Friday, January 30, 2026

आगळ्या व्रताची वेगळी कहाणी.

आगळ्या व्रताची वेगळी कहाणी आटपाट नगर होतं. नगरात लहानमोठी कुटुंब राहत होती. सण येत होते, जात होते. घराघरात गोडधोड होत होतं. मुली झाल्या की लोक नाक मुरडत होती. पण बहीण भाऊ आपलं बालपण मजेत घालवत होते. भांडत होते, रडत होते, चेष्टा करत होते, मस्करी करत होते. आनंदाने वाढत होते. एका घरातले बहीणभाऊ असेच एकमेकांच्या साथीने मोठे होत होते. दोघे एकाच शाळेत जात. भाऊ नेहमी बहिणीची काळजी घेई. तरी वयात आलेल्या बहिणीचा अवकाश संकोचू लागला. तिच्या खेळण्यावर, हसण्यावर,बोलण्यावर आईवडिलांनी बंधने घातली. भावावरची जबाबदारी वाढली. तो बहीणीवर जास्त लक्ष ठेवू लागला. बहीण कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते – त्याची माहिती आईवडलांना देऊ लागला. बहीण हळूहळू घरातच जास्त वेळ राहू लागली. आई जवळ घरकाम शिकू लागली. अभ्यासात मन रमवू लागली. घराबाहेरच्या लोकांशी हसेना, बोलेना. पण ती अभ्यासात हुशार होती. चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाली. तिला मोठ्या गावात कॉलेजात जायची इच्छा होती. पण रोज तासभराच्या प्रवासात तिला कोणी त्रास देईल. तिला वाईट संगत लागेल नाहीतर ती जातीबाहेरच्या मुलांच्या प्रेमात पडेल – अशा विचारांनी तिला कॉलेजात घातले नाही. बहिणीचे मन खट्टू झाले - याची जाणीव भावाला झाली. तो दुःखी झाला, कष्टी झाला. कॉलेजात तिच्यासोबत जावे का? तिचे रक्षण कसे करावे ? आपण तिला कुठे कुठे पुरणार? तो विचारात पडला. एके दिवशी काय झाले? बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले. मुलाची जातपात, पैसाअडका, जमीनजुमला सगळे पाहून आईवडिलांनी तिचे लग्न ठरवून टाकले. लगोलग साखरपुडा ठरला. घरात सगळे आनंदात होते. पण बहीण मात्र दु:खी दिसू लागली. कष्टी वाटू लागली. भावाला तिची नाराजी दिसत होती. सगळे छान असूनही आपली बहीण आनंदात का नाही, ते त्याला उमजेना. तो मित्रांकडे गेला, मैत्रीणीना भेटला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याने अनेक पुस्तके वाचली. तरी त्याला उत्तर सापडेना. दिवसेंदिवस कोमेजत चाललेल्या आपल्या बहिणीला कशी मदत करावी? हे त्याला कळेना. त्याला काही उमजेना. त्याचं दुःख संपेना, त्याला उत्तर सापडेना. एक दिवस असाच दुःखीकष्टी होवून तो आपल्या मित्राकडे गेला. मित्राच्या घरात सगळं छान चाललं होतं. सगळीकडे आनंद होता. मित्र आणि त्याची बहीण हसतखिदळत, एकमेकाला टाळ्या देत गप्पा मारत होते. त्याने विचारले, “मित्रामित्रा तू एवढा आनंदी कसा? तुझी बहीण एवढी निवांत कशी? तुझ्या बहिणीची तुला काही काळजी वाटत नाही का?” मित्र म्हणाला, “बाबारे, बहिणीची काळजी मलासुद्धा वाटते. पण त्यासाठी तोंड वाकडे करून बसायची काही गरज नाही. आम्ही दोघं बहीणभावंड एक आगळेवेगळे व्रत करतो आणि आनंदी रहातो.” “ हे व्रत काय आहे, ते मला सांग.” मित्र म्हणाला, “ हे व्रत फार कठीण असते. ते जन्मभर निभवावे लागते. तू उतशील, मातशील घेतला वसा टाकून देशील!” त्याने मित्राला वचन दिले, “उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही ! व्रताची सुरुवात कशी करावी?” मित्र व्रत सांगू लागला, “ हे व्रत पुरुष मनात