाचे/पांडुरंगाचे एक छोटसं मंदिर आहे. असं आम्ही ऐकलं होतं.सोलापूर पासून पंढरपूर जवळ आहे,आणि पंढरपुरात सगळ्यांची विठू माउली आहे. त्या देवळातील प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी ह्र्दयस्पर्शी असा असतो. प्रत्येकाला त्याचं कोडं सोडवावं वाटतं आणि बहुतेकजण ते सोडविण्यासाठी तेथे जातात.या विठोबाला नमस्कार करून तुम्ही बाहेर आलात,तुमच्या गावी गेलात की तुम्हांला कोणीतरी नक्की सांगेल,काहीवेळेस  गुप्त आवाजात सांगेल की,असं म्हणतात माढयाचा विठोबा हा खरा आहे.ज्यांना या खऱ्या खोट्यात फारसा रस नसतो ते शांत बसतात आणि ज्यांना असतो ते पुरावा मागतात,चर्चा करतात. आपल्याकडे खूप ठिकाणी असे आढळते. तळघरातला देव खरा किंवा सगळ्यात जुना आणि सर्वाना सहज दिसेल अशी देवाची मूर्ती खोटी.मग परकीय आक्रमण,त्यातून वाचण्यासाठी लोकांनी केलेली धडपड असा सगळा इतिहास आपण पुन्हा पुन्हा बोलतो,ऐकतो. काहीवेळेस मजा येते.काहीवेळेस हसू येते. काहीवेळेस कशाचाच अंदाज येत नाही. तरीही आपण त्यात गुंतत जातो.मनाला काय थोडसं काहीतरी थ्रिलिंग हवंच असतं. शिवाय सत्यही समजून घ्यायचं असतं. त्याच्या शोधात मी खी खरच माढ्याला जावून धडकले. लोकांना विचारत विचारत मंदिराजवळ पोहचलो. कारण गावाच्या बाहेर, गावात देवळाकडे जाण्याचा मार्ग अशा सूचना लिहलेल्या नव्हत्या. तशा लिहण्याचे काही कारणही नव्हते. कारण देवा जवळ कोणतीही बाजारपेठ नव्हती. शिवाय सरकारला देवळापासून तसा कोणताही प्रत्यक्ष फायदा नव्हता. त्यांच्या आध्यात्मिक फायद्याबद्दल मी काय बोलणार? तो त्यांनाच माहित. गल्ली-त्यापेक्षा बोळकांड्यातून रस्ता काढत देवळाजवळ पोहचले.स्वच्छ,सुंदर आवार आणि तितकच सुंदर, स्वच्छ देऊळ .शांत विठोबा,भक्तांची ये-जा ही शांतच.एकदम प्रसन्न वाटावे असं हे देऊळ पाहून खूप समाधान वाटले. खरतर देऊळ लहानच होते. दगडी भिंतींनी बांधलेले नेटके.विठोबाचे सहज दर्शन होईल इतकं सुव्यवस्थित. विठोबाची मूर्ती मात्र खूप जुनी वाटत नव्हती. खरतर हे सर्व नवेच आहे असं वाटावे इतके सगळे चकचकीत होते. खरतर पंढरपूरचा विठोबा पाहिल्यामुळे या मूर्तीचा नवेपणा अधिक जाणवला असेल. पण मूर्तीची स्थापना मात्र खूप जुनी आहे. असे तिथे कोरलेले होते. विठोबा नवा-जुना,खरा-खोटा याच्या नादात आजूबाजूला लक्ष गेले नव्हते.पण मूर्तीचे दर्शन झाल्यावर लक्षात आले की,देवळात कोणतीही अस्वच्छता नाही.शिवाय देवळात आणि देवळाच्या बाहेर एक सुंदर रांगोळी काढली आहे.ती रांगोळी पहिली आणि वाटलं,जाणून घ्यावं त्या व्यक्तीला.कारण ती रांगोळी फार मनापासून काढलेली दिसत होती. त्यातील रेषा कलाकाराच्या संवेदनशीलतेच्या होत्या. शिवाय रांगोळी काढणाऱ्या त्या व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व फक्त त्या रांगोळी पुरतेच आहे असं दाखवायचे होते. मला त्या रांगोळीने काहीतरी नवीन समजल्या सारखे वाटले. वाटलं आपण किती धावपळ करतो आपल्या एखाद्या रेषेसाठी,शब्दासाठी,आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी शहरं हवी आहेत,जाणकार हवे आहेत. कोणाची सूक्ष्म टीका आपल्याला दुःखी करते. तर कोणाचे स्वीकारल्याचे सौम्य हसू जगण्यालायक बनवते. किती लाचार आणि दिनदुबळे होत आहोत आपण.आपलं अस्तित्व इतरांनी मान्य करावं म्हणून किती झटणार आहोत. या रांगोळीच्या रेघे इतकी बेफिकिरी का नाही आपल्यात. त्या व्यक्तीला वाटलेच नसेल का कोणी आपल्याला छान म्हणावे? काय असेल तिच्या मनात. मला खूप अस्वस्थ वाटले. अजून एक गोष्ट त्या रेघेत मला जाणवली,अप्रतिम निष्ठा.आपलं काम चोख,प्रामाणिकपणे आणि तितकेच निष्ठेने करण्याचे बळ त्या रेघेत होते. समोरच्या विठोबाचे अस्तित्व जणू त्या व्यक्तीला रोज जाणवत असावे किंवा कोणी सांगावे तो सखा रोज त्या रांगोळीसाठी तिच्याकडे हट्ट धरत असावा. ते त्यांचे गुपितही असेल.हसू येते मला माझ्या विचित्र मनाचे. बघा ना कोणी नाही तर विठोबासाठी ,तो येत असेल म्हणूनच त्या व्यक्तीने निष्ठेने ती रांगोळीची रेघ काढली असं म्हणून बसले. म्हणजे स्वतःच्या स्वीकृती साठी दुसऱ्याचे अस्तित्व हवेच हा दांभिकांचा कायदा मी विसरतच नाही. बाहेरच्या जगाचा माणसावर किती परिणाम होत असतो. अंतर्मनाला कशाला हवे आहेत हे उपचार,ते या बाह्य उपचारापासून स्वतंत्र्य ,मुक्त असू शकत नाही.? निश्चित असणार. हो ती रांगोळीची रेघ मला हाच विश्वास जणू देत होती. कारण रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीचं सगळं मन त्या रेघेतून व्यक्त होत होतं. मला ते जाणवत होतं. नित्य जाणवत राहील.तेव्हापासून मला मात्र एक छंद जडलाय. रांगोळीची रेघ बघण्याचा. ती नुसती बारीक,नाजूक असून चालत नाहीतर स्वतंत्र आणि मुक्त आहे का हे बघण्याचा.

