Tuesday, November 10, 2020

 वाचावं जनाचं लिहावं मनाचं 


तो असतांना,तो नसतांना -

जोडीदार गेल्यानंतर माझं कसं होणार? हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात कमीअधिक फरकाने असतोच. कोणी त्या त्या वेळी बोलून दाखवतात तर कोणी शांत राहून आलेल्या परिस्थितीला तोंड देत राहतात. पण आपला जोडीदार आपल्याबरोबर नाही हे सत्य स्त्रिया कसं स्विकारतात,त्यातून कशा सावरतात ?आपल्या मनातल्या भीतीवर कशी मात करतात हे समजून घेण्याच्या इच्छेपायी वसंत कन्नाबिरन यांना हे पुस्तक लिहावे वाटले.
लग्न आणि कायमचा वियोग यापुरतीच या पुस्तकाची चौकट आहे.लेखिका म्हणते की, तिला तिच्या मनात चाललेल्या संघर्षाचे,विसंगतीचे खंडण करण्याची इच्छा होती.विवाह संस्थेमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याला आणि विकासाला खोडा बसतो, ती खुंटते अशी लेखिकेची धारणा होती.पं मग या धारणेला छेद देणारी, ‘ घर आणि त्यातल्या उबेपलीकडचे अनेक आयाम दाखवणारीही नवरा-बायकोची नाती असतात, ती स्त्रियांना बांधून घालत नाहीत,’ अशी उदाहरणे सुद्धा तिच्या समोर होती.अशा स्त्रिया लेखिकेने शोधल्या आणि त्यांच्याशी बोलून तिने हे पुस्तक लिहले.
पारंपारिक, आणि सांस्कृतिक चौकटीमुळे विधवेला दाहक अनुभव सोसावे लागतात. तरीही स्त्रिया त्यातून उभ्या राहतात ,संसार सांभाळतात,सैलावतात, खुलतात.याचे आश्चर्य लेखिकेला वाटते. म्हणून तिने असे विशिष्ट मुद्दे लक्षात घेवून मुलाखती घेतल्या. निवडलेल्या स्त्रिया नावाजलेल्या आहेत, लौकिक अर्थाने पूर्णपणे वेगळे आयुष्य जगल्या आहेत. त्यांनी दुःखाला,आयुष्यातल्या चढउतारांना भिडण्याचे बळ कसे मिळवले,हे जाणून घेण्यात लेखिकेला रस होता.
या पुस्तकात बाराजणीच्या मुलाखती लेखिकेने घेतल्या आहेत. के.शारदामणी,नीरा देसाई,रामेश्वरी वर्मा,कॅथी श्रीधर,कोयली रॉय,इला भट,सुतपा चक्रवर्ती,शांत रामेश्वर राव, मीनाक्षी मुखर्जी,,अब्ब्युरी छाया देवी, रुक्मिणी पार्थसारथी,जयलक्ष्मी नारायण या सर्व जणींशी लेखिकेने संवाद साधला.यातल्या तिघीजणी नामवंत लेखिका आहेत. दुसऱ्या तिघी स्त्री-विषयक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत, तर मानवी हक्कांच्या आणि विकासाच्या प्रश्नामध्ये काम करणाऱ्या तिघी आहेत. एकजण यात गृहिणी आहे, तिच्या निर्णयस्वातंत्र्याची ताकद पाहून लेखिका तिचे कौतुक करते. कारण एकेकाळच्या बुजऱ्या गृहिणीमध्ये एक कर्तबगार बाई होती,ती लग्नाच्या तकलादू आवरणाखाली झाकली गेली होती.तिचं स्वत्व सुरक्षित होतं.नवरा गेल्यानंतर तिच्यात खूप बदल झाला,त्या बदलाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न लेखिका करते. हा संवाद मुळातूनच वाचायला हवा. असाच आहे.
मला हे पुस्तक वाचतांना अनेक प्रश्न पडत होते.माझ्याजवळच्या मैत्रिणी नवरा गेल्यानंतर हतबल झालेल्या मी पाहिल्या आहेत.काहीजणी तर आपल्या दुःखातून बाहेर येवू शकत नाही.कधीतरी कोणाला मृत्यू येईल याचीच त्यांनी अपेक्षा केली नव्हती.किंवा त्या सत्याला कसे सामोरे जावू याचाही विचार त्यांचा मनाला शिवला नव्हता.आतल्या आत कोंडून घेत त्या उदासीकडे जातांना मी पाहत आहे. अशावेळी या पुस्तकातल्या स्त्रियांनी परिस्थितीला कसे तोंड दिले, त्यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांना कशी साथ दिली.हे उपयोगी पडणारे आहे असे मला वाटते.कोणाचाही मृत्यू दुःख देतोच,पण काहीवेळेस काळ त्याच्यावर उतारा ठरू शकतो.आपले काम शोधून ते करत राहावे असेही या स्त्रिया सांगत आहे.सगळ्यांनीच वाचावे असे हे पुस्तक आहे असे मला वाटते.
वसंत कन्नाबिरन यांच्या पुस्तकाचा अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे. अनुवाद सहज सुंदर झाला आहे..तरीही पुस्तक पूर्ण झाल्यावर वाटतं की स्त्री जोडीदाराचे म्हणणे कळले तसे पुरुषांचे कळले असते तर ? पुस्तक पूर्ण वाचावे असेच आहे.
No photo description available.
Chaitali Ranbhor, Vandana Khare and 48 others
21 comments
2 shares
Like
Comment
Share