आलं की कधीही करू शकतात. व्रताची सुरुवात करताना आधी बहिणीला मनोमन बरोबरीचे स्थान द्यावे. आपल्या इतकाच बहिणीलाही शिक्षणाचा, खेळण्याचा, हसण्याचा, हिंडण्याफिरण्याचा हक्क आहे – हे कधी विसरू नये. तिच्याबरोबर हसावे, खेळावे, गाणी म्हणावी, सिनेमा-नाटक बघावे. तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवाव्या. बहिणीचा मित्र बनावे. आईवडील जर तिच्यावर बंधने घालत असतील तर तिच्या बाजूने त्यांनाही समजावून सांगावे. सारखी तिची राखणदारी करू नये. आपली बहीण एक स्वतंत्र व्यक्ती आहे – हे नेहमी लक्षात ठेवावे. तिला गरज असेल तेव्हा पाठिंबा द्यावा पण तिच्याभोवती पिंजरा उभा करू नये. आपल्यासारखाच तिला स्वतंत्रपणे जगायचा आणि चुकायचा देखील हक्क आहे याची जाणीव ठेवावी. स्वत:च्या मर्दानगीच्या कल्पना गुंडाळून ठेवाव्या. बहिणीला स्वावलंबी व्हायला मदत करावी. कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीला समान वाटा द्यावा. तिच्याकडून हक्कसोडपत्र मागू नये. तिचे लग्न तिच्या मर्जीवाचून लावून देऊ नये. लग्नाच्या वेळी हुंडा देऊ नये. त्यापेक्षा तिच्या नावावर बँकेत रक्कम ठेवावी. आपल्या जवळ आपलं असं काहीतरी आहे, हे जाणवून तिला बरं वाटेल. गरज पडली तर आपण आपलं उभं राहू शकू, वेगळं काही काम करू शकू असा आत्मविश्वास तिला येईल. दुर्दैवाने तिला घरातून हाकलून लावले तर तिच्याकडे तिचे हक्काचे काहीतरी असेल.” व्रत ऐकता ऐकता भावाला स्वत:च्या चुका उमजू लागल्या. मनातल्या शंका दूर होऊ लागल्या. त्याने मित्राचे आभार मानले. तो मित्राला म्हणाला,“ मित्रा, मी हे व्रत आजपासूनच सुरू करतो. व्रत ऐकण्याचे इतके फळ तर व्रत करण्याचे काय फळ? व्रताचे उद्यापन कसे करावे?” “आपण भावांनी जन्मभर हे व्रत करायचं आहे - आपल्या बहिणीसाठी, आपल्या पहिल्या बालमैत्रिणीसाठी. तरी हे व्रत फक्त आपल्या बहिणिपुरते मर्यादित ठेवायचे नाही. आपले लग्न झाल्यावर आपल्या पत्नीलाही बरोबरीचा दर्जा द्यावा तिच्याशी मैत्री करावी. पत्नीच्या भावालाही हे व्रत समजावून सांगावे. असे केल्यामुळे जशी बहीण मोकळेपणाने जगू शकते तशी मर्दानगीच्या जोखडातून भावाची थोडी सुटका होऊ शकते.” व्रताचे फळ समजून भाऊ मनापासून आनंदी झाला. घरी जाऊन बहिणीला भेटला. तिची विचारपूस केली आणि तिची माफी मागितली. “ताईताई मला ओशाळल्यासारखं होत आहे, तुझ्याच पिढीतला असून मला तुझी गरज कळली नाही. ताई तुला सक्षम करण्याचं सोडून मी तुला बंधने घालून दुबळं केलं. आता तुझ्याबरोबर मी आहे आणि माझ्या बरोबर तू आहेस. मी तुझ्या मर्जीशिवाय तुझं लग्न होऊ देणार नाही. तुला शिकायचे आहे, तर मी आईबाबांना समजावून सांगेन. तू मला क्षमा कर.” बहिणीने भावाला क्षमा केली. त्या दोघांनी आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या सोबत राहण्याचे ठरवले. जशी भावाला उपरती झाली आणि बहिणीला बळ मिळालं. तसं तुम्हाआम्हांला मिळो आणि आपल्या परिवारातल्या महिलांना त्यांचे हक्क मिळोत. अशी ही असंख्य प्रश्नांची कहाणी अनेक उत्तरी सुफळ संपूर्ण. अश्विनी बर्वे या सर्व कहाण्या पुन्हा स्त्री उवाच या वेबपोर्टल वर प्रसिद्ध झाल्या होत्या. https://punhastreeuvach.blogspot.com/2021/08/blog-post_24.html