Friday, September 19, 2014

जीवनात ही घडी -


सकाळी सकाळीच घराची बेल वाजली,पाहते तर त्रिपाठी बाईचा शिपाई दारात हजर ,हा? या वेळेला? म्हणजे बाईचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला दिसतो.बाईने गाणं गायचं ठरलं की,लगेच कार्यक्रम होतो.इतकी तिची सगळीकडे वट आहे. तिच्या कार्यक्रमाचे बोलावणे नसावे या आशेने मी शिपायाला म्हटलं.
"साहब तो ऑफिस में है ,कुछ काम था क्या?"
आता त्रिपाठी बाईचा शिपाई म्हटलं की हिंदीच बोलायला पाहिजे असं थोडंच आहे,पण असं होतं खरं.ती सुद्धा अमरावतीची आहे,पण हिंदी फाडत असते. तिचा शिपाई धुळ्याचा आहे.तरी आम्ही त्याच्याशी बोलतांना हिंदी फाडतो.
  त्याने लगेच सही साठी कागद पुढे केला.अशा प्रकारचा कागद घेवून आमच्या वर्गात मुरली काका यायचे.पण त्या कागदात सुट्टीची चांगली बातमी असायची.त्या कागदांची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो,म्हणूनच नशीब अजूनही असे त्रिपाठी बाईचे आमंत्रण पाठवून आमचा डाव आमच्यावर उलटवत आहे असे वाटते.
  तुमच्या बाईसाहेब पार्टी देत आहेत का? 
   मी तो कागद हातात धरून उसना उत्साह आणून विचारले.तर शिपायाने फक्त वाचण्याची खुण केली.त्रिपाठी बाईंची त्याला बिचाऱ्याला कडक शिकवणी आहे,म्हणूनच तो इतर काही बोलत नाही.नाहीतर आमचे शिपाई,आमच्या घरात काय झालं आणि काय नाही याची सगळी उजळणी करतात.आम्ही शिस्तीच्या नाहीत,शिवाय त्रिपाठी बाईच्या मते नोकर माणसाला घरच्यासारखे वागवायचे म्हणजे अगदीच बेशिस्त .मी शिस्तीत कागद वाचला.आज क्लबमध्ये बाईचा गाण्याचा कार्यक्रम होता.त्यासाठी आग्रहाचे आमंत्रण होते.मनात हरे राम म्हटले आणि जनात व्वा फारच छान असं म्हटलं.लगेच शिपायाने सही करा,अशी खुण केली.मी मुकाट्याने सही केली,आणि त्या शिस्तीच्या पुतळ्याला खुण करून निरोप दिला.
  खरं तर मला गाण्यातलं काहीच कळत नाही.आता कोण गातोय असं कोणी विचारलं तर,मी गायक,गायिका असं उत्तर देते.गाणारी व्यक्ती स्त्री-पुरुष एवढच मला कळतं.काही गाणी आणि त्याचे गायक,गायिका पाठ झाल्यामुळे/केल्यामुळे तेवढे मी बिनदिक्कत सांगते.आताशा त्यांची संख्या काहीशी वाढल्याने काहींना मी गाण्यातली दर्दी आहे असं वाटतं.आपल्या बद्दल कोणाला काय वाटावं यासाठी आपल्याला कोणाचं मन थोडच धरता येतं? तशा या आमच्या त्रिपाठी बाईचे मन आणि गळा मी धरू शकत नाही.त्या महिन्यातून दोन तरी त्यांचे कार्यक्रम ठेवतात.सुरवातीला आम्हांला नवीन गावात बरी फुकटात करमणूक होते असं वाटायचं.पण नंतर मालिका पुढे न गेल्याने साचलेपण येतं ना तसं झालं.मग आम्ही न जाण्यासाठी  नवीन नवीन कारणं शोधायला  लागलो.पण त्रिपाठी बाईची  पण साहेबाने अचानक तपासणी साठी ऑफिसमध्ये यावे तशी अचानक निमंत्रणे यायला लागली.