 

वाचावं जनाचं लिहावं मनाचं

"दोला " हे गायत्री पगडी यांचं पुस्तक वाचून दोन चार वर्षे झाली असतील.काल परत ते समोर दिसलं आणि मी समोर येईल त्या पानापासून वाचायला सुरुवात केली.अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी परत परत कशाला वाचायला हव्यात?असं काहीजण मला म्हणत असतात.पण गायत्री ज्या धीराने आपल्या स्वतःच्या आणि नवऱ्याच्या आजाराकडे बघतात आणि त्यातून मार्ग काढतात. ते वाचणं,तो त्याच्याबरोबरचा प्रवास मला खूप काही देवून जातो.शिकवून जातो. ते पुस्तक आपलं कधी होवून जातं तेही कळत नाही.

लेखिका जेव्हा अल्ट्राडाइन ,भराभर बदलणारी बायपोलर डीसऑर्डर किंवा आत्यंतिक तीव्र डिप्रेशन म्हणजे औदासीन्य यांच्याशी झगडत होती, तेव्हाच म्हणजे १९९७ मध्ये पाठीच्या मणक्याला इजा होवून मानेपासून खालपर्यंत अर्धांगवायू झालेल्या ३२ वर्षाच्या पतीची काळजीही घेत होती.स्वतःला सांभाळत.इलाज करत आणि पतीची जगण्याची इच्छा,काही करण्याची इच्छा सतत जागी राहावी म्हणून सतत प्रयत्न करणारी लेखिका आपल्याला या पुस्तकात भेटते.
पण जेव्हा ती अशा प्रकारे मानसिक आजाराला तोंड देत होती तेव्हा समाजातले अनेक सुशिक्षित लोक तिला सर्रास वेडं म्हणत होते. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा तिला तोंड द्यावं लागत होतं.तसेच काम करणे आणि घरातील इतर अनेक गोष्टी बघणे यासाठीही ती झटत होती.या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने काय काय केलं हे आपण वाचायलाच हवे असे आहे.
हा काळ तिच्यासाठी परीक्षेचा आणि संघर्षाचा होता.ती म्हणते, 'तोच काल आत्मविकास,स्वतःचे सामर्थ्य ओळखणे आणि येईल त्या आयुष्याला समोर जायला शिकवणाराही होता." यावेळी हॉलिवूडमधला प्रसिद्ध नट ख्रिस्तोफर रीव स्वतःच्या मणक्यांना इजा झालेल्या व्यक्तींसाठी काम करत होता.त्याने गायत्री आणि तिच्या पतीला आजाराशी लढण्याची स्फूर्ती दिली.ती म्हणते, " जो माणूस नत म्हणून केवळ एक पडद्यावरची प्रतिमा होता तो मी आणि माझा पती यांच्यासाठी कल्पनातीत आकृती झाला."
मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घ्यायला हवं आणि आपण अशा आजारातून जात असू तर त्यावर मोकळेपणे बोलायला हवं. हेच खरं.
गायत्री या पुस्तकात अनेक गोष्टी आपल्याला सांगते. पण तिने एका ठिकाणी एका पत्रकाराचा अनुभव सांगितला आहे.जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह जवळ आला होता.म्हणून त्या पत्रकाराला काहीतरी कार्यक्रम करायचा होता.तेव्हा ती पत्रकार गायत्रीला म्हणाली, " आपल्याला डिप्रेशनबाबत काहीतरी करावे लागेल. तू बोलशील का? तुला माहीतच आहे की, आपण वेडे आहोत, आय मीन डिप्रेशनमध्ये आहोत असं स्वतः होऊन कबूल करणारे लोक कुठे शोधणार?" यावर गायत्री म्हणाली,
"ठीक आहे, मी बोलेन"
"तू मुलाखत घेईपर्यत तशीच असशील ना?म्हणजे डिप्रेशनमध्ये असशील ना? तू त्यातून बाहेर पडणार नाहीस ना?कारण आपल्याला अगदी ताजा अनुभव हवा आहे."
हे असं सगळं वाचत असतांना आपण सुन्न होवून जातो.आपण माणूस असतो का?नक्की कोण असतो आपण अशावेळी माहित नाही.या पुस्तकात लेखिकेने काही वेगळे अनुभव मांडले आहेत. ज्यावर आपण सहसा विश्वास ठेवत नाही.ती ही त्याचे सार्वत्रिकीकरण करत नाही.पण ते तिचे अनुभव आहेत.पण ती ज्या धीराने स्वतःवर उपचार करून घेते ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
या पुस्तकाचा अनुवाद डॉ. ऋचा कांबळे यांनी इतका छान केला आहे की,आपण त्यांच्या शब्दांबरोबर सहज पुढे जातो.
Image may contain: 1 person
Drpriti Mangesh Kulkarni, Varsha Thote and 21 others
7 comments
Like
Comment
Share