नवजिवतीची कहाणी ( श्रावणातल्या कहाण्या )

नवजिवतीची कहाणी ऐक मानवा तुझी कहाणी, एक आटपाट नगर होतं. तिथं होता एक राजा, घरात त्याच्या नव्हता गाजावाजा, सुना त्याचा ओटा, सुना त्याचा सोफा. त्या राजाला होती राणी, सुनी झाली होती तिची वाणी. घरात किलबिलत नव्हती बालगाणी. पाहुणेराउळे त्यांना बोलवत, पण येताजाता टोमणे मारत. राजाराणी खट्टू झाले, सगळ्या जगावर रागवू लागले. नाही नाही ते उपाय करू लागले. त्यातून त्यांच्यातला संवाद हरवला. एकमेकांचे गुणदोष टोचू लागले. उणीदुणी काढू लागले. एके दिवशी काय झाले? भांडता भांडता त्यांना शेजारच्या घरातून हसण्याखिदळण्याचा आवाज आला, पावलांचा आवाज येवू लागला. गाणी ऐकू आली. काय असेल बरं शेजारी? राणीला वाटले कुतूहल भारी, राणी गेली शेजारघरी. राणीने विचारलं, “बाई बाई तुझं घर असं हसतं खेळतं कशानी झालं? त्यासाठी तू कोणतं व्रत केलं?” शेजारीण म्हणाली,“ माझं व्रत अगदी सोप्पं आहे. ते आहे नवजिवतीचं व्रत. स्त्री-पुरुष दोघंही ते करू शकतात.” राणी म्हणाली,“ बाई बाई मला व्रत सांग, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” शेजारीण सांगू लागली, “तसं तर हे व्रत अगदी सोप्पं आहे, तू फक्त तुझ्या पोटी मूल येईल असा विचार करू नको. आपल्या आसपास हजारो मुलं आहेत त्यांच्याकडे मायेच्या नजरेनं बघ. त्यांचा हात तुझ्या हाती घे.” राणीच्या मनी शंका आली, “म्हणजे तुझ्या घरातली ही मुलं तुझी नाहीत ?” “ही मुलं आपलीच आहेत, त्यांना हवं आहे प्रेम, माया, आपुलकी आणि शिक्षण.” “पण. . . ” “पण नाही आणि बिण नाही. लोक काय म्हणतील हा विचार करू नको, या मुलांचा हात धरला तर आपल्या भोवती एक छान वातावरण निर्माण होईल. मुलांना आणि आपल्याला एक छान मार्ग मिळेल.” “मी तर हे व्रत करेन, कारण प्रत्येक बाईत असतेच एक आई. पण पुरुषाच्या मनात निर्माण होईल का दुसऱ्याच्या मुलाबद्दल प्रेम?” “अग प्रत्येक पुरुषातसुद्धा असते एक आई, त्याला लेबल लावण्याची नको करू घाई.” “बाई असल्याशिवाय कसं साधणार आईपण?” “अग प्रत्येक स्त्रीला बाळ होवू शकत नाही हे जसं नैसर्गिक, तसंच काहींना आई व्हायची इच्छा नसते हेही तितकंच नैसर्गिक. प्रत्येक बाईने बाळाला जन्म द्यायलाच हवा अशी सक्ती असू नाही; तसं पुरुषांना सुद्धा सापडतं आपल्या आतलं आईचं मन, तेही तितकंच आहे नैसर्गिक. म्हणून म्हणते बाळासाठी होवू नये अगतिक.” “असं कसं?” “तूच आजूबाजूला बघ बरं. कितीतरी जणी आपल्या कामावर प्रेम करतात, ते काम त्यांचं बाळच असतं. त्या कामासाठी त्या दिवसरात्र एक करतात. त्या नवनवीन संशोधन करतात. त्या स्वतःला ओळखतात. त्यांच्या कामातून समाजाचा सुद्धा विकास होतो.” राणीला हळूहळू शेजारणीचं बोलणं उमजायला लागलं - “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ?” “तू अनेकांची आई होशील, तुझ्यातला संकुचितपणा नाहीसा होईल. समाजाकडे नव्या निकोप दृष्टीने पाहशील, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पसरेल.” “हे व्रत कसं करायचं?” “स्त्री-पुरुषांनी हातात हात घेवून हा वसा घ्यावा. निकोप समाजासाठी नवजिवतीचं व्रत घ्यावं. यात कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. जसं एखाद्या जोडप्याला मूल नसतं, तसे अनेक मुलांना आईबाबा नसतात. बाळ होणं आपल्या हातात नाही पण अनेक मुलांच्या चेहऱ्यावर हसू पसरवणे तर आपल्या हातात आहे. तुम्ही सजग व्हाल, तर समाजाचे पालक व्हाल. जिथंजिथं बाळासाठी रडणारी आई असेल तिथंतिथं तुम्ही पोहचा आणि तिचा हात तुम्ही हाती घ्या. हे व्रत सर्वांना सांगा. जशी नवजीवतीने माझ्यावर कृपा केली, माझं घर आनंदी केलं; तशी ती सर्वांवर कृपा करेल. अशी ही अनेक प्रश्नांची कहाणी एका उत्तरी सुफळ संपूर्ण!” (या सगळ्या कहाण्या पुन्हा स्त्री उवाच या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची लिंक खाली दिली आहे. ) https://punhastreeuvach.blogspot.com/2021/08/blog-post.html