त्यामुळे पंचाईत व्हायला लागली.आमचा म्हणजे बायकांचा तिथे चहा –नाष्टा व्हायचा,पण घरी आल्यावर नवरा-मुलांसाठी करत बसावं लागायचं.म्हणून आम्हांला वाईट वाटायचे.आमच्यातल्या  एकीने त्यांना तसं सुचवलं की आम्ही थोडी वर्गणी काढून देतो,आमच्या घरी नाष्टा पाठवावा.तर तिला राग आला.तिने आम्हांला अरसिक ठरवलं.पण काही असलं तरी आम्हांला तिच्या कार्यक्रमाला जावंच लागत होतं कारण ती आमच्यातली सगळ्यात मोठी साहेबीन होती.
   आज त्रिपाठी बेगम साहिबाने जुनी गाणी म्हटली ,तिच्या मते ती शमशाद बेगमची गाणी होती.मी शमशाद बेगमची खूप प्रसिद्ध असलेलीच गाणी ऐकली होती.माझ्यातल्या अज्ञाना मुळे मी काहीच म्हटले नाही.शमशाद नाहीतर त्रिपाठी बेगम गाते आहे ना झालं तर मग.शेवटी बाईने तिचं आवडीचे गाणं गायला घेतलं .जीवनात ही घडी अशीच राहू दे.ती या गाण्यावर का एवढी फिदा आहे माहित नाही.पण तिच्या प्रत्येक मैफिलाचा शेवट ती याच गाण्याने करते.म्हणून कदाचित मैफलीची घडी तिच्या आयुष्यात वारंवार येत असावी आणि तिच्या मुळे आमच्या आयुष्यातही येते.यामुळे माझी चिडचिड झाली ती वेगळीच.
  तिने नेहमी प्रमाणे जाणकाराला  विचारतात तसं मला विचारलं ,काय दुसऱ्या जगात नेवून आणलं की नाही.?मी ही सज्ञान असल्या सारखी मान डोलावली.मला तिथून पटकन निघून जायचे होते.पण बाई काही सोडेना.त्या जीवनात ही घडी गुणगुणत माझ्या जवळ आल्या आणि ओळ पूर्ण करून बोलायला लागणार तेवढ्यात मी म्हटलं,अशा जीवनाच्या घड्या कशाला घालतात,चांगलं मोकळं सोडून द्या ते.बाईंनी माझ्याकडे अज्ञान बालका सारखं पाहिलं आणि म्हटलं,” मला आवडत तसं.”
  मला कपड्यांच्या घड्या सुद्धा आवडत नाही,शिवाय तेच तेच क्षण परत परत येण्यात काय मजा,शिवाय परत परत तीच घडी आल्याने पहिल्यांदा आयुष्यात आलेल्या घडीची किंमत कळत नाही.अजून एक जीवनाची ही घडी आपल्या म्हणण्यावर थोडीच चालते,ती पुढे जातच राहते.सतत पुढे आपल्या वेगाने जात राहणे ही नैसर्गिक घटना आहे.ती आपण थांबवू शकत नाही.शिवाय सारखं बरोबर राहून प्रेमाचा वसंत भांडण्यात आहे हे आपोआपच त्या घडीला कळतं.
  माझ्या या तात्विक बैठकीने बाई माझा नाद सोडतील असं मला वाटलं आणि म्हणूनच केवळ मी मनात येईल ते मी बोलत गेले.तर बाईंना त्यात माझा समंजसपणा  दिसला आणि जीवनाची घडी समजून घेण्यासाठी मला विशेष निमंत्रित केलं.मी ही मग हे राम मनात म्हटलं आणि जरूर  हे जनात म्हटलं आणि एक दिवसाचा नवरा आणि मुलं यांचाही दुपारचा नाष्टा माझ्या पदरात पाडून घेतला.जीवनाची ही घडी म्हणजे त्यांचा शिपाई आमच्या घरच्यासाठी पदार्थ करतो आहे ही  अशीच राहिली तरी चालेल असं मनात म्हणत मी बाईंचा निरोप घेतला