 #वाचावं जनाचं लिहावं मनाचं 


"Our Bodies,ourselves"

“Our Bodies,ourselves” हे लिंगभेद आणि स्त्रियांच्या आरोग्यावर स्त्रियांनी स्त्रियांसाठी लिहलेले अभिजात पुस्तक आहे. हे पुस्तक आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. या पुस्तकाच्या २०११च्या नवीन आवृत्तीत १९७० पासून काय बदल झाले याचाही आढावा घेतला आहे.
“our Bodies,ourselves” या पुस्तकाची निर्मिती १९७० मध्ये झाली. स्त्रिया स्वानुभावातून स्वतःचा शोध घेत स्वतःच्या शरीराबद्दल,आरोग्याबद्दल आणि वैद्यकीय काळजी बद्दल जे जे काही बोलल्या ते सर्व या पुस्तकात आहे.
या पुस्तकात ४०० पेक्षा अधिक स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी आपले वैयक्तिक अनुभव आणि शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आरोग्याची माहिती शेअर केली आहे. म्हणूनच आजच्या वास्तवाला धरून या पुस्तकाचे लेखन केले आहे.
१९६०च्या शेवटी आणि १९७०च्या सुरुवातीला जेव्हा बॉस्टन वूमन्स हेल्थचा गट एकत्र भेटायला लागला.तेव्हापासून आत्तापर्यंत बरेच बदल झाले आहेत.आता गर्भपात कायदेशीररित्या होवू शकतो आणि जन्मदरावर नियंत्रण ठेवण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात.अशा लोकांमध्ये वाढ झाली आहे. एड्समुळे सुरक्षित सबंध ठेवण्यावर भर दिला जात असून त्यावर खुलेपणाने चर्चा करता येवू शकते. काही ठिकाणी लेस्बियन,गे जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांना माणूस म्हणून समजून घेण्यात काहीजण तरी पुढे येत आहेत.
अनेक गट ज्यात छातीचा कर्करोग झालेल्या स्त्रियांचा गट ही सामील आहे. ते सर्वजण आरोग्यवर पर्यावरणाचा जो परिणाम होतो त्याकडे लक्ष वेधतात आणि त्याच बरोबर त्या संदर्भात होणाऱ्या संशोधनासाठी जो पैसा लागतो त्यातील राजकारणाकडे आपले लक्ष वेधून घेण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.
आधीच्या पिढीपेक्षा आता आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष हे स्त्रियांच्या जाणीवांबाबत अधिक संवेदनशील आहेत. स्त्रियांच्या आरोग्यासंबधीची माहिती आता व्यापक प्रमाणावर उपलब्ध आहे.पण तरीही ‘Our Bodies,Ourselves’ या पुस्तकाची गरज शिल्लक राहते. अजून सुद्धा वैदकीय क्षेत्र महागड्या औषधांवर, आणि सर्जरीवर जास्त लक्ष केंद्रित करते. याउलट त्यांनी प्रतिबंधक उपाय जसे सकस आहार, व्यायाम आणि स्वच्छ पर्यावरणावर आणि कामाच्या सुरक्षित जागांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे.