Monday, January 26, 2026

क्षणाची गोष्ट

 ठमी १

माझे नाव तुम्हाला कळलेच असेल,ते एका क्षणा सारखे आहे,म्हणजे तो आत्ता आहे आणि लगेच नाही. म्हणजे काय हे मला तरी कुठे माहीत असायला. म्हणजे त्याची माहिती,वर्णन नाही पण मला उगाच्वत्ते तो क्षण माझ्या नावसारखाच संपून जाईल.

मी आत्ता वर्तमानात आहे म्हणजे तुम्ही सुद्धा असणारच .भविष्यात सुद्धा तुम्ही असणार का?मी असेल का? म्हणजे ते भविष्य आहे हे आपल्याला कसे कळेल? 

पुस्तके जातात तेव्हा

 कवी म्हणाला होता की आपण गेल्यावर पुस्तकांचे काय होणार? कोण त्यांच्यावरून हात फिरवणार? त्यांच्याशी मायने कोण वागणार? गेल्यावर पुस्तकांचे काय होणार हे माहीत नाही.कारण माझ्याच घरातून माझी इच्छा नसताना माझी कितीतरी पुस्तके केवळ घरात पसारा दिसतो म्हणून जात आहेत.ती योग्य ठिकाणी पोहचली वगैरे याचे मला कधीच समाधान वाटत नाही.माझी पुस्तके मला माझ्याच जवळ हवी असतात. हल्ली माझी विरोध करण्याची क्षमता संपली आहे.दरवेळी तो वाद,रडारड नको वाटते.कारण मला पुस्तके का हवी आहेत तेच कोणाला समजत नाही. पुस्तके घरातून जाण्याचा प्रसंग अजून अनेक वेळा माझ्यावर येणार आहे,तरीही मी पुस्तके आणण्याचे थांबवणार नाही. ती येत राहणार.

हत तेरी

            हत तेरी 


      मनात आलं की मरण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे,म्हणजे एखादा आजार तरी पाहिजे,नाहीतर आपण कशाने मरणार? कारण कितीतरी लोक वयस्कर होतात पण त्यांना काहीच होत नाही,आणि मग ते मरत नाही. निराशा, एकटेपणा,याने ते त्रासून जातात. मग मला वाटलं की मला वेळेत मरायचं आहे तर मला काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे काहीतरी दुखणे असेल तर बरं. गोळ्या औषधे,डॉक्टर आणि असा आजार कोणाला झाला असेल तर त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीविषयी बोलायला विषय राहतील. म्हणून मी विचार केला की काहीतरी झालं पाहिजे आपल्याला. तर रात्रीतून युरिन इन्फेक्शन झालं. हल्ली ते बऱ्याच वेळा होतं. सर्व प्रकारच्या चाचण्या करून झाल्या पण कारण काही सापडलं नाही. घरातच असते, त्यामुळे बाहेरच्या स्वच्छता गृहाचा संपर्क येण्याचा प्रश्न नाही. 