Thursday, September 11, 2014

चला चांगल्याचा आवाज करू या


  एक तरुणी  दैनिकामध्ये उमेदवारी करत होती.तिचे तीन महिन्याचे कठोर प्रशिक्षण संपल्यावर तिला  फिल्ड वर जाऊन एक छापण्यायोग्य स्टोरी आणायला सांगितली होती.सहा तास उन्हात फिरून प्रंचड मेहनत घेवून ती  आपल्याला काहीच करता आले नाही या भावनेने ऑफिस मध्ये पोहचली . ती शहरातल्या एका चौकातून आली होती, तेथे तिने  बघितले की दोन बस विरुद्ध दिशेने रस्त्यावर येत आहेत आणि आता त्या  एकमेकांवर आदळतीलआणि  अपघात होईल..पण या तरुण पत्रकाराने प्रसंगवधान राखले आणि ती  जिथे दोन रस्ते मिळतात तिथे पळत गेली  आणि जोमदारपणे दोन्ही हात पसरवले आणि थांबा असं जोरात किंचाळली.त्यामुळे बस थांबल्या. .अनेक प्रवाशांनी तिचे  हात हातात घेतले कारण तिने  त्यांचा जीव वाचवला होता,अनेक स्त्रियांनी तिच्या  हाताचे चुंबन सुद्धा घेतले आणि तिला  धन्यवाद म्हटले.तिची  ही धाडसी स्टोरी तिने तिच्या संपादकाला  सांगितली ,ते ऐकून  संपादक तिला  म्हणाला,” तू या स्टोरीची  नाट्यात्मकशीर्षक सांगायची सोनेरी संधी चुकवलीस “  
     आपण वाईट जगात राहत नाही .हे खरं आहे की वाईट गोष्टींचीच बातमी होते.जगात वाईट गोष्टींचा फार आवाज होतो,आपण अधिकाधिक असा रस्ता बनवण्याची गरज आहे की,ज्यामुळे चांगल्याचा आवाज होण्याची सुरवात होईल. आता आपण अजिबात अबोल राहयचे नाही.सिगरेट पिणे,दारू पिणे,चुईंगम चघळणे आणि इतर सवयी ज्या अपायकारक आहेत त्यांच्या जाहिराती आपण भरपूर केल्या,पण जगाचे ब्रेनवॉश करण्यासाठी कोणत्या चांगले उपक्रम उपलब्ध आहेत?
    कर चुकविण्याऱ्यांची पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी येते,त्याऐवजी कर भरणाऱ्याची बातमी का येत नाही.खुनी लोकांचे फोटो येतात,त्याऐवजी जीव वाचविणाऱ्याचे फोटो का नाही छापत ?प्रत्येक दिवशी सैनिकाची गोष्ट का नाही सांगत?
  आपण जगभर फिरायला हवे  आणि आपल्याला  माहित असलेल्या चांगल्या लोकांबद्दल बोलायला हवे..आपल्या  मित्रांना आपल्या  पालकांचे सद्गुण सांगायला हवेत . क्लब मध्ये,कट्टयावर,देवळात,मित्रमंडळीत  सांगायला हवे की,,तुम्हांला तुमच्या मुलांविषयी किती अभिमान वाटतो ते? आपल्या  शिक्षकाचे गुण जे आपल्याला  आवडतात ते सांगुयात . आपल्या  भोवतीचे सामान्य लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात ज्या असामान्य गोष्टी करतात त्याबद्दल गॉसिप करुयात .आपल्या  सासरच्या लोकांना लिहा की तुमच्या मुला-मुली सारखा जोडीदार मिळाल्याने मला कसं छान  वाटते.किंवा त्याबाबतीत मी भाग्यवान आहे.तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी पाहत आहात त्याबाबतीत  ओरडा,किंचाळा ,लिहा,बोला,तुतारी फुंका, आणि आवाज करा,

  आपलं जग हे चांगल्याचं जग आहे असा प्रभाव सगळ्यां मिळून टाकूया आणि  जगाला प्रभावित करू या.