स्त्रियांच्या आयुष्यात येणारे बाळजन्म ते मेनोपॉज या नैसर्गिक गोष्टींकडे एका रोगाच्या नजरेतून पाहिले जाते. ती एक नैसर्गिक आरोग्यदायी प्रक्रिया आहे, त्यात कधीतरी समस्या निर्माण होवू शकते.आपल्यातल्या कितीतरी जणींना आपले आरोग्य प्रभावीपणे कसे राखायचे याचे पुरेसे ज्ञान नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतःला मदत कशी करायची हे सांगते.
या पुस्तकातून स्त्रियांना स्वतःची काळजी कशी घ्यायची, शारीरिक पातळीवर ताणाशी कसा सामना करायचा आणि अधिक कार्यशील कसे राहयचे हे सांगते. हे पुस्तक आपल्याला ह्रदयरोग, खाण्याच्या अनियमित सवयी आणि इतर अनेक परस्परविरोधी गोष्टी ज्या स्त्रियांच्या आरोग्याला घातक आहेत. या सर्व गोष्टींची स्पष्ट माहिती देते.
हे पुस्तक म्हणजे स्व-मदतीपेक्षा अधिक काहीतरी आपल्याला देते. आपल्या आरोग्याच्या विविध बाजू,अगदी आपल्या काम करण्याच्या जागेपासून ते लैंगिक अत्याचार जे व्यक्तिगत नियंत्रणाच्या बाहेर असतात. त्याबाबत हे पुस्तक आपल्याला सजग करते. म्हणूनच या पुस्तकात राजकारण, अर्थकारण आणि सामाजिक बाजू ज्यांचा आपल्या आरोग्यावर आणि वैदकीय क्षेत्रावर परिणाम होतों,त्याबाबतही या पुस्तकात स्पष्ट विचार मांडले आहेत. औद्योगिक क्षेत्रातून प्रदूषण ओकले जाते, फास्ट फुडचा राक्षस जंकफूडला पुढे ढकलतो आहे. फार्मासिटीकल कंपन्या अनाधिकृतपणे आणि अनैतिकतेने सामाजिक स्वास्थ बिघडविणारे,सरकारने बंदी आणलेल्या औषधांना प्रोत्साहित करीत आहेत. या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. ते आपण अनुभवातून तर जाणतोच पण या पुस्तकात त्याचा विविध बाजू आपल्याला दाखविल्या आहेत.
Image may contain: text that says "THE BESTSELLING CLASSIC, INFORMING AND INSPIRING WOMEN ACROSS GENERATIONS OUR BODIES, OURSELVES GLORIA STEINEM REVISED UPDATED"
Vandana Khare, Sujata Babar and 12 others
11 comments
Like
Comment
Share

  #वाचावंजनाचंलिहावं मनाचं 

 ( या सदराखाली मी फेसबुकवर लेख लिहले होते.ते पुनः इथे देत आहे.) 