    मग विचार आला की मरण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? तर कणिक भिजवलेली होती आणि कुकरला अख्खी  मसूर लावली होती. म्हटलं समजा आपण गेलोच यावेळी तर फारसे काही बिघडणार नाही. तेवढ्यात विचार आला की रात्रींची पोळी शिल्लक नाही, आणि समजा मी मेलेच तर घरातील वयस्कर लोकांची खाण्याची आबाळ होईल.मग पोळ्या कराव्यात आणि वरण फोडणीला घालावं. म्हणजे बाकी लोक जमे पर्यंत यांची पोळी खाऊन होईल, गोळी घेऊन होईल आणि मग त्या इतर टूकुमुकू बघायला मोकळ्या होतीत. शिवाय आज त्यांचा वेळ जास्त चांगला जाईल. माणसं घरात येतील,फोनचा आवाज येत राहील. यात वयस्कर मंडळीचा टाईम पास होईल. 

  ही वेळ मरण्यासाठी योग्य आहे का? स्वतःला विचारलं. म्हटलं स्वतःच्या दृष्टीने विचार कर. तर वाटलं तसं काही फारसं करायचं राहिलेलं नाही. जगात बदल घडवून आणण्याइतके आपले व्यक्तिमत्व थोर नाही,त्यामुळे पोकळी वगैरे निर्माण होणार नाही.संसार तसा करून झाला आहे,देशभर,जगभर फिरायचं होतं पण आता ते पुढच्या जन्मासाठी ठेवलं तरी चालेल. म्हणजे आता त्याची तशी घाई नाही. काही पुस्तके वाचायची राहिलेली आहेत. पण मेल्यावर कोण विचारणार आपल्याला की हे वाचलं का ? ते वाचलं का? त्यामुळे वाचलं नाही तरी चालेल. असा निर्णय घेतला. पण वाचनालयाची पुस्तके कोणाला तरी परत करायला सांगावी लागतील. तसेच घरातील पुस्तकांचे काय करणार? याबाबत मी काहीच सांगून ठेवले नाही. ते ही सांगून टाकते.   म्हणजे मोकळी होऊन जाईल.

 मग स्वतः लिहलेल्या गोष्टींचे काय करायचे? हा विचार मनात आला.अरे देवा.हा पाश आहेच का अजून असं जरा नाटकीपणे म्हटलं. आणि विचार करू लागली की स्वतःचे लिखाणाचे काय करावे? म्हणजे त्यातून काही सामाजिक बदल वगैरे होईल असे काही नाही. पण थोडेफार मनोरंजन होऊ शकेल. कारण लिहतांना माझे झाले ना तसेच.काय करावं कळेना. कालच एका मैत्रिणीने माहीती पाठवली की संपादन करून द्यायला लोक तयार आहे आपण फक्त मजकूर पाठवायचा. अर्थात फी देऊन. तर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटलं. मग घाईघाईने laptop उघडला आणि गोष्टी कुठे कुठे लिहून ठेवल्या आहेत त्याचा धांडोळा घेतला. तेव्हा लक्षात आले की एका जागी व्यवस्थित काही नाही. ते नीट लाईनीत लावले पाहिजे. म्हणजे फारच काम आहे बुवा. हत तेरी 

  गोळ्या घेतल्यामुळे युरिन इन्फेक्शन कमी झाले होते,भूकही लागली होती. म्हटले मरण परत कधीतरी अनुभवू ,आता लिखाणाचे काम आणि जेवण महत्वाचे आहे. शेवटी .

माना के मुरत -ए -खाक से बेहतर नहीं  हूँ  मैं 

लेकिन हवा के रहम-ओ -कर्म पर नहीं  हूँ  मैं

  माझ्या आयुष्याच्या मानाने शेर फार मोठा आहे ना? मी लिहलेला नाही तो. 

मला माहीत आहे एक मूठ माती एवढीच माझी योग्यता आहे,याहून अधिक किंमत नाही. पण म्हणून एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने थोडीच मी मरेन.  वाऱ्याने यावं आणि छान आनंद पसरू द्यावा. असेच मला वाटते.