समतानंद’ अनंत हरी गद्रे –भानू काळे

आपण जसं जसं वाचत जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं की,आपल्याला जगाची फार कमी माहिती आहे. आणि एवढं एकच कारण पुरेसं आहे सतत काही ना काही वाचण्यासाठी. हे नमनालाच घडाभर तेल का? तर मी वाचलेलं हे पुस्तक. आजच्या काळात आपण झुणका-भाकर केंद्र हा शब्द सर्रास वापरतो.पण त्याचे जनक अनंत हरी गद्रे यांच्याबद्दल आपल्याला फारसे काहीच माहित नसते.लेखक भानू काळे यांनी सात प्रकरणामध्ये हे पुस्तक लिहले असून ,त्यांनी सगळ्यात जास्त भर हा गद्रे यांच्या सामाजिक कामावर दिला आहे. गद्रे यांच्या ‘झुणकाभाकर प्रसाद सत्यनारायण महापूजे’च्या अभिनव प्रयोगाबद्दल लेखकाने सविस्तर लिहले आहे.
डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यतेविषयी जे विधान केले त्यामुळे श्री.गद्रे –पुस्तकाचे नायक खडबडून जागे झाले आणि त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कामाला वाहून घेतले. हिंदू समाजातील अस्पृश्यता ही अमानवी प्रथा नष्ट झाली पाहिजे असे समतानंदांना मनापासून वाटत होते. म्हणून ते गावोगाव फिरले आणि त्यांनी महार दांपत्याच्या हस्ते महापूजा आयोजित केल्या आणि प्रसाद म्हणू झुणकाभाकर वाटली.एवढेच नाही तर त्या दांपत्याच्या पायाचे तीर्थ सर्वासमोर प्राशन केले. असे ते का करतात ?यावर त्यांचे उत्तर होते की, “ स्वतः जन्माने ब्राम्हण असल्याने माझ्या पोटातील अहंकाराचे पाप मारून टाकण्यासाठी मी हरिजनांच्या पायाचे तीर्थ घेतो.जातीजातीतील भेदभाव नष्ट होवून सर्व समाजात समताभाव नांदो अशी त्या वेळी हरीजवळ शुद्ध मनाने प्रार्थना करतो.या तीर्थप्राशनाबद्दल मी इतकेच सांगतो की, फक्त ब्राम्हणांनीच हरिजनांच्या पायाचे तीर्थ घ्यावयाचे आहे. कारण त्यांनीच पूर्वी सगळ्यांना स्वतःच्या पायचे तीर्थ पाजलेले आहे!”
पुस्तकाचे नायक श्री.गद्रे हे देवरुख येथे राहत असत.लेखकाने देवरुख आणि गद्रे परिवाराची माहिती आपल्याला दिली आहे. तसेच समतानंद यांची पत्रकारिता, संपादन कार्य,नाटिकालेखन, जाहिरातकौशल्य यावर एक प्रकरण लिहले आहे. समतानंद याचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते.त्यांना नाटक-रंगभूमी,चित्रपट उद्योग,पत्रकारिता याविषयी आकर्षण होते. ते उपहासात्मक असे स्तंभलेखन करत.जाहिराती करत,तसेच सभा संमेलनांना जात आणि सडेतोड मत मांडत.त्यांची आचार्य अत्रे,सोहराब मोडी यांसारख्या दिग्गज मंडळींशी मैत्री होती आणि ‘जाहिरात जनार्दन’म्हणून लोक त्यांना ओळखत असत.आपल्याला खूप जणांना माहीत नसेल की ते ‘मौज’ चे साप्ताहिकाचे आद्य संपादक होते. त्यांनी चालक-मालक-संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडल्या. अनेक टक्के टोणपे खात त्यांनी आपले काम चालूच ठेवले. त्यांच्या दोन्ही भावांनी त्यांना सांभाळून घेतले. कारण त्यांची समाजप्रबोधनाची तळमळ त्यांना कळत होती.
हे पुस्तक मुळातून वाचायला हवे असेच आहे.कारण आजूबाजूची परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती तरी त्यांनी तारेवरची कसरत करत आपले काम नेटाने पुढे नेले.त्यांनी एक नवीन मार्ग शोधला आणि आपल्या मनाचे ऐकत ते पुढे गेले. आपण जे काम मनापासून करतो ते काम सतत आपल्याला काहीतरी नवीन देत असतं.हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण आपल्याच तपासून बघायला हवं नाही का? अजून एक श्री.गद्रे हे आपल्याला माहीत असणाऱ्या व्यक्तीचे आजोबा आहेत.कोण ती व्यक्ती ?पुस्तक वाचा म्हणजे कळेल.
Image may contain: 1 person, text that says "समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार समतानंद अनंत हरी गद्रे भानू काळे ভলাসর मायमगाम मकय www.akshardhara.com"
Vandana Khare, Sanjay Kawale and 10 others

  #वारी 

हरीपाठाची वेळ झाली.आम्ही आमची बसकरे घेऊन बसलो. टाळ वाजायला लागले.जणू हे वातावरण मी परत परत अनुभवले आहे , कितीतरी वर्षांपासून यांच्या बरोबरच आहे असं मला वाटत होतं. मला मनातल्या मनात आनंद होत होता.हरिपाठ झाल्यावर लांडगे महाराज यांचे प्रवचन झाले. आपण त्यांच्याकडे बघितले तर ते खूप साधे दिसत होते.पण ज्ञानेश्वर, तुकाराम त्यांच्या जिभेवर खेळत होते. तरी ते म्हणाले की ,’ पाहुनिया ग्रंथ ,करावे कीर्तन ‘ म्हणजे अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू नये. कारण ती देवाची सेवा आहे. त्यांनी संताचे महत्व सांगितले. संतांनी आलिंगन दिले तर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. त्यांनी सांगितले की इच्छा तीन प्रकारच्या असतात. जन्म त्या नुसार होतात. दुसऱ्याच्या इच्छेने येतात ते देव.देवाचे स्वरूप निर्गुण निराकार आहे. त्याला प्राप्त करायचे असेल तर संतांकडे जावे लागेल. संत स्वइच्छेने जन्म घेतात.भगवंताचे महत्व वाढविण्यासाठी त्यांचा जन्म असतो. आपण मात्र अनिच्छेने जन्म घेतो.अनिच्छेत दुःख असते.पण जन्मभराची प्रसन्नता हवी असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. नामावर भरवसा असला पाहिजे.म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला. खरं तर त्यावरच त्यांचे प्रवचन होते. “ ऐसा संतांचा महिमा , झाली बोलायची सीमा .............तुका म्हणे देवा , त्यांची केली पावे सेवा.

मला त्यांचे प्रवचन ऐकतांना एकीकडे चांगले वाटत होते , तर दुसरीकडे पटापट एकातून दुसऱ्या अभंगात जावून समजावून सांगायचे ते समजून घेण्यात माझी खूप तारांबळ उडत होती. हा ही एक मेंदूचा व्यायाम झाला.प्रवचन झाल्यावर बरोबर जेवणे झाली.मला वाटतं त्यादिवशी पिठलं भाकरी होती.जेवलो. बाहेर एक चक्कर मारून आलो आणि झोपलो.
दुसऱ्या दिवशी एका माउलीने मी जागे झाल्याचे पाहून मला आंघोळीला नेले.जेजुरीच्या रस्त्यावर एका दवाखानाच्या बाहेर मोठा नळ लावलेला होता. एका बाजूला एक पिंप होते.माउलीने मला आंघोळ कशी न घाबरता आणि लाजता करायची हे प्रात्यक्षिकासह दाखवले आणि तसे करून घेतले. मग माझी आंघोळच आवरेना. चल, बास झालं, सर्दी होईल म्हणून परत मला घेऊन आली. मी माझ्यावरच खूप खूष होते. मी मस्त कपडे बदलून आले.चला आपण कशावर तरी मात करायला शिकलो आहोत.आपण आपल्यावरच मात करणं किती अवघड आहे. हे मला समजून आले.मग पुढच्या मार्गावर मी अजिबातच अडखळले नाही.नंतर आम्ही एकमेकींना चिडवायचो , थांब तुझ्यासाठी शॉवर चालू करते, नीट दार बंद कर, कपडे नीट हंगरला लाव. मजा.बायका तेवढ्या वेळात सुद्धा पटापट उखाणे जुळवायच्या. त्यात त्यांच्या मैत्रिणीची थट्टा तर असायचीच पण नवराही सुटायचा नाही. उखाण्याचा शेवट मात्र पांडूरंगाच्या पायापाशी व्हायचा.त्याने दिलेले माहेरपण मिरवत माउली हसत असायच्या.

 #वारी 


धर्मपुरीच्या मुक्कामात अनेक गंमतीजंमती करत आम्ही नातेपुत्याला निघालो. मला उगीचच वाटत असेल की आता सगळ्यांचे पाय अधिरतेने पंढरपूर कडे धावत आहेत. सतत कोणाचे काय चालले आहे किंवा इथे काय जे चालू असते ते आपल्याला नीट समजायला हवे या विचारानेही मला अधिरता जाणवत असावी. खरंतर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी भजन आणि टाळ मृदुंगाचा आवाज कानावर पडत असे.त्यामुळे सतत आपण जागे आहोत ही भावना मनात घर करून राहिली होती. हे जागेपण दोन्ही प्रकारे असेल अशी समजून करून घ्यायला हरकत नाही.पण ते स्वतःच तपासून बघणे अवघडच आहे.

रस्त्यात जालन्याहून आलेली मंडळी भेटली. ते जनीचा अभंग गात होते.आपल्या हातातल्या पिशव्या डोक्यावर स्थिर ठेवून ह्या सगळ्याजणी दोन्ही हात वर करून कशा नाचत होत्या. हे मला पडलेले कोडे होते. त्यांच्या अभंगाची शेवटची ओळ झाली आणि मी म्हटलं ,मला पहिल्यापासून हा अभंग ऐकायचा आहे. लगेच सूर दिला गेला, टाळ ठेका द्यायला लागले आणि माउली गायला लागल्या.
धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर
हृदय बंदिखाना केला आत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी
शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला
जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी रे तुला
अहाहा, काय जोर आहे जनीच्या शब्दात आणि गाणारीच्या गळ्यात सुद्धा.जनाबाई चक्क देवाला दम देतात, त्याला कोंडून ठेवण्याची त्यांना भीती वाटत नाही. एक समान नाते त्या प्रस्थापित करतात. तिचे शब्द ऐकतांना किती साधे वाटतात,पण ते ज्या भावना आपल्या पर्यंत पोहचवतात त्या मात्र दमदार आहेत.मला जनी अगदीच आवडली. घरी गेले की संपूर्ण जनाबाई वाचून तरी काढेन असं मी स्वतःशी म्हटलं. आणि माउलींनी मलाच सूर द्यायला सांगितलं.कसं शक्य आहे हे ? माझा सूर मनातच लागलेला बरा.पाण्यातला आणि गाण्यातला सूर मला अजून सापडला नाही.
नातेपुते या गावातले लोक सांगत होते की , या गावात कोणतीही यात्रा नसते. दरवर्षी येणारी वारी म्हणजेच त्यांच्यासाठी एक उत्सव असतो.गावात पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या.बरीचशी दुकाने बंद होती. रस्त्यावर वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याची सोय केलेली होती. छोटंसं गाव आहे .नुकताच पाऊस पडून गेला होता , त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण होते. त्यादिवशी नातेपुत्यात मुक्काम होता.आमच्या दिंडीतील “माईंनी” एक भारुड सादर केले. भारुड ही अशी गोष्ट आहे की तुम्ही नकळत त्यात सामील होतात. हसत हसत एखाद्याला त्याची चूक सांगण्यासाठी भारुडाचा खूप उपयोग होत असावा.एकनाथांना हे कसं सुचले असेल , तो फॉर्म सापडणे आणि त्याचा या पद्धतीने उपयोग करणे ? किती अफलातून आहे ना ? आजही इतक्या काळानंतर कोणी कोणाला शिकवायला न जाता भारुडाचा उपयोग सहजपणे होतो.अशा अक्षर साहित्याकडे बघण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक होते. असे मला जाणवले. सामन्यातला सामान्य माणूस या भारूडांचा सहज उपयोग करतो हे आम्ही पुढे अनुभवले.खरंतर हे सगळे लिखाण मी गुंडाळण्याचा विचार करत होते.पण ते मला जमतच नाही. बघूया पुढचे मला लिहायला जमते की नाही.

   #वारी 

संध्याकाळी प्रवचन होते. त्यांनी संपूर्ण वारीत या ओवीवर प्रवचन दिले. तुम्ही वारीतून ही ओवी घेवून जाल . ती ओवी पाठ होईल असा त्यांचा विश्वास होता आणि तो खरा ठरला .ज्ञानेश्वरीमधिल १५ व्या अध्यायातील ३०० वी ओवी वर त्यांनी प्रवचन दिले. ते म्हणायचे सेवा रुजू करतो.

” पै आघवेचि आपुलेपणे !नुरेचि जया अभिलाषणे !
जैसे येथूनि पऱ्हा जाणे ! आकाशा नाही.!
सर्वव्यापक आकाशाला जसे अलिकडे किंवा पलिकडे जाणे संभवत नाही, ते सगळीकडे असते. एका गावाला आहे आणि दुसरीकडे नाही असे होत नाही. त्याप्रमाणे सर्व माझे आहे असा सर्वात्मभाव जागृत झाल्यावर अभिलाषा संपते. द्वंद संपते.सांग भावाचा सुकाळ होतो. माउली आकाशाचा दृष्टांत देतात . आकाश सगळीकडे आहे. आकाशाचे गुण काय आहेत तर सर्वाठायी समत्व , गुरुत्व ,असंगत्व ,निर्मलत्व .म्हणजे आकाशा सारखे व्यापक व्हा. एवढं व्यापकत्व आलं की मग भेदाभेद काही रहात नाही. सगळे आपलेच वाटू लागतात. ते आणि आपण असं न रहाता आपण सगळे एक होतो.एक होऊन पांडूरंगा कडे जातो.पायी जातो. कर्मयोगाने माणूस काळवंडतो .कर्मयोगाची कृष्ण छटा आणि ज्ञानयोगाची धवल छटा हे दोन रंग एकत्र येतात तो पांडुरंग.
सर्वांभूती समभाव हा वारकऱ्याचा गुण आहे.मी कोण आहे याचं ज्ञान म्हणजे श्रुती आणि मी कोण आहे याचं भान म्हणजे स्मृती .इथे देखणे महाराजांनी मुक्ता बाईंचा अभंग सांगितला. की ब्रम्ह कसे रोकडे आणि उघडे आहे हे मुक्ताबाई चांगदेवांना सांगते.ती म्हणते.
एकच माती नाना परी भिंती
रांजण आणि सुगडे !!
एकच कापूस नाना परी कपडे
धोतर आणि लुगडे !!
एकच सोने नानापरी लेणे
बाई आणि बुगडे !!
ब्रम्ह दिसे उघडे
मुक्त म्हणे ऐक चांगदेव
खरे आणि रोकडे
ब्रम्ह दिसे उघडे.
प्रवचन झाल्यावर आम्ही हरिपाठ आणि विनवणीचे अभंग म्हटले. कितीतरी लोकांचे हे सगळे पाठ होते. माझा फक्त हरिपाठ पाठ होता. नंतरचे अभंग कुठले हे शोधत असतांना एका माउलीने ते पान काढून दिले. मी thank you म्हणण्याचा आत ती अभंग म्हणण्यात आणि तालावर टाळ वाजविण्यात रमलीही होती. कशाचीच अपेक्षा नव्हती.नंतर जेवणे झाली. दुसऱ्या दिवशीच्या सूचना झाल्या. आमच्या बरोबर खालच्या आणि वरच्या हॉल मध्येही दिंड्या उतरल्या होत्या.सगळीकडे आमच्या सारखीच लगबग चालू होती.
पावसाची भुरभुर सुरु झाली. मी नवीन भेटलेल्या मैत्रिणी सोबत पायऱ्यावर बसले. काहीजणी तर माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या. शिकलेल्या होत्या. काहींचे शालेय शिक्षण झालेले नव्हते.पण अभंगाची माहिती होती. बसल्या बसल्या सहज कोणत्याही आविर्भावा शिवाय त्या म्हणत होत्या. स्वतःसाठी ! मी ही कोणतेही प्रश्न विचारले नाही.एवढं पाठांतर कसं? हा सतत डोकावणाऱ्या प्रश्नाला टपली मारली आणि गप्प केलं. मिळतील उत्तरं नाहीतर शोधून काढू. कारण या बाईंना घरी खूप काम असणार? त्या काही शहरी जीवन जगत नव्हत्या. त्यांचे शरीर त्याचे कष्ट सांगत होते.मग तरीही एवढे कसं लक्षात रहाते.असं मला वाटत रहाते.
झोपण्यासाठी मी ही इतरांसारखी पथारी टाकली. पटकन झोप लागली.पहाटे म्हणजे खरं तर रात्रीच ३ वाजता काहीजणीची लगबग सुरु झाली. एका माउलीने मला अलगद उठवले. ‘चल उरकून घे’ मी हो म्हटले. पथारी गोळा केली.सामान घेऊन आंघोळीला गेले. बारीक पाउस होताच. सगळ्यांचे म्हणणे होते की मागच्या वर्षीही इथूनच पाउस लागला आणि पूर्ण वारीभर राहिला. मी मनातल्या मनात पावसाला म्हटलं , बाबा थांब घाई करू नको, आधी मला आवरून घेवू डे,मग मला चालू मग तू पड.अगदी माकडाच्या गोष्टी सारखं आहे हे ,पण वारील आलं म्हणून लगेच माझ्यात कुठे बदल व्हायला ? बदलांकडे मी कसे बघणार आहे माहित नाही. पण आहे ते स्वीकारायचे एवढेच मी ठरवले होते. ,सगळं नीट अनुभवू दे असं म्हणत मी आंघोळीला गेले ,आंघोळीला मला बाथरूम मिळाले. व्वा माझी तर मजा झाली. मी एकदम खुश.मग सगळेच पटपट आवरले.चहा घेतला. डब्यात नाष्टा आणि भाजी ,पोळी घेऊन झाले. गुरुजींना नमस्कार केला. त्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवायला सांगितले. मी ही त्यांचेच ऐकायचे ठरवले.आणि जेजुरी कडे प्रस्थान केले. माउलीहि आमच्या सोबत होत्